मुंबई (Mumbai) : धारावी (Dharavi) पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाचीच (Adani Group) निवड होईल अशारीतीने टेंडर (Tender) फ्रेम केल्याचा गौप्यस्फोट करीत या टेंडर प्रक्रियेला आणि प्रकल्पासाठी अदानी समूहाची निवड करण्याच्या निर्णयाला सौदी अरेबियास्थित सेकिलक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन कंपनीने (Sekilak Technology Corporation) उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच सेकिलक कंपनीला या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही, अशा पद्धतीने ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याचा दावाही याचिकाकर्त्या कंपनीने केला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरमध्ये फक्त भारतीय कंपन्यांनाच सहभागी होता येईल, अशी प्रमुख अट प्राधिकरणाने घातली होती.
२५९ हेक्टरवर पसरलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडून राबवला जाणार आहे. या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक म्हणजेच ५,०६९ कोटी रुपयांची बोली लावली होती. प्राथमिक गुंतवणुकीसाठी ही बोली होती. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची एकूण किंमत २० हजार कोटींच्या घरात आहे. सुमारे 58 हजार कुटुंबे आणि 12 हजार लघु उद्योगांचे पुनर्वसन याअंतर्गत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकल्पासाठी २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये सेकिलक ही सर्वाधिक ७२०० कोटी रुपयांची बोली लावणारी कंपनी होती, त्यावेळी अदानी समूहाने केवळ ४३०० रुपयांची बोली लावली होती.
सेकिलक कंपनीला या टेंडर प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही, अशा पद्धतीने ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्या कंपनीने केला आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरुवारी सुनावणीसाठी आली. ही याचिका टेंडर प्रक्रिया सुरू असताना करण्यात आली होती. परंतु टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून या टेंडर प्रक्रियेत अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावल्याने त्यांची प्रकल्पासाठी निवड झाली आहे. त्यामुळे या निवडीला आव्हान द्यायचे असल्याने त्यासाठी सुधारित याचिका करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीच्या वतीने वकील सूजर अय्यर यांनी न्यायालयाकडे केली.
न्यायालयानेही कंपनीला सुधारित याचिका करण्यास परवानगी देऊन राज्य सरकार आणि धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला त्यावर आवश्यक वाटल्यास उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारी रोजी ठेवली. प्रकल्पासाठी २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये सेकिलक ही सर्वाधिक ७२०० कोटी रुपयांची बोली लावणारी कंपनी होती, त्यावेळी अदानी समूहाने केवळ ४३०० रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे अदानी समूह टेंडर प्रक्रियेत मागे पडला. त्यामुळे आधीची टेंडर प्रक्रिया रद्द करून प्रकल्पासाठी नव्याने टेंडर काढण्यात आली. मात्र सेकिलक कंपनीला सहभागी होता येणार नाही, अशा अटी टेंडरमध्ये घालण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. या याचिकेत अदानी समूहाला मात्र प्रतिवादी करण्यात आलेले नाही.