मुंबई (Mumbai) : मुंबईतील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा देणारी घडामोड आहे. मुंबई महापालिकेने पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १८५ कोटींच्या कामांसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. याद्वारे जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच गरजेच्या ठिकाणी नव्या जलवाहिन्यादेखील टाकल्या जाणार आहेत. कुर्ला ते मुलुंडदरम्यान १०० कोटी आणि वांद्रे ते दहिसरपर्यंतच्या कामांसाठी ८५ कोटी असा एकूण १८५ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून उशिरा सुरू होणारा पाऊस आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे मे-जून महिन्यात मुंबईत १० ते १५ टक्के पाणीकपात करावी लागली होती. मात्र या वर्षी तलावांत ऑगस्टच्या मध्यापर्यंत पुरणारा पाणीसाठा असल्याने पाणीकपातीचे संकट टळले आहे.
मुंबईला होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यातील तब्बल २७ टक्के पाणीगळतीमध्ये वाया जात असल्याने काही विभागांत पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे संबंधित भागात महापालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी जलवाहिन्यांची आवश्यक देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. या पार्श्वभूमीवर कुर्ला ते मुलुंडदरम्यानच्या भागातील जलवाहिन्यांचे काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पश्चिम उपनगरातील वांद्रे पूर्व-पश्चिम, के/पूर्व अंधेरी पूर्व, के/पश्चिम अंधेरी पश्चिम, पी/उत्तर मालाड, आर/दक्षिण कांदिवली, आर/मध्य बोरिवली, आर/उत्तर दहिसर भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीदेखील महापालिका सुमारे ८५ कोटींचा खर्च करणार आहे. यामध्ये पाण्याची गळती थांबवणे, प्रदूषण रोखणे, झडप कक्षांची कामे, सेवा जोडण्यांचे नूतनीकरण करण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने एकूण १८५ कोटींच्या कामांसाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.