मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्ते आता एलईडी पथदिव्यांनी उजळणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर मुंबईतील सोडियम व्हेपरच्या सर्व पथदिव्यांच्या जागी एलईडी पथदिवे बसवले जात आहेत. मुंबईत साधारणतः सव्वा लाख पथदिव्यांचे रूपांतर एलईडीमध्ये होणार आहे. यातील ९५ टक्के कामे उकरली असून जेथे पायाभूत सुविधांचीकामे सुरू आहेत, तेथील एलईडी दिव्यांची रखडलेली कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय धोरणात्मक निर्णयानुसार विद्युत ऊर्जा बचतीसाठीची योजना महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड यांना मुंबईतील दिवाबत्तीच्या खांबावर एलईडी पथदिवे बसवण्याची परवानगी देण्यात आली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबईतील पथदिवे ही सोडियम व्हेपरऐवजी एलईडीमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले.
मुंबईतील रस्त्यांवरील पथदिव्यांवर एलईडी बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत साधारणतः ९५ टक्क्यांहून अधिक एलईडी दिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले असून केवळ पाच टक्के काम बाकी आहे. साधारणतः तीन हजार एलईडी दिवे लावणे बाकी असून येत्या दीड महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल.
दिवाबत्तीची देखभाल वेगवेगळ्या वीज वितरण कंपन्यांच्या माध्यमातून होत असून भाडेतत्त्वावरील देखभालीच्या व्यवस्थेचा खर्च मुंबई महापालिकेच्या वतीने संबंधित वीज वितरण संस्थांना दिला जातो. मुंबईतील शहर भागात बेस्ट, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी आणि पूर्व उपनगरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) माध्यमातून रस्त्यावरील दिवाबत्तीची व्यवस्था केली जाते.
एकूण रस्त्यांवरील पथदिव्यांची संख्या-
मुंबई शहर : ४०,७८४
मुंबई उपनगरे : ८४,४७०