मुंबई (Mumbai) : दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा १०० वर्षांहून जुना टिळक पूल (Tilak Bridge) नव्या रुपात वांद्रे वरळी सी लिंकसारखा (Sea Link Bridge) बांधला जाणार आहे. 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन' (MRIDC) या केबल आधारीत पूल बांधणीचे काम करणार आहे, त्यासाठी मुंबई महापालिका (BMC) ३७४ कोटी देणार आहे. नव्या पुलाची क्षमता आतापेक्षा दुप्पट असणार आहे. साधारण आगामी वर्षात हे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी रेल्वे प्रशासन व मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ३४४ पूल आहेत. या सगळ्या पुलांचे पावसाळ्याआधी व पावसाळ्यानंतर असे वर्षांतून दोनदा ऑडिट करण्यात येते. मात्र, अंधेरी येथील गोखले पूल व सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा पुलांचे ऑडिट करण्यात आले असून, रिपोर्टनंतर अनेक पुलांच्या दुरुस्तीचे व नवीन बांधकाम हाती घेतले आहे. दादर येथील टिळक पूल १०० वर्षें जुना असून रिपोर्टनंतर टिळक पुलाचे काम नव्याने करण्यात येणार आहे. धोकादायक ठरलेला दादरचा टिळक पूल लवकरच दिमाखात उभा राहणार आहे. विशेष म्हणजे नव्याने बांधण्यात येणारा पूल वांद्रे सी लिंकच्या धर्तीवर केबल आधारीत असणार आहे.
टिळक पुलाचे केबल पुलाच्या स्वरूपात आधुनिकीकरण करायला मुंबई पालिकेने तत्त्वतः मान्यता दिली आहे. या पुलाचे काम 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन' (एमआरआयडीसी) कडून केले जाणार आहे. कॉर्पोरेशनला महापालिका आणि रेल्वे मंत्रालयाकडून आर्थिक निधी देण्यात येणार आहे. या पुलाची क्षमता आताच्या पुलापेक्षा दुप्पट असणार आहे.
नवा पूल साधारण ६५० मीटरचा असून त्यापैकी केबलवर आधारित भाग सुमारे १९० मीटरपर्यंत असणार आहे. सध्याचा पूल सुमारे ४.५ मीटर उंचीचा असून, नवीन पूल हा त्यावर समांतर पद्धतीने बांधला जाणार आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढणार असली तरीही जमिनीवर उतरण्यासाठी रॅम्पची व्यवस्था केली जाणार आहे. नवीन पुलाची एकूण रुंदी १७.१ मीटर इतकी असणार आहे.