औरंगाबाद (Aurangabad) : बाजार समितीतील रस्ते खड्ड्यात गेल्याने व्यापारी, ग्राहक आणि शेतकऱ्यांची ओरड झाली आणि काही रस्त्यांचे व्हाइट टाॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यातही जनतेचा पैशाचा कसा धुराळा उडवला गेला त्याचा हा खास रिपोर्ट.
श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल जाधववाडीतील गेट क्रमांक एक ते फळेभाजीपाला मार्केट तसेच गेट क्रमांक-२ ते धान्य मार्केट अडीच वर्षापूर्वी तयार झालेल्या या रस्त्यांची आज अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. आधीच्या रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला आणि जणू ‘बक्षीस’ म्हणून येथील पुन्हा काही रस्त्यांचे काम देण्यात आले. त्यांनी नेहमीप्रमाणे या रस्त्यांचेही वाटोळे केले. बाजार समिती संचालक मंडळ, पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापक कमिटी) आणि ठेकेदार यांनी सारे मिळून संपूर्ण व्यापारी, शेतकरी आणि बाजारकरू यांची निव्वळ धूळफेक केली असल्याचे टेंडरनामाच्या पाहणीतून पुढे आले आहे.
बाजार संकुलातील सर्वच रस्त्यांबाबत माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी विशेष बैठक घेतली होती. स्ट्रॉम वॉटरसाठी वेगळी व्यवस्था नसल्याने, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून जागोजागी डबकी निर्माण होतात. त्यात बहुतांश रस्ते डांबरीच असल्याने टायरच्या न्यूमॅटिक ॲक्शनमुळे ते खराब होतात.
म्हणून घेतला निर्णय
डांबरी रस्त्याच्या कामाचा सदोष दायित्व निवारण कालावधी (डीएलपी) वर्षांचा असतो, तर व्हाइट टॉपिंगच्या कामाचा सदाेष दायित्व निवारण कालावधी पाच वर्षांचा असतो. हे रस्ते कमीत कमी १० वर्षे उत्तम स्थितीत राहू शकतात. ३० वर्षे टिकल्याचा गाजावाजाही करता येतो. व्हाइट टॉपिंग रस्ते केल्यास पुढील दोन ते तीन वेळेची देखभाल दुरुस्ती वाचू शकते. कारण डांबर कामात दर तीन वर्षांनी रिन्युअल कोट देणे जरुरीचे असते. नागरिकांना पुढील १० वर्षे उत्तम रस्त्यांचा वापर करता यावा म्हणून माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी महापालिकेच्या धर्तीवर काही प्रमुख आणि अंतर्गत रस्ते व्हाइट टॉपिंगमध्ये करण्याचे आदेश दिले होते. यासाठी डांबरकामाच्या निविदा रद्द करून डांबर कामाचे अंदाजपत्रक हे व्हाइट टॉपिंगच्या कामात बदलण्यासाठी मान्यताही देण्यात आली. त्यात बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल जाधववाडीतील गेट क्रमांक एक ते फळेभाजीपाला मार्केट तसेच गेट क्रमांक-२ ते धान्य मार्केट आणि अंतर्गत सर्वच रस्त्यांचाही समावेश होता.
साडेसहा कोटींचे रस्ते
या अनुषंगाने बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक अनिलकुमार दाबशेडे यांनी २०२० मध्ये या रस्त्यांसाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयांच्या व्हाइट टाॅपिंग कामासाठी अंदाजपत्रक तयार केले.या कामावर देखरेख करण्यासाठी नाशीकच्या मे. ओम श्री कन्सलटंट कंपनीला रस्त्यांच्या कामावर देखभालीसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कमिटी म्हणून नेमण्यात आले होते. औरंगाबादच्या एन. के. कन्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते.
नोटिसांचा सोपस्कार
काम निकृष्ट झाल्याची ओरड होताच बाजार समितीच्या प्रशासक मंडळामार्फत ठेकेदाराला नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. त्यावर बिल थकल्याने काम अर्धवट केल्ताचा आरोप ठेकेदाराने केला होता. मात्र कामाचे पैसे उचलून रस्त्यांच्या दूरूस्तीकडे दुर्लक्ष केले गेले.