2 वर्षांनंतरही 'नगरविकास'कडून निधीला ठेंगा; ठेकेदार हतबल

Tendernama
TendernamaTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटी निधी देण्याचा गवगवा केला. या निधीत महापालिकेच्या वाट्याला ५० कोटीचे नऊ रस्ते आले होते. दोन वर्षांपूर्वी येथील स्थानिक ठेकेदारांनी रस्ते गुळगुळीत केले. रस्त्यांचा दोष निवारण कालावधी देखील संपला. मात्र राज्य सरकारने केवळ १५ कोटी रुपये देऊन महानगरपालिकेची बोळवण केली. यातील ३५ कोटी रुपये अद्यापही बाकी आहेत. दोन वर्षापासून राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने पैसेच दिले नसल्याने महापालिका प्रशासन हतबल झाले आहे.

Tendernama
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी; 'या' प्रकल्पाला मंजुरी

इकडे ठेकेदार महापालिकेकडे तगादा लावत आहेत. मात्र अधिकारी आज नाही, तर उद्या येतीलच, असे म्हणत ठेकेदारांची समजूत काढत आहे. पैसे मिळावेत म्हणून महापालिका नगरविकास विभागाकडे पत्र व्यवहार करत आहे. मात्र नगरविकास विभागाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. 

शहरातील २३ रस्त्यांसाठी राज्य शासनाने १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. या निधीतून रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसीकडे प्रत्येकी ७ तर महापालिकेने ५० कोटी खर्चातून ९ रस्ते विकसित केले आहेत. मात्र एमआयडीसी आणि राज्य रस्ते विकास महामंडळ वगळता राज्य सरकारने महापालिकेला ५० कोटीपैकी केवळ १५ कोटीच दिले. शासन अनुदान अंतर्गत रस्त्यांची कामे असल्याने ठेकेदारांनी रस्त्याची कामे मुदतीआधीच पूर्ण केली. मात्र गत दोन वर्षापासून राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत उर्वरित निधी देण्यासाठी राज्य सरकार ठेंगा दाखवत आहे. 

Tendernama
Pune: अपघातांनंतरही अतिक्रमणे हटविण्यास पालिकेला वेळ का मिळेना?

निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागील दोन वर्षापासून महापालिका प्रशासन राज्य सरकारपुढे लोटांगण घालत आहे. अनेकदा पत्र दिले. पण अद्याप निधी मिळाला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या रस्तेकामाचे भूमिपूजन झाले होते. माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यावेळी उपस्थिती होती.

महाविकास आघाडी कोसळल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. सद्यस्थितीत नगरविकास खात्याचा कारभार देखील त्यांच्याचकडे असताना छत्रपती संभाजीनगरातील गुळगुळीत रस्तेकामाचा निधी देण्यास नगरविकास खाते का टोलवाटोलवी करत आहे, यासंदर्भात त्यांनी चौकशी करून महापालिकेला उर्वरित निधी सुपूर्द करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे गत सहा वर्षापूर्वी १०० कोटींतील रस्त्यांच्या कामांचे ६० कोपी देखील राज्य सरकारकडे बाकी असल्याचे ठेकेदारांनी दबक्या आवाजात सांगितले.

Tendernama
Pune: रिंगरोडच्या भूसंपादनाचा मुहूर्त ठरला; मोबदला किती मिळणार?

या रस्त्यांची कामे झाली

 - वोखार्ड ते जयभवानी चौक, नारेगाव व रेल्वेस्टेशन ते तिरुपती एन्क्लेव्ह रस्त्याचे डांबरीकरण. 

- दीपाली हॉटेल ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याचे डांबरीकरण. 

- पुंडलिकनगर ते एन-३, एन-४ मधील हायकोर्ट ते कामगार चौक रस्त्याचे काँक्रिटीकरण. 

- भवानी पेट्रोलपंप ते ठाकरेनगर मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण. 

- महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण. 

- अग्रसेन चौक ते सेंट्रल एक्साइज ऑफीस रस्त्याचे काँक्रिटीकरण. 

- जालना रोड ते अपेक्स हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रिटीकरण. 

- जळगाव रोड ते अजंटा अँबेसेडर रस्त्याचे डांबरीकरण 

- अमरप्रित हॉटेल ते एकता चौक रस्त्याचे डांबरीकरण

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com