छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सहा वर्षांपूर्वी १७ कोटी रुपये खर्च करूनही मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाची अवस्था भंगार बाजाराप्रमाणे भयंकर झाली आहे. पाच ते सहा फूट उंच वाढलेल्या गाजर गवताच्या वेढ्यात अडकलेला प्लॅटफाॅर्म, तोकडे पण तुटलेले बाकडे, प्रवासी निवाऱ्याचे तुटलेले पत्रे, प्लॅटफॉर्मवरील उखडलेली फरशी, कचरा आणि घाण , कुलूपबंद असलेले स्वच्छतागृह आणि प्रतिक्षालय, नादुरूस्त पथदिवे , पिण्याच्या पाण्याची वानवा यामुळे या ठिकाणी प्रवाशांना थांबणेही कठीण झाले आहे. रेल्वे येईपर्यंत या ठिकाणी उभे राहून प्रतीक्षा करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच आहे.
'टेंडरनामा'ने गेले काही दिवस सातत्याने या रेल्वे स्थानकाची पाहणी केली. प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे येणे म्हणजेच अती दिव्य आहे. मुजोर रिक्षाचालकांच्या कोंडीतून मार्ग काढीत या स्टेशनच्या आत प्रवासी पोहोचला की त्याला प्लॅटफॉर्मवरील अडचणींना सामोरे जावे लागते.
दहा बाय दहाचे चार प्रवासी निवारे आहेत. आधीच छोटे निवारे, त्यात त्यांचे टीन फुटलेले. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात तर ओलेचिंब होऊनच रेल्वेत बसावे लागते. मोकाट कुत्री, कचरा, घाण आणि ओसाड जागा अशा अवस्थेतच या ठिकाणी थांबावे लागते. धक्कादायक म्हणजे थेट प्लॅटफाॅर्मवर आसपासच्या वसाहतीतील दूचाकीस्वार घीरट्या घालत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गाजर गवतात प्लॅटफाॅर्म
संपूर्ण प्लॅटफॉर्मभोवती पाच-पाच फूट गाजर गवत वाढले असून गवताच्या विळख्यामुळे कधी कुठून धोका होइल हे सांगता येत नाही. कित्येक बाकडी तर अनेक दिवसांपासून मोडून तशीच पडलेली आहेत. काही बाकडी गायब झाली आहेत. उखडलेल्या फरशीमुळेही लोक पाय अडकून पडतात.
सुरक्षा भिंतीचे अवशेष
विश्रांतीनगरपासून जयभवानीनगरपर्यंत प्लॅटफॉर्मच्या प्रवेशद्वारावर बांधलेली सुरक्षा भिंत पडली असून आता तर तिचे फक्त अवशेषच शिल्लक राहिले आहेत.
पोलिस चौकी नावालाच
रेल्वेस्थानकाच्या बाहेरच विश्रांतीनगर रस्त्यावर एक पोलिस चौकी आहे. ही चौकी असूनही तिचा काहीही उपयोग होत नाही. पोलिसांसमोरच या ठिकाणी रिक्षाचालक पत्त्यांचा डाव मांडतात. या भागात शहर बसची सोय नसल्याने खासगी गाड्यांचाच वापर करावा लागतो. त्यामुळे ते प्रवाशांच्या गैरसोईचा फायदा घेत त्यांच्याकडून भरमसाट पैसे उकळतात.
प्रतिक्षालय बंद
रेल्वेस्थानकातील प्रतिक्षालयाचा भंगारसामान ठेवन्यासाठी गोडाउन म्हणून वापर केला जात आहे. त्या ठिकाणी सिमेंट गोण्या व इतर बांधकाम साहित्य ठेवले जात आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या नावाखाली बांधलेले प्रतिक्षालय सताड कुलुपबंद असल्याने प्रवाशांना प्लॅटफाॅर्मवर उभे राहूनच गाडीची वाट पाहावी लागते. यात स्तनदा माता व इतर महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
स्वच्छतागृह बंद
रेल्वेस्थानकात पाणीच नसल्यामुळे येथील स्वच्छतागृह बंद करून ठेकेदाराने गाशा गुंडाळून पळ काढला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नाही. पुरूष मंडळी आसपासच्या झाडाझुडपात आणि भिताडाचा आधार घेऊन प्रांतविधी उरकतात मात्र महिलांची मोठी गैरसोय होत आहे. केवळ पाण्याअभावी स्वच्छतागृह बंद असल्याने येथील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
मुकुंदवाडी रेल्वे स्थानकासंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या १७ कोटी रुपयांतून येथे प्रवाशांना सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात मुख्य प्रवेशद्वार, प्रवासी निवारे, प्लॅटफाॅर्म, प्रतिक्षालय, तिकीटघर, पाणपोई, पथदिवे या विकासकामांचा समावेश होता. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या विकासकामांचा अभाव जाणवत आहे.
रेल्वे स्थानकात शौचालय व्यवस्था ही बाब गरजेची आहे. अनेक तासांचा प्रवास करून आल्यानंतर प्रवाशांना शौचालय असणे गरजेचे असते. डायबिटीजच्या रुग्णांना ठराविक कालावधीनंतर मूत्र विसर्जनाची आवश्यकता असते. त्यामुळे अशा लोकांची सध्या मुकुंदवाडी रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह बंद असल्यामुळे परवड होत आहे. सद्यस्थितीला येथील स्वच्छतागृह कुलुपबंद अवस्थेत उभे आहे. स्वच्छतागृह सुरू व्हावे यासाठी अनेक प्रवाशी आणि सामाजिक संस्था स्टेशन व्यवस्थापकांकडे तक्रार करीत आहेत.