छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, शहर अभियंता आविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य उद्यान अधिकारी डाॅ. विजय पाटील यांनी पर्यावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरात व्हर्टिकल गार्डन, खुल्या जागांवरील अतिक्रमणे काढून तिथे हरितपट्टे विकसित केले. याच धर्तीवर जालना रोडलगत सिडको एन - दोन श्रीराम नगर कमान ते चिकलठाणा विमानतळ सुरक्षा भिंतीलगत हरितपट्टा विकसित करण्यात येत आहे.
हा एक चांगला उपक्रम राबविला जात असतानाच येथील हरितपट्ट्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कऱ्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपनाच्या पाट्या लावून सह्याद्री हाॅस्पिटलसह हरिओम होलसेल टेक्सटाईल मार्केट व न्यूलाईफ नस स्पाईन सेंटर समोर हरितपट्ट्यांत वृक्षारोपनाऐवजी चक्क वाहनतळासाठी केला जातोय. विशेष म्हणजे महापालिका उद्यान अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजाऊनही बड्यांचा उद्योग सुरूच आहे. त्यामुळे याप्रकरणात नेमका कुणाचा आशिर्वाद आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.ग़क
या गैरप्रकाराकडे मात्र संबंधित उद्यान विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इतर उद्योजक करत आहेत. धक्कादायक म्हणजे हरितपट्ट्यात टपऱ्या आणि चहा नाश्त्याचे ठेले तसेच आहेत. याशिवाय थेट हरितपट्ट्यात भाजपचा एक कार्यकर्ता बांधकाम साहित्य विक्री करत असल्याचे पाहणीत समोर आले आहे.
कुठे वाहनांची पार्किंग तर अनाधिकृत दुकाने या भागात थाटण्यात आली असल्याने ठेकेदाराला हरितपट्ट्यात वृक्षारोपन करणे, वृक्षसंवर्धव व जतन करण्यासाठी तार फेंसिंग करणे आदी कामांना मोठा अडथळा होत आहे. महापालिका अधिकाऱ्यांव राजकीय दबाब असल्याने येथे पार्किंगसाठी तार फेंसिंगचे काम चेहरे पाहून तूटक तूटक केले जात असल्याची चर्चा या भागात जोर धरत आहे. मात्र आमच्यावर कुणाचाही राजकीय दबाब नाही, आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाहीत, हरितपट्ट्यात अवैध पार्किंग व अतिक्रमण करणाऱ्यांना ती हटवन्याबाबत दोनदा नोटीसा बजावल्याचा दावा मुख्य उद्यान अधिकारी डाॅ. विजय पाटील यांनी केला आहे.
येत्या आठ दिवसांत श्रीरामनगर कमान ते विमानतळाची सुरक्षाभिंतीपर्यंत संपूर्ण तारफेंसिंग करून अखंडीत हरितपट्टा विकसित केला जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
सिमेंटच्या जगंलात पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा यासाठी सिडकोने जागोजागी हरित पट्टे ठेवले, झाडे लावली. हायकोर्ट ते चिकलठाणा विमानतळ या जालनारोडलगत व्हीआयपी मार्गावर प्रामुख्याने हरितपट्टे ठेवण्यात आले आहेत. मात्र, हेच हरितपट्टे गिळंकृत करण्याचे काम काही महाभागांनी सुरू केले आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांनी पर्यावरणातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरात व्हर्टिकल गार्डनची संकल्पना राबवली. उड्डाणपुलाच्या भिंती, नाले-नदीवरच्या पुलांच्या भिंतींवर उद्याने विकसित केली.
प्रदुषणाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर शहर 'रेड झोन'मध्ये आहे. वायू प्रदूषण वाढल्यामुळे शहर धोक्याच्या पातळीवर आहे. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला जातो, परंतु मागील काही वर्षात हा अहवाल प्रसिध्द झाला नाही. त्यामुळे पर्यावरण व प्रदुषणाच्या पातळीवर शहर नक्की कसे आहे, याबद्दल स्पष्टता झालेली नाही.
पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांच्या मतानुसार शहर 'रेड झोन'मध्ये आहे. शहर वायू प्रदुषणातून बाहेर पडावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून काही ठिकाणी ऑक्सिजन हब तयार करण्याचा प्रयत्न झाला. त्यात प्रामुख्याने सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट पर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. त्याशिवाय जालाननगर, पारिजातनगर, हर्सुल तलावाचा परिसर, आमखास मैदान, धुत हाॅस्पीटल, हायकोर्ट परिसरलगत, चिकलठाणा विमानतळासमोरील जालनारोड , दिल्लीगेट हिमायतबागलगत या ठिकाणच्या ऑक्सिजन हबचा समावेश आहे. काही वॉर्डांमध्ये देखील दोन-पाच एकर क्षेत्रावर ऑक्सिजन हब तयार करण्यात आले आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानांपैकी काही उद्यानांच्या विकासाचे, देखभाल दुरुस्तीचे काम देखील महापालिकेने हाती घेतले आहे, त्यामुळे वायू प्रदुषण कमी होईल, असे मानले जात आहे. केंद्र शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी यासाठी खर्च करण्यात आला आहे.
याच धर्तीवर विद्यमान महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्हीआयपी जालनारोड श्रीरामनगर कमान ते चिकलठाणा विमानतळ सुरक्षाभिंतीलगत हरितपट्टा विकसित करण्याचा निर्णय घेतला.
मात्र येथील हरितपट्टा म्हणजे चक्क वाहनांचे अवैध पार्किंगचे ठिकाण झाले आहे. येथील चहा टपरी, पान टपरी , नाश्ता सेंटर व थेट बांधकाम साहीत्याची विक्री अशी अनेक छोटी-मोठी दुकाने येथे बिनधास्तपणे थाटली आहेत. झाडे कमी आणि अतिमक्रण अधिक अशी स्थिती झाल्याने हा हरितपट्टा पूर्णपणे धोक्यात आला आहे.
महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी हिंम्मत दाखवल्याने अखेर येथील काही अतिक्रमणे काढून महापालिका निधीतून हरितपट्ट्यात वृक्षारोपन केले गेले. एका बाजुने तार फेंसिंग करून येथील वृक्षसंवर्धन व जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदार जलील सिद्दीकी यांना हे काम देण्यात आले.
ठेकेदाराने काही प्रतिष्ठानांसमोर खुल्या जागेत वृक्षारोपन करून तारफेसिंगही केली. काही टपरीधारक व बड्या रूग्णालयांसह उद्योजकांना महापालिका उद्यान विभागातील अधिकार्यांनी नोटीसाही बजावल्या. मात्र येथील हरितपट्टा परिसराची परिस्थिती अद्याप बदलली नाही. स
ह्याद्री हाॅस्पीटल व हरिओम होलसेल टेक्सटाईल मार्केट व न्युलाईफ नस स्पाईन केअर सेंटर समोर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या हस्ते वृक्षारोपनाची पाटी लावून चक्क हरितपट्ट्याचा वाहनतळासाठी वापर केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिका उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दोनदा नोटीसा बजाऊनही असा प्रकार कायम आहे. त्यामुळे हरितपट्टे गिळंकृत करणाऱ्यांना आशिर्वाद कोणाचा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.