औरंगाबाद (Aurangabad) : सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी औरंगाबाद ते चिकलठाणा रेल्वे मार्गावर चिकलठाणा, शिवाजीनगर, फुलेनगर येथे भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र तीन वर्षांपासून या भुयारी मार्गाचे काम प्रलंबित आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कऱ्हाड, राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार ऐवढे मंत्रिमहोदय स्थानिक भागातील असूनही, या भुयारी मार्गासाठी प्रतिक्षा का करावी लागते आहे, हे सर्व मंत्री नेमके करतात काय, असा प्रश्न औरंगाबादकर आता विचारू लागले आहेत.
औरंगाबाद रेल्वे अभियंता कार्यालयांतर्गत करमाड ते अंकाई पर्यंतचा भाग येतो. या भागात अनेक ठिकाणी आजही मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी रेल्वेने भुयारी मार्ग तयार केले. यात करमाड आणि शेंद्रा भागातील भुयारी मार्गाचा समावेश आहे. याशिवाय रेल्वे स्टेशनहून मनमाडकडे जाताना रेल्वे गेट ५१च्या पुढील रेल्वे क्रॉसिंगही बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर औरंगाबादच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे वाहतूक करण्याची गती वाढविण्यासाठी रेल्वे रुळाखाली वाहनांना जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार चिकलठाणा, बाळापूर, शिवाजीनगर, फुलेनगर, रेल्वे क्रॉसिंग बंद करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
बाळापूर, फुलेनगरात जागेची अडचण
मुकूंदवाडी रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर विमानतळाच्या भिंतीच्या बाजूला राजनगरकडे जाणाऱ्या वाहनांना फुलेनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर थांबावे लागते. अनेकदा अर्धा ते पाऊण तासापेक्षा अधिक काळ हा मार्ग बंद असतो. या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याची गरज व्यक्त होत आहे. मात्र याठिकाणी जागेची मोठी अडचण असल्याने स्थानिक महापालिका प्रशासनाने भुयारी मार्गासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास भुयारी मार्ग करता येईल, असे रेल्वे अभियंता कार्यालयामार्फत सांगण्यात आले.
टेंडर निघाले, घोडे कुठे अडले...
चिकलठाणा रेल्वे क्राॅसिंगवर भुयारी मार्गासाठी २०२९ मध्येच टेंडर काढलेले आहे. यासाठी ४० कोटी रुपये मंजूर आहेत. येथे रस्त्याचीही अडचण नाही. कंत्राटदाराची देखील नियुक्ती केली आहे. कंत्राटदाराने बीम देखील तयार केलेले आहेत. मात्र तीन वर्षांपासून भुयारी मार्गाचे काम प्रलंबीत आहे.
भूयारी मार्ग कागदावरच
शिवाजीनगर भागात रेल्वे विभाग भुयारी मार्ग करायला तयार आहे. त्याचा आराखडा देखील रेल्वे विभागाने राज्य सरकारकडे दिलेला आहे. यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे विभागाने ४० कोटी रुपये तयार ठेवले आहेत. मात्र भूसंपादनाची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेतील नगररचना , विशेष भूसंपादन अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बेफिकीर कारभारामुळे अद्यापही शिवाजीनगर भुयारी मार्ग कागदावरच आहे.