छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : संग्रामनगर पाठोपाठ देवळाई आणि एमआयटी चौकातील उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे येथील तिन्ही पुलांचे काम चुकल्याची चर्चा सातारा - देवळाई आणि बीड बायपास परिसरात पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.
अधिकारी म्हणताहेत...
देवळाई चौकाला जोडणारा वाणी मंगल कार्यालय ते शिवाजीनगर रेल्वेगेट ते देवळाई चौक या ठिकाणी ५.५ मीटर अर्थात १८ ते २० फूट खोलीचा रेल्वे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्या भुयारी मार्गाचा खालचा स्तर आणि देवळाई चौकातील जमीनस्तर मॅच करण्यासाठी देवळाई चौकातील उड्डाणपुलाखाली खोदकाम करण्यात येत आहे. यात रेल्वेने तयार केलेले भुयारी मार्गाचे व पीडब्लूडीने तयार केलेल्या उड्डाणपुलाचे डिझाइन मॅच केले जाणार आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या तांत्रिक शाखेच्या सूचनेनुसारच हे काम होत आहे. खोदकामानंतर पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, काम अंत्यंत दर्जेदार आणि भविष्यात वाहतुकीला अडथळा येईल, असे होणार नाही. तांत्रिकदृष्ट्या डिझाइन प्रमाणेच काम होणार आहे. नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन पीडब्लूडीच्या जागतिक बॅंक प्रकल्पाच्यावतीने करण्यात आले आहे.
बीड बायपासवरील संग्रामनगर पुलाची उंची कमी झाल्याने उड्डाणपुलाच्या खाली वाहने अडखळत आहेत. दरम्यान, येथील पुलाच्या उंचीबाबत 'टेंडरनामा'ने वृत्त प्रकाशित करताच पुलाखालील रस्त्यापासून पुलाची उंची साडेपाच मीटर आहे, जमीनस्तरापासून पुलाची उंची ३.८ मीटर, तर जमीनस्तरापासून १.७ मीटर खोल भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्ग ते उड्डाणपूल ही उंची ५.५ मीटर होते, असा खुलासा जागतिक बॅंक प्रकल्पाच्यावतीने करण्यात आला होता.
पुलाखालील अंडरपाससाठी पुलाखाली आणि पुलाच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम केले गेले. त्यावर काॅंक्रिट रस्ते तयार करून अंडरपास वाहतुकीस खुला देखील करण्यात आला आहे. मात्र अंडरपासमध्ये मोठी वाहने अडखळल्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याने या भागातील नागरिकांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरताना दिसते आहे.
जलवाहिनीमुळे रखडले रस्त्याचे काम
दरम्यान, संग्रामनगर चौकाला जोडणाऱ्या आमदार रस्त्याकडून जलवाहिनीचे काम सुरू आहे. परिणामी अंडरपासला हा रस्ता अद्याप मॅच न केल्याने येथे अपघाताचा ब्लॅक स्पाॅट तयार झाला आहे. संग्रामनगर, एमआयटी आणि देवळाई चौकात कुठेही पाणी साचणार नाही. डिझाइनमध्ये स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेचा समावेश केलेला आहे. त्यामुळे अंडरपासमधून आणि रस्त्यातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल, नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन देखील संबंधित विभागामार्फत करण्यात येत आहे.