औरंगाबाद (Aurangabad) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) चिकलठाणा ते शेंद्रा एमआयडीसीपर्यंतची पाइपलाइन दुरूस्त करूनही एअर व्हाॅल्व्हला अनेक ठिकाणी लिकेजचा संसर्ग झाला आहे. या लिकेजमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. दुसरीकडे महापालिकेच्या एअर व्हाॅल्व्ह आणि कुजलेल्या जलवाहीनीतून देखील दररोज अनेक एमएलडी पाण्याची नासाडी सुरू आहे. शहरात महापालिकेच्या जलवाहिनी आणि एअर व्हाॅल्हवला दोनशे ते अडीचशे ठिकाणी लिकेजची समस्या उद्भवल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे पाण्याची नासाडी होत असताना दुसरीकडे पाणी पुरवठ्यावरही परिणाम होत आहे.
औरंगाबादकरांना दहाव्या दिवशी देखील पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये 'जलयुद्ध' सुरू झाले आहे. पाणी पुरवठा होणार की नाही, याविषयी अधिकारीच शंका घेत आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या नाथसागर ते क्रांतीचौक दरम्यान जलवाहीनी आणि एअर व्हाॅल्व्हला देखील अनेक ठिकाणी लिकेज झाल्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत आहेत. टेंडरनामा प्रतिनिधीने सिडको-हडको, गारखेडा, मिटमिटा, पडेगाव, भावसिंगपुरा, शहागंज, औरंगपुरा, हर्सुल नारेगाव, चिकलठाणा व अन्य भागात पाइपलाइनची पाहणी केली असता अनेक ठिकाण लिकेज झाल्याचे दिसून आले. नाथसागर ते विटखेडा गावापर्यंत अनेक ठिकाणी काही गावकऱ्यांनी जलवाहिनीसह व्हाॅल्व्हला बोअर मारून औरंगाबादकरांच्या पाण्यावर डल्ला मारल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे अनेक शेतकरी, बिल्डर यांनी अनधिकृतपणे पाणी 'पळवले'च, पण काहींची थेट जलवाहिनीलगत असलेल्या विहिरीत पाणी ओतण्यापर्यंत मजल गेली आहे. या मार्गावर जलवाहिनी फोडून पाणीचोरी कुणाच्या आशिर्वादाने होऊ शकते, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणी टंचाईचा सामना पाचवीलाच पुजलेला आहे. शिवाय जागोजागी लिकेजचे प्रमाण वाढल्याने अनेक भागात दुषित पाणी पुरवठ्यामुळे सिडकोतील अयोध्यानगर भागात गॅस्ट्रोची लागण झाल्याचा आरोप रवी तांगडे यांनी केला आहे.
पाण्यासाठी भरमसाठ खर्च
एकीकडे दहा - दहा दिवस निर्जळी, तर दुसरीकडे तीव्र पाणी टंचाईमुळे खाजगीत जार आणि टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली असून, दुषित पाण्यामुळे उपचारासाठी देखील खर्च करावा लागत असल्याने औरंगाबादकराच्या खिशाला पाण्यासाठी चांगलीच झळ सोसावी लागत आहे.