छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : समृद्धी महामार्गावरील नागपुरात होऊ घातलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम फुलझाडांचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. यावर एका विश्वसनीय सुत्राच्या मते साडेपाच कोटींचा खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, हे काम मूळ कंत्राटदाराऐवजी उपकंत्राटदारांकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने समृध्दी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजा दरम्यान नैसर्गिक ऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव सजावटीचे कामासंदर्भात सदर काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. यातील आर्टिफिशियल फुलझाडांची व कोरीव दगडांची संख्या, त्याती प्रति नग किंमत किती, सदर कामाची टेंडर संचिका, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, कोणत्या कंत्राटदाराला या कामाची किती देयके देण्यात आली, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे ही सविस्तर माहिती मागितली असता त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कामात मोठे गौडबंगाल असल्याचा संशय बळावत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, या कामाची माहितीच कार्यालयाकडे प्रास्तावित दिनांकापर्यंत उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती थेट टेंडरनामा प्रतिनिधीला दिली आहे. मग ही कामे महामार्गावर कोणत्या कंत्राटदाराने कोणत्या लोभापायी केली, असा सवाल उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजापर्यंत नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव दगडांच्या सजावटीचे काम काही महिन्यांपासून एमएसआरडीसीने हाती घेतले आहे.
महामार्गावर अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून कृत्रिम फुलांमार्फत ब्रेक लावण्याचा हा उपक्रम हाती घेतल्याचा दावा या विभागाने केला होता. समृद्धी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजापर्यंत नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव दगडांच्या सजावटीचे काम काही महिन्यांपासून एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. महामार्गावर अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून कृत्रिम फुलांमार्फत ब्रेक लावण्याचा हा उपक्रम असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून या या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळेच अनेकांचे बळी गेले. मार्गाच्या आजूबाजूला काहीही वृक्षवल्ली, हिरवळ चालकांना दिसत नसल्यामुळे ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊन अपघात होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी मध्यंतरी काढला होता. दुभाजकातील नैसर्गिक हिरवळीची वाढ होईपर्यंत कृत्रिम उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विविध प्रकारची कोरीव शिल्प व आर्टिफिशियल फुलझाडांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता.
ही कामे हिवाळी अधिवेशनाआधी मोठ्या धुमधडाक्यात चालू केली मात्र ही कामे चालू करताना कोणत्याही प्रकारे ई-टेंडर प्रक्रियेची व कोणत्याही वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध न करता मर्जीतील त्याच मूळ कंत्राटदारामार्फत ओळखीच्या उपकंत्राटदारांना वाटप केल्याचा उद्योग काही अधिकाऱ्यांनी केला. याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाकडे टेंडरनामा प्रतिनिधीला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या संपूर्ण कामांची कोणतीही माहिती कार्यालयात नसल्याचे उघड झाले आहे.