छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-पाच टाऊन सेंटर कॅनाॅट प्लेस बाजारपेठ भागातील 'पे ॲन्ड पार्क' बंद करण्यासंदर्भात कॅनाॅट व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (ता. ६) रोजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात सिडकोतील कॅनाॅट प्लेस भागात मोबाईल दुरूस्ती व विक्री केंद्र तसेच झेराॅक्स आणि टायपिंग सेंटर तसेच चहा व खाद्य पदार्थाची दुकाने आहेत.येथे येणारा ग्राहक किरकोळ खरेदी करण्यासाठी तसेच चहा-नाश्त्यासाठी येतो. ५० ते १०० रूपयापलिकडे त्याची जास्त खरेदी नसते. महापालिकेने येथे पे ॲन्ड पार्किंगचे नियोजन करताना सर्वसामान्य ग्राहकांचा प्राधान्याने विचार करावा. 'पे ॲन्ड पार्क' धोरण लागु केल्यापासून येथील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. गेल्या दहा दिवसापासून बाजारपेठ ठप्प झाली आहे. २५ टक्केही धंदे येथे शिल्लक नाहीत. यामुळे येथील टर्न ओव्हर कमी झाल्याने महापालिकेचा मालमत्ताकर , पाणीपट्टी, वस्तु व सेवाकर, आरटीओचा वाहतूककर व इतर कराचा बोजा कॅनाॅट गार्डन व्यापाऱ्यांनी कसा फेडावा, येथे नौकरांना दररोज पगार दिला जातो, त्याचा रोजभाग देखील निघत नाही.
कॅनाॅट उद्यानाच्या चौफेर बाजुने छोट्या गाळ्यांची निर्मिती करताना तत्कालीन सिडको प्रशासनाने दुकानांची उभारणी करताना योग्य दक्षता घेतली नाही.दुकानांपुढे उंचवटा उभारून फुटपाथ केला परिणामी गाड्या रस्ता शोल्डरमध्ये उभ्या असतात. दुकांनासमोर ऊन, पाऊस, थंडी व वारा-वादळापासून संरक्षण मिळावे यासाठी दुकान्याच्या स्लॅबपुढे अतिरिक्त स्लॅब टाकुन पडदी टाकली नाही. परिणामी ग्राहक आणि व्यापार्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यात रस्ते आणि फुटपाथला कुठलाही अडथळा निर्माण न करणारे शेड येथील व्यापाऱ्यांनी स्वखर्चातून टाकले होते. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून महानगर पालिका अतिक्रमण विभागाने व्यापारी आणि ग्राहकांची सावली काढून टाकली. सद्यःस्थितीत व्यापार्यांना आणि ग्राहकांना कडक उन्हाचा मोठा त्रास होत आहे. नियोजनशुन्य प्रकल्प उभा करणार्या सिडको प्रशासनामुळे अवकाळी पावसाचे पाणी थेट दुकान्यात शिरत असल्याने कोट्यावधीचे नुकसान होत आहे.
अशा आहेत व्यापाऱ्यांच्या मागण्या
● आम्हाला तत्कालीन सिडको प्रशासनाने दुकानांना लागुन स्लॅब टाकुन द्यावा अथवा महानगरपालिकेला पत्र देऊन शेड उभारण्याची परवानगी घेऊन द्यावी.
● येथील बाजारपेठ आणि ग्राहकांची संख्या लक्षात घेता कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्यात यावी.
● विना टेंडर ठेकेदाराला पार्किंगचा ठेका कसा काय देण्यात आला, याची चौकशी करण्यात यावी.
● कॅनाॅट प्रकल्प साकार करताना एक एकर उद्यान दाखवन्यात आले. सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर उद्यानाची वाट लागली. परिणामी उद्यानप्रेमींनी पाठ दाखवली आहे. एकेकाळी सिडकोच्या काळात छोट्या - मोठ्यांच्या किलबिलाटाने बहरणारी बाग आज पुर्णतः वाळून गेली. या उद्यानाकडे पुन्हा उद्यान प्रेमींनी बागडायला यावे , अशी उद्यानाची दुरूस्ती करावी.
● कॅनाॅट उद्यानात लाखो रूपये खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे शो- पीस ठरत आहेत. त्यांची दुरूस्ती आवश्यक.
● फटाके वाजवत फिरणाऱ्या बुलेट स्वारांमुळे येथील महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. कॅनाॅटमधे रस्त्यांवर ठाण मांडून बसणाऱ्या उनाडांचा बंदोबस्त करण्यात यावा.
कारभाऱ्यांचे दुर्लक्ष ; मंत्री महोदय दखल घेणार का?
अशा मागण्या यापूर्वीच महापालिका व पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत कॅनाॅट प्लेस व्यापारी असोसिएशनचे शिष्ट मंडळाने केंद्रिय अर्थ व राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांना निवेदन दिले. यावर सर्वांना विश्वासात घेऊनच यासंदर्भात महापालिका, सिडको व पोलिस प्रशासनाची बैठक घेऊन चर्चा करतो व आपल्या प्रत्येक समस्यांचे निराकरण केले जाईल, अशी ग्वाही कराड यांनी दिली. व्यापारी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज त्यांना निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.मात्र आता मंत्री महोद्य कितपत व्यापाऱ्यांना साथ देतात, याकडे 'टेंडरनामा'चे लक्ष असेल.
भाजप अध्यक्षांचा पाठींबा
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष शिरिष बोराळकर यांनी देखील व्यापाऱ्यांच्या वतीने डाॅ. कराड यांना येथील 'पे ॲन्ड पार्क'चे धोरण अयोग्य असल्याचे म्हणत ते तातडीने रद्द करावे, असे म्हणत व्यापारी शिष्टमंडळाला पाठींबा दिला.