औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी महापालिकेकडून व्हर्टीकल गार्डन व कारंजी (Vertical Garden and Fountains) तयार केली जात आहेत. १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून होत असलेल्या या कामांवर जवळपास पाच कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जात आहेत. या कामांचा विकास आराखडा डाॅ. गीतांजली कौशिक यांच्यामार्फत करण्यात आला असून, १२ टक्के कमी दराने टेंडर भरलेल्या यशस्वी मुबारक पठाण व जलील उद्दीन सिद्दीकी या दोन ठेकेदारांना हे काम देण्यात आल्याचे उद्यान विभाग प्रमुख डाॅ. विजय पाटील (दहिहंडे) यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.
महापालिकेला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून शहरात ठिकठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून, त्यासोबतच शहरातील विविध उद्याने आणि चौकांमध्ये कारंजे उभारण्यात येत आहेत. नाल्यांमध्ये कचरा टाकू नये म्हणून लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवरच व्हर्टिकल गार्डन तयार करण्याची संकल्पना डाॅ. विजय पाटील यांनी मांडली. त्याचा पहिला प्रयोग शहरातील सिध्दार्थ उद्यानासमोरच राबवण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर महावीर चौक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी तसेच कर्णपुरा यात्रेकडून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी, नागेश्वरवाडी नाल्यावर, औरंगपुरा भाजी मंडई, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाण पुलाखाली चौकात आणि समोरील भागात व्हर्टिकल गार्डन तयार केली जात आहेत. याकामासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च होत आहेत.
आठ चौकांत कारंजे
दमडी महल चौक, जुना मोंढा निजामकालीन कारंजे, सिडकोतील पिरॅमिड चौक, दिल्लीगेटच्या समोर (पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन), कलाग्रामसमोरील रस्त्यावर, महावीर चौक, सिडकोतील वसंतराव नाईक उड्डाणपुलाखाली, शहानूरमियाँ दर्गा चौक आदी आठ चौकात कारंजे उभारणीचे काम सुरू झाले आहे. या कामांवर २.५० कोटी रुपये खर्च होत आहेत.
महापालिकेच्या विविध उद्यानांमध्येही जुनी व बंद पडलेली कारंजे आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम देखील सुरू आहे. त्यानुसार सिद्धार्थ उद्यान, स्वामी विवेकानंद उद्यान, सलीम अली सरोवरासमोरील, ज्योतीनगर येथील कवितेच्या बागेत कारंजे दुरुस्तीवर दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.