औरंगाबाद (Aurangabad) : ऐन सणासुदीच्या काळात औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील एक्सलेटर (सरकता जिना) बंद पडले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने जरी लिफ्टची सोय केली असली तरी ती अपुरी पडत असल्याने प्रवाशांना जिने चढताना कसरत करावी लागते आहे. वरीष्ठ नागरीक, तसेच लहान मुलांना गाडी आल्यावर प्लॅटफॉर्मवर येताना किंवा जाताना या सरकत्या जिन्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होते.
तीन लाखांची आवश्यकता
यासंदर्भात प्रतिनिधीने रेल्वेच्या विद्यूत विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता हनुमंतराव यांना विचारले असता केवळ प्लॅटफाॅर्म क्रमांक एकवरील एक्सलेटरचा बेल्ट तुटला आहे. कंपनीचा देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपला आहे. बेल्ट बदलण्यासाठी तीन लाखांची आवश्यकता आहे. यासंदर्भात आम्ही बजेटची प्रोव्हिजन करून संबंधित कंपनीला कळवले आहे. दोन दिवसात काम सुरू करणार असल्याचे ही ते म्हणाले. बंद असलेल्या एक्सलेटर जवळ समन्वयक बसवलेला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत तो चालू होऊन प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी रेल्वे प्रशासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट्यावधीचा खर्च ; दर्जावर प्रश्न
औरंगाबाद रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफाॅम क्रमांक एक व चार येथे दोन ठिकाणी एक्सलेटर (सरकते जीने) रेल्वे प्रशासनाने बसवलेले आहेत. २०१७ मध्ये रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात टेंडर काढल्यानंतर चेन्नईच्या जाॅन्सन लिफ्ट अॅंड एक्सलेटर या कंपनीकडून ते बसविण्यात आले होते. यासाठी जवळपास एक कोटी रूपये खर्च आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र हे सरकते जिने बसवल्यानंतर काही दिवसात अर्थात २०१७ मध्येच म्हणजे दोष निवारण कालावधीतच बंद पडले होते. आजतागायत सदर जिने पाच ते सहा वेळा बंद पडल्याने त्यांच्या दर्जावर प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निकृष्ट एक्सलेटर
यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता १५ ऑगस्ट २०२१ रोजी औरंगाबाद रेल्वे स्थानकातील वरिष्ठ विद्यूत अभियंता तसेच जाॅन्सन कंपनीचे नाशिक विभागाचे सहाय्यक अभियंता एस. प्रकाश यांनी पाहणी करून १ सप्टेंबर २०२१ रोजी फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. असे असताना आजही सरकता जिना बऱ्याच वेळा बंद अवस्थेत असतो, त्या मुळे वृद्ध, आजारी किवा अपंग माणसांची गैर सोय होते. ऐन सणासुदीच्या सुट्टीच्या दिवसात स्थानकावर प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी पण होत आहे. रेल्वे प्रशाशनाने त्वरित लक्ष घालून सदर सरकते जिने लवकरात लवकर चालू करावेत जेणे करून लोकांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.