औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या (Aurangabad Railway Station) दुर्देशेला जबाबदार कोण? या मथळ्याखाली 'टेंडरनामा'ने १२ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी (ता. २७) रोजी दिल्लीतील रेल्वे भवनात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या विकासासंदर्भात बैठक घेतली. यात रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या विकासासंदर्भात गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
औरंगाबादेतील माॅडेल रेल्वेस्थानकाच्या बाजुलाच भव्य इमारतीच्या शेजारीच जुनी कुलूपबंद इमारत, आत बाहेर कचरा, नव्या इमारतीत किळसवाणे कँटीन, सुरक्षेबाबत बोंब... नावालाच असलेले मेटल डिटेक्टर, खराब विद्युत उपकरणे आणि गळणारे पर्यटन केंद्र... बंदिस्त प्रथमोपचार केंद्र, जिकडे-तिकडे लोळत पडलेले गर्दूले आणि स्थानकाच्या आत - बाहेर रिक्षाचालकांची दादागिरी, अशी परिस्थिती आहे.
औरंगाबादच्या माॅडर्न रेल्वेस्थानकाच्या अशा गचाळ स्थितीवर 'टेंडरनामा'ने प्रहार केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या माॅडेल रेल्वे स्टेशनच्या रेंगाळलेल्या कामांना गती देण्यासाठी बैठक घेतल्याने विकासाच्या वाटा खुल्या होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.आता माॅडेल रेल्वे स्थानकाच्या शेजारी जुन्या इमारतीचा दुसरा टप्पा आणि तिसर्या टप्प्यातील विकासकामे आणि स्थानकासमोर सुशोभिकरण पाथ-वे, खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या विकासकामांचा मार्ग मोकळा होईल.
तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २०१५ रोजी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील इमारतींचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता; परंतु काम झालेच नाही. आता दानवेंच्या बैठकीनंतर पुन्हा असे होऊ नये, अशी औरंगाबादेत चर्चा आहे.
रेल्वे स्थानकाच्या आत - बाहेर रिक्षाचालकांच्या दादागिरीचा मुद्दा टेंडरनामाने उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यात रेल्वे स्थानकावर रिक्षाचालक दादागिरी करत असल्याच्या तक्रारी असल्याचे म्हणत कुठेही रिक्षा उभ्या केल्या जातात, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. बेशिस्तीने वागतात, असे म्हणत रिक्षाचालकांना चांगलेच खडसावले.