छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : समस्त छत्रपती संभाजीनगरकरांचे लक्ष लागलेल्या शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथे भुयारी मार्गासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बांधकाम काढण्याच्या कारवाईला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
शहराच्या दक्षिण दिशेला असलेल्या शिवाजीनगर रेल्वेगेट आणि रेल्वेगेट ते देवळाई चौक या अरुंद रस्त्यामुळे अनेक दशकांपासून निर्माण होणारी वाहतूक कोंडी अखेर दूर होणार आहे. येथील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या ७ मालमत्तांच्या भूसंपादन प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
या सर्व मालमत्तांचे बाधित क्षेत्र पाडून तातडीने रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे तब्बल तीन दशकानंतर हा मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिका, विशेष भूसंपादन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून जलदगतीने काम सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या दक्षिणेकडील सर्वात जुने प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर रेल्वेगेट ते देवळाई गावातून येणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक दशकांपासून मोकळा श्वास घेण्याच्या प्रतिक्षेत होता. त्यासाठी यापूर्वी उड्डाणपुलासाठी शिवाजीनगर रेल्वेगेट येथे सन २०१८ मध्ये भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने संयुक्तरित्या मोजणी करून भूसंपादन प्रक्रिया केली होती. मात्र तांत्रिक दृष्ट्या येथे उड्डाणपुलाचे बांधकाम अयोग्य असल्याचा मुद्दा काही विभागातील अधिकाऱ्यांनी पुढे केला.
त्यानंतर रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पाहणी करून सर्वानुमते येथे भुयारी मार्गाचा पर्याय योग्य असल्याचे सुचविले. मात्र पुढे भुयारी मार्गासाठी निधी द्यायचा कोणी यावर निर्णय न झाल्याने अनेक वर्ष हे काम रखडले होते.
अखेर महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने खर्चाची जबाबदारी घेतल्याने शिवाजीनगर भुयारी मार्गाचा तिढा सुटला. विशेष म्हणजे भूसंपादनाचा खर्चही शासनाने दिल्याने शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक ५५ येथील भुयारी मार्गासाठी २४ मीटर रस्ता रूंदीकरणासाठी अखेर आजपासून कामाला सुरुवात केल्याने आणि या मार्गावरील बाधीत मालमत्तांच्या भूसंपादनाची जबाबदारी पार पाडल्याने भूयारी मार्गाचा तिढा आता सुटला आहे.
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल...
शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर असलेले बांधकाम काढून घेण्यासाठी प्रशासनाने भूखंडधारकांना दोन दिवसांचा वेळ दिला होता. तो वेळ शुक्रवारी संपला असल्याने, आज बांधकाम पाडून रस्ता मोकळा करण्याची कारवाई केली जात आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.