औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहरातील सिडको एन - १ ए सेक्टर परिसरातील ग्रीन बेल्टमध्ये असलेल्या उद्यानाची दुरावस्था 'टेंडरनामा'ने उघड केली होती. जंगलाचे स्वरूप प्राप्त झालेल्या आणि जीम साहित्यासह बाकड्यांची अतिशय भयान अवस्था झाल्याचे समोर आणले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्या आदेशाने उद्यान अधीक्षक डाॅ. विजय पाटील यांनी उद्यान निरिक्षक संतोष नरवडे यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांमार्फत झाडाझुडपांसून, कचरा आणि पालापाचोळ्याची विल्हेवाट लावण्याचा आदेश दिल्यानंतर या उद्यानाने अखेर मोकळा श्वास घेतला. दरम्यान, माजी नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे यांनी देखील उद्यानाची पाहणी करून उद्यान चकाचक करून घेतले.
गेल्या तीन दिवसापूर्वीच 'टेंडरनामा' ने सिडको एन - १ ए सेक्टरमधील उद्यानाबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी संबंधित विभागामार्फत या उद्यानाची तातडीने स्वच्छता केली. येथील वाढलेले रानगवत आता काढण्यात आले असले तरी उद्यानात लहान मुलांसाठी जास्तीत जास्त खेळण्या बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या उद्यानाच्या आजूबाजूच्या परिसरासह आवारात फोफावलेले रानगवत, चिखल अन् दलदल, कचऱ्याचे आणि पालापाचोळ्याचे ढीग, प्रवेशद्वाराची दुरवस्था झाली होती. हायप्रोफाइल मध्यवस्तीतल्या उद्यानाची अशी जंगलसदृश अवस्था होऊन देखील मनपाच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे उद्यानाची स्वच्छता करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली होती.
अशी तत्परता नेहमी दाखवा
उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचे प्रमाण जास्त दिसून येत असून, उद्यानाच्या प्रवेशद्वार सताड उघडे असल्याने दिवसरात्र येथे इतर भागातील काही उनाडांचा वावर दिसतो. सोबतच येथील जीम साहित्याची ऑईलींग व ग्रीसींग करण्याची आवश्यकता आहे. उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्ण वेळ कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. येथे नियमित साफसफाई, देखभाल करण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात उद्यानात आजुबाजूच्या रस्त्याने वाहणारे पाणी जमा होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. उद्यानात हिरवळ तयार करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.