औरंगाबाद (Aurangabad) : येथील चिकलठाणा एमआयडीसी हद्दीतील जालनारोड ते मेरिडीयन लाॅन्स, भारत बाजार ते प्रोझोन माॅल दरम्यानच्या रस्त्यावर अनधिकृत वाहने उभी असल्याने वाहतुकीला अडथळे, अशी वृत्तमालिका ‘टेंडरनामा’ने प्रकाशित केली. सातत्याने यासंदर्भात पोलिस आयुक्त आणि महापालिका प्रशासकांकडे पाठपुरावा केला. अखेर सिडको वाहतूक शाखा आणि एमआयडीसी पोलिस प्रशासनाने रस्त्यावरील वाहने हटवून यापुढे तेथे वाहन लागू नये यासाठी कायमस्वरुपी दोन पोलिस कर्मचारी उभे केले आहेत. यानंतर या संपूर्ण मार्गावर बॅरिकेट्स लावले जाणार आहेत. आता या मार्गावर वाहने लावल्यास कडक कारवायीचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक दिवसांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
जालनारोड - प्रोझोन माॅल ते कलाग्राम हा मुख्य वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर दोन्ही बाजुला स्माॅलस्केल इंडस्ट्रीज, महागडा प्रोझोन माॅल आणि काही लाॅन्स, शोरूम आहेत. विशेष म्हणजे भारत बाजार समोर गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांनी निम्मा रस्ता गिळंकृत करून चारचाकी वाहनांची रस्त्यावरच दुरूस्ती केल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत होता. याच भागातील अनेकांनी पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन प्रशासनाकडे येथील वाहने हटविण्याची मागणी केली होती. मात्र महापालिका व पोलिस प्रशासनाकडून या समस्येची दखल घेतली जात नव्हती.
'टेंडरनामा'च्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, एमआयडीसी व वाहतूक शाखेतील पोलिस प्रशासन जागे झाले आहे. दोन्ही विभागाने कारवाई करत या रस्त्यावरील संपूर्ण वाहने हटविली. केवळ वाहनेच हटविले नाही तर भारत बाजारातील वाहन दुरूस्ती करणाऱ्यांना मोठा दंडही भरावा लागेल, याशिवाय तीन गॅरेजधारकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. यापुढे या मार्गावर कुणीही वाहने लावू नयेत यासाठी नो पार्कींग फलक जागोजागी लावण्यात आले. शिवाय सुरक्षित वाहतूक व कारवाईसाठी कायमस्वरूपी दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
रस्ता वाहतुकीसाठी मोकळा
तात्पुरते का होईना, एकदाचे या मार्गावर विशेषतः भारत बाजार समोरील वाहनांचे अतिक्रमण हटले व हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. ही कारवाई पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली. या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असले तरी या रस्त्यावर कधीच वाहनांनी रस्ता अडवू नये, यासाठी पोलिसांनी दक्ष राहण्याची मागणी नागरिकांकडून केली आहे.
'टेंडरनामा'ने मागवली माहिती
या मार्गावरील वाहतुकीची जटील समस्या पाहता 'टेंडरनामा' प्रतिनिधीने एमआयडीसी व महापालिकेतून काही व्यापारी प्रतिष्ठानांची माहिती मागवली असता, नकाशा एक आणि बांधकाम वेगळे झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. नकाशातील पार्किंगच्या जागेवर शेकडो दुकाने बांधून त्यांची विक्री करण्यात आली आहे. तर एका लाॅन्सने चक्क पार्किंगच्या जागेत हिरवळ, स्वागत समारंभ, भोजन कक्ष आणि भव्य स्टेज उभारणी केली असल्याचे दिसते आहे.