औरंगाबाद (Aurangabad) : खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर मंजूर केल्याची घोषणा आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत केली. आमदार सतीष चव्हाण यांनी खुलताबाद तालुक्यात ट्रामा केअर सेंटर संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर सावंत यांनी मंजुरी दिली.
खुलताबाद शहरालगतच सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग असून, खुलताबाद तालुका हा जगप्रसिद्ध वेरूळ लेणी तसेच धार्मिक व पर्यटनस्थळांमुळे प्रसिध्द आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. मागील पाच वर्षांत तालुक्यात जवळपास एक हजार अपघात झाले आहे. त्यामुळे याठिकाणी ट्रामा केअर सेंटरची नितांत आवश्यता आहे.
या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर मंजूर व्हावे यासाठी आरोग्य विभागाने शासनस्तरावर तीन वेळेस प्रस्ताव पाठवला मात्र अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळे याठिकाणी त्वरित ट्रामा केअर सेंटर मंजूर करावे, अशी आग्रही मागणी करून आमदार सतीष चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांच्या या मागणीला आमदार तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे तसेच सदस्य गोपीचंद परळकर यांनी अनुमोदन दिले.