औरंगाबाद (Aurangabad) : जागतिक बॅंक प्रकल्पातील विभागीय लेखाधिकारी, कार्यकारी अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम मंडळातील अधीक्षक अभियंता, तसेच सहा. मुख्य अभियंता आणि टेंडर (PWD) शाखेतील एका लिपिकासह अन्य एका शाखेतील लिपिक यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ॲथॅलेटीक सिंथेटिक ट्रॅकचे टेंडरमध्ये हस्तक्षेप करत नियम व अटींमध्ये बदल केल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी केला आहे. परिणामी साडेअकरा कोटीहून अधिक किंमतीचा हा भव्य प्रकल्प आता चौकशीसह वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
यासंदर्भात विभागीय लेखाधिकारी नरिंदर सिंग यांना 'टेंडरनामा'कडून सवाल उपस्थित होताच त्यांनी बंब यांचा गैरसमज दूर केल्याचे तर कधी त्यांचे समाधान केल्याचे म्हणत सदर कामास पात्र कंत्राटदारालाच काम दिल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे कशाचा गैरसमज दूर केला अन् त्याने माझे काय समाधान केले, असा प्रश्न उपस्थित करत बंब यांनी पुन्हा त्यांना स्मरणपत्र देणार असल्याचे 'टेंडरनामा' प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या टेंडर प्रक्रियेमध्ये शासनाचा मोठा महसूल बुडाला आहे. यात मोठा गैरव्यवहार झाला आहे. यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे. शंभर टक्के चौकशी होणारच. टाळाटाळ केल्यास मी विधिमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थित करणार आहे, असेही बंब म्हणाले.
औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात १० लेनचा सिंथेटिक ऍथलेटिक ट्रॅक, तसेच नैसर्गिक टर्फ, हॉकी आणि फुटबॉल ग्राउंडचा विकास, संलग्न खेळांसह डी-पोर्शन, लेडीज आणि जेंट्स चेंजिंग रूम आणि टॉयलेट, तसेच याच आवारात विद्यमान ट्रॅक सुविधेवर एक लाख लिटर क्षमतेचा स्विमींग ट्रॅक आदी विकास आराखड्याचे ई-टेंडर २०२२ मध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र यात एका मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट दिल्याचा आरोप या टेंडर प्रक्रियेतील इतर चार स्पर्धकांनी केला आहे.
असे होते सहा कंत्राटदार
या विकसित कामाच्या टेंडरप्रक्रियेत अतुल पाटील जे.व्ही. शिवनरेश स्पोर्टस प्रा. लि.; पी. आर. पाटील ॲन्ड कंपनी; वाय. पी. देशमुख जे. व्ही. ग्रेट स्पोर्टस लि., पी. व्ही. पाटील कंन्सट्रक्शन, मे. समृध्दी कन्सट्रक्शन जे. व्ही. सायनोटेक इंटरनॅशनल, इरा इन्फ्रास्ट्रक्चर तसेच के. एच. कन्सट्रक्शन जे. व्ही. ॲडव्हाॅन्स स्पोर्टस आदी सहा कंपन्यांनी १ डीसेंबर २०२२ रोजी टेंडर प्रक्रीयेत सहभाग घेतला होता.
टेंडरनामाकडे उपलब्ध कागदपत्रानुसार ६ ऑक्टोबर २०२२ रोजी जागतीक बॅक प्रकल्प शाखेचे कार्यकारी अभियंता यांच्या अधिकारक्षेत्रात तांत्रिक बीड ओपन केल्यानंतर अधीक्षक अभियंता विवेक बडे यांच्या अधिकार क्षेत्रात ६ जानेवारी २०२३ रोजी फायनांसियल बीड ओपन केले होते. यात वाय. पी. देशमुख यांनी ११ कोटी ६४ लाख २८ हजार २८१ एकूण प्रकल्पाच्या अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा ३.९९ टक्के अतिरिक्त दराने काम करण्यास इच्छूक दाखवल्याने सदर प्रकल्पाची किंमत १२ कोटी १० लाख ७ हजार ३७७ रुपयांत वाढत असल्याने (- ९९) टक्के कमी दराने प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी दर्शवणाऱ्या अतुल. एस. निकम यांना काम देण्यात आले.
इतर स्पर्धकांचा हल्लाबोल
यानंतर मात्र इतर चार स्पर्धकांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, तसेच विभागीय लेखाधिकारी नरिंदर सिंग यांना इतर टेंडर का ओपन केले नाही? सर्व टेंडर ओपन केल्याशिवाय तुम्हाला कसे कळणार कोणी किती कमी टक्के दराने टेंडर भरले, असे सवाल करत धारेवर धरले. मात्र अधिकाऱ्यांनी कानात बोळे अन् तोंडाला कुलूप लावले. यावर नाराज कंत्राटदारांनी आ. प्रशांत बंब यांच्याकडे कैफियत मांडली.
हे आहेत बंब यांचे आरोप
● सदर कामात चार कंत्राटदारांना अपात्र करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम मंडळातील टेंडर शाखेतील लिपीक एन. एफ. राजपुत यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सदर चार कंत्राटदारांना हेतूपुरस्पर अपात्र केले.
● यात टेंडर शाखेतील दुसरा लिपीक मिलिंद गिरधारी याची मूळ पोस्टींग ही जागतीक बॅक प्रकल्पात आहे आणि टेंडरदेखील त्याच विभागाचे आहे. त्यामुळे त्यांनी देखील या चार कंत्राटदारांना अपात्र करण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी हातभार लावला.
● सहापैकी दोन कंत्राटदारांना पात्र ठरवताना प्रकल्पाच्या टेंडरमधील एकूण किंमतीपैकी समाधानकारक मोबदला मिळाला आहे, असा गंभीर आरोप करताना बंब यांनी एन. एफ. राजपुत हा टेंडर क्लर्क ९ वर्षापासून एकाच टेबलावर कसा, तसेच मिलिंद गिरधारी हा जागतिक बॅंक प्रकल्पात क्लर्क असताना टेंडर शाखेत कसा काम करतो, असे गंभीर प्रश्न उपस्थित करत बंब यांनी जागतिक बॅक प्रकल्प शाखेसह सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे केले आहेत.
● सदर साडेअकरा कोटीहून अधिक रकमेचे टेंडर मर्जीतल्या ठराविक कंत्राटदाराला देण्याकरिता यात बेकायदेशिर कृती झाली आहे, असा आरोप करताना बंब यांनी विभागीय लेखाधिकारी नरिंदर सिंग यालाच जबाबदार धरले आहे. यात सिंग याच्यासह टेंडर क्लर्क एन. एफ. राजपुत, आणि मिलिंद गिरधारी यांनीच पात्र कंत्राटदाराकडून मोबदला घेऊन दुसर्या कंत्राटदारांना अपात्र केल्याचा दावा बंब यांनी केला आहे.
शासनाचा ८० लाखाचा तोटा
प्रकल्पाच्या टेंडरमध्ये अपात्र कंत्राटदारांनी ७ ते ८ कमी टक्के दराने टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यामुळे प्रकल्पाची एकूण अंदाजपत्रकीय रकमेत ८० लाखाची बचत झाली असती. जाणून-बुजून अधिकाऱ्यांनी याप्रकरणात इतर कंत्राटदारांना अपात्र केले आहे. यासंदर्भात बंब यांनी यासंपूर्ण टेंडरप्रक्रियेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीचे पत्र देखील दिले आहे.
चौकशी आधीच कंत्राटदार पात्र
एकीकडे बंब यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षकांना सदर प्रकल्पाच्या टेंडरची सर्व संचिका ताब्यात घ्यावी आणि नव्याने छानणी, पडताळणी करावी. ज्या कंत्राटदारांना अपात्र ठरवण्यात आले आहे, त्यांचे फायनांन्सियल बीड उघडून बघावे. ते नक्कीच ७ ते ८ इतक्या कमी टक्के दराने सहभागी असल्याचे आढळून येईल, असे आवाहनच बंब यांनी पोलिस अधीक्षकांना दिले आहे.
तसेच कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, विभागीय लेखाधिकारी सिंग , टेंडर क्लर्क एन.एफ. राजपुत तसेच मिलिंद गिरधारी यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केलेली आहे. मात्र चौकशी होण्याआधीच अधिकाऱ्यानी एस. पाटील या कंत्राटदाराला पात्र केले कसे, असा सवाल उपस्थित करत बंब यांनी थेट मुख्य अभियंत्यांना पत्र दिले आहे.
(कसा आहे टेंडरमधील घोळ? ...वाचा उद्याच्या अंकात)