औरंगाबाद (Aurangabad) : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे (Kavita Navande) यांची वृत्तमालिका प्रकाशित करताच अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यात औरंगाबाद मनपा शाळांच्या क्रीडा साहित्याच्या प्रस्तावामध्ये फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यासंबंधीच्या तपासात शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत पाठवण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये क्रीडा साहित्याच्या मूळ यादीवर बनावट यादी चिटकावण्यात आली असल्याचे आढळून आले. या प्रस्तावामध्ये मनपा हद्दीमधील मंजूर करण्यात आलेल्या ४३ शाळा आहेत. त्यापैकी अस्तित्वातच नसलेल्या ७ शाळांना हे क्रीडा साहित्य मंजूर केले असल्याचे टेंडरनामाच्या तपासात निष्पन्न झाले.
या घोटाळ्यात सर्व प्रथम मनपा शाळेची यादी तयार करण्यात आली, त्या यादीवर प्रस्ताव न घेता मंजुरी करून घेण्यात आली. नंतर महापालिका शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत प्रस्ताव मागवण्यात आले. त्यामध्ये मनपा शाळेकडून मागवण्यात आलेल्या क्रीडा सहित्याची यादी न देता जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या सोयीनुसार क्रीडा साहित्याची यादी चिटकावण्यात आली. उदा. चौथीपर्यंत प्राथमिक शाळांना पुरेपूर जागा नसताना क्रिकेटच्या साहित्यामध्ये क्रिकेट मॅट, कबड्डी मॅट असे साहित्य मंजूर करण्यात आले.