औरंगाबाद (Aurangabad) : स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रूपयांचा चुराडा करून औरंगाबाद महापालिकेच्या वतीने नागरिकांना जागृत करण्यासाठी चौकाचौकात डिजिटल फलक लावण्यात आले; मात्र दुर्दैवाने शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आदर्श रेल्वेस्थानकासमोरील प्रवेशद्वाराच्या आतील कोपर्यावर 'स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडून' राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या डिजिटल फलकाखालीच कचर्याचा ढीग लागला आहे. तसेच यालगत असणाऱ्या स्मार्ट बस थांब्यांनाही गवत आणि रानटी झुडपांनी घेराव घातला असून कचर्याचे ढीग मोकाट कुत्री विस्कटून टाकत असल्यामुळे रेल्वेस्थानकाचे विद्रुपीकरण होत आहे. यामुळे शहर स्वच्छेतेची जबाबदारी असणाऱ्या कंपनीच्या कामावर देखील प्रश्न निर्माण होत आहे.
स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद शहराला वरचा क्रमांक मिळावा, यासाठी आम्ही काटेकोरपणे काम करत असल्याचा दावा करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीचा कारभार येथील अस्वच्छता पाहता उघड्यावर पडला आहे. प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने मंगळवारी सकाळपासूनच महापालिका हद्दीतील रेल्वे स्टेशनसमोरील पाहणी केली असता अनेक भागांचा कचरा उचलण्यात आला नव्हता. शिवाय सुशोभिकरणातील ताटव्यांमध्ये देखील गवत स्थानकाची शोभा वाढवत असल्याचे दिसले. हीच स्थिती कायम राहिल्यास याहून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह
याप्रकारामुळे औरंगाबाद शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर कोट्यावधी रूपयांचा चुराडा करून महापालिकेतर्फे गाजावाजा करीत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ औरंगाबाद मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरमहा कोट्यावधीचा मलिदा
शहर स्वच्छतेची जबाबदारी उचलणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला महापालिकेकडून दरमहा अडीच कोटी रूपये दिले जातात. मात्र रेल्वे स्थानकात जिथे महापालिकेची स्वच्छतेची जबाबदारी आहे तिथे घंटा गाडी फिरकत नसल्याने येथील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली आहे. कंपनीच्या देखभालीअंतर्गत स्मार्ट सिटी बस थांब्यालगत झाडलोट देखील होत नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली.
प्रवाशांची तक्रार, प्रशासनाचा कानाडोळा
या संदर्भात प्रवाशांनी वारंवार महापालिका प्रशासनाकडे दाद मागितली. मात्र तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर या प्रवाशांनी टेंडरनामाकडे कैफियत मांडली. जोपर्यंत स्मार्ट बसस्थानकाची स्वच्छता होत नाही, तोपर्यंत आम्ही स्मार्ट बसने प्रवास करणार नाही, असेही प्रवाशी म्हणाले. तूर्तास एसटी संप असल्याने असाही या बसेसचा फायदा नाही पण आता ही जागा खाजगी वाहनांनी ताब्यात घेतल्याने येथूनच प्रवास करावा लागतो म्हणून या अस्वच्छतेचे दर्शन घ्यावेच लागते असेही प्रवाशी म्हणाले.
मोदींच्या प्रयत्नांना खिळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेला प्रतिसाद देत औरंगाबाद महापालिकेने स्वच्छ औरंगाबादसाठी अनेक संकल्पना राबविल्या असल्या तरी कंपनीच्या कामचुकारपणामुळे स्वच्छ औरंगाबादची गाडी मात्र बंद पडणार असल्याचे दिसत आहे.