औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) स्मार्ट हेल्थ प्रोजेक्ट अंतर्गत हुडको एन-11 परिसरात आधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यास सुरुवात केली आहे. स्मार्ट सिटी या प्रकल्पांतर्गत 4 मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स बांधून ते संचलनासाठी औरंगाबाद महापालिकेकडे सुपूर्द करेल.
औरंगाबाद महापालिका आयुक्त आणि प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली एएससीडीसीएल स्मार्ट हेल्थ प्रकल्प उभारत आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सुचविलेल्या या प्रकल्पाला औरंगाबाद स्मार्ट सिटी बोर्डाने मार्चमध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर औरंगाबाद स्मार्ट सिटीने टेंडर प्रक्रिया पार पाडून योग्य एजन्सीला कार्यादेश दिले. स्मार्ट हेल्थ प्रकल्प 33.48 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणार्या 4 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलपैकी पहिले ताठे मंगल कार्यालयाजवळ हडको एन-11 मध्ये आहे. 60+ खाटांचे रुग्णालय 9.31 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. साइटचे क्षेत्रफळ 35,500 चौरस फूट आहे आणि 25,000 चौरस फूट क्षेत्रफळावर (G+2) इमारत बांधली जाणार आहे. तळमजल्यावर ओपीडी कक्ष किंवा डॉक्टर सल्ला कक्ष, आपत्कालीन रूग्णांसाठी 6 खाटा असलेले अपघात क्षेत्र, प्रशासन-सह-नोंदणी ब्लॉक, औषधाची दुकान, सीटी स्कॅन कक्ष, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणि एक्स-रे सेंटर यांचा समावेश असेल. पहिल्या मजल्यावर स्त्री-पुरुष रुग्णांसाठी सामान्य वॉर्ड, मोठे आणि लहान ऑपरेशन थिएटर असतील. तर दुसऱ्या मजल्यावर निवासी डॉक्टरांसाठी विश्राम गृह, आयसीयू, विशेष खोल्या आणि कॅन्टीन असतील.
स्मार्ट सिटीचे अतिरिक्त सीईओ अरुण शिंदे आणि महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या देखरेखीखाली प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान हे हा प्रकल्प राबवत आहे. स्मार्ट सिटी पॅनेलमध्ये असलेले वास्तुविशारदांपैकी एक असल्याने, डिझाईन ब्युरोचे आर्किटेक्ट हरेस सिद्दीकी यांची स्मार्ट हेल्थसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकामात अग्निसुरक्षेच्या अत्याधुनिक मानकांचे पालन होईल. हे मेडिकल गॅस पाइपलाइन सिस्टीम (MGPS) ने सुसज्ज असेल आणि पर्यावरणपूरक डिझाइनमध्ये तयार केल्याप्रमाणे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार आहे.