औरंगाबाद (Aurangabad) : जगाच्या नकाशावर (World Map) ऐतिहासिक नगरीची नोंद असलेल्या औरंगाबाद शहराची बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळख होती. यातील बहुतांश दरवाजे आता इतिहासजमा झाले आहेत. त्यापैकी ९ दरवाजांचे स्मार्ट सिटी (Smart City) योजनेतून रुपडे पालटले आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी लक्ष घातले. स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल सव्वातीन कोटी रुपये खर्च करत या दरवाजांना उजाळा दिला आहे. या कामांमुळे हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हातभार लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
सुमारे चारशे वर्षांपासून शहरातील ५२ दरवाजे आणि त्यांना घट्ट आवळून ठेवणारी तटबंदी या ऐतिहासिक औरंगाबाद शहराची शान होती. मात्र पुढे काळाच्या ओघात वाढते शहरीकरण, दाट लोकवसाहती आणि वाढत्या बाजारपेठांनी या दरवाजांच्या अस्तित्वालाच धक्का पोहोचविला. औरंगाबादेत सुरुवातीला नगरपरिषद आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाने देखील या ऐतिहासिक ठेव्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. परिणामी ही औरंगाबादच्या या बुलंद तटबंदीचे कधी रस्ता रुंदीकरण मोहिमेमुळे, तर कधी आसपासच्या नागरिकांनी खेटून केलेल्या बांधकामांमुळे नुकसान होत गेले. चुन्याला गळती लागली आणि विटा, पाषाण ढासळू लागले.
शहरातील लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी देखील या ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष केल्याने हळूहळू या दरवाजांची संख्या कमी होत गेली. त्यातच जिन्सी भागातील खासगेट रस्ता रुंदीकरण मोहिमेत पाडल्याने ५२ पैकी उरलेल्या ११ दरवाजांची संख्या दहावर येऊन पोहोचली. त्यामुळे ऐतिहासिक शहरात मुघल, निजाम राजवटीच्या पाऊलखुणा दिसणे देखील दुरापास्त झाले. त्यात केवळ दिल्ली गेट, रंगीन, भडकल गेट, मकाई गेट, बारापुल्ला, खिज्री, नौबत, काला आणि रोशनगेट आदी काही प्रमुख दरवाजे हे शहराच्या मुख्य मार्गावर आणि वसाहतींपासून दूर असल्याने महापालिका सीएसआर फंडातून किरकोळ देखभाल दुरुस्ती होत राहिल्याने चांगल्या अवस्थेत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेतून मिळाला निधी
हा ऐतिहासिक ठेवा निदान पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून पैठण गेट, काळा दरवाजा, खिजरी गेट, रोशनगेट, बारापुल्ला गेट, कटकट गेट, जाफर गेट आणि महेमूद गेट आदींची दुरुस्ती करण्याचा निर्णय २०२० - २१ मध्ये घेतला होता. रितसर त्याचे टेंडर काढून अखेर या दरवाजांचे रुपडे पालटवण्यात त्यांनी यश मिळवले. यासाठी जवळपास सव्वातीन कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे पाण्डेय यांनी 'टेंडरनामा'शी बोलताना सांगितले.