छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको वाळुजमहानगरात समाविष्ट झालेल्या पण मुलभूत सोयीसुविधांपासून गेल्या ३२ वर्षांपासून दूर असलेल्या "त्या" १८ खेड्यांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिडकोची कानउघडणी करताच सिडकोने या भागातील विविध विकास कामांसाठी शंभर कोटीचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. यासंदर्भात वाळुज महानगरचे उपसरपंच विष्णू जाधव येथील मुलभुत समंस्यांचा निपटारा करण्यासाठी सिडकोकडे वारंवार निवेदन देत होते. मात्र, प्रशासन कानाडोळा करत असल्याने ही बाब त्यांनी दानवे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर दानवे यांनी सिडकोचा खरपूस समाचार घेत २९ जानेवारीला विष्णू जाधव यांच्या निवेदनावर कार्यवाही करण्याबाबत सिडकोला निर्देश दिले होते व आठ दिवसांत अहवाल सादर करायचे सांगितले होते.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पत्रानंतर सिडकोने वाळुज महानगर १,२ व ४ मधील उत्तम दर्जाचे रस्ते व विविध विकास कामांचे शंभर कोटींचे टेंडर ६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले. प्रस्तावित टेंडरमध्ये सिडको वाळुज महानगर १,२ व ४ मधील उर्वरित असलेले रस्ते, मलनिःसारण वाहिनी, जलवाहिनी, पथदिवे यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या रस्त्यांचे पुनरडांबरीकरण करण्यात येणार आहे. सदर कामाची अंमलबजावणी करून सविस्तर अहवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाठविण्याच्या हालचाली सिडको प्रशासनाकडुन सुरू असल्याचे "टेंडरनामा"च्या तपासात उघड झाले आहे.
काय आहेत "टेंडर"च्या अटीशर्ती
वाळूज महानगरातील शिल्लक पायाभूत कामांचा एकात्मिक विकास यामध्ये सिडको वाळुज महानगर यांचे २५ टक्के पाॅकेट्स समाविष्ट. सिडको ऑफ महाराष्ट्र लिमिटेड ई-टेंडर प्रक्रियेअंतर्गत सिडको लि. किंवा केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन आणि त्यांचे उपक्रम यामधील योग्य वर्ग आणि श्रेणीमध्ये नोंदणी केलेल्या आणि पात्रतेचे बंधनकारक निकष पूर्ण करणाऱ्या अनुभवी आणि ज्यांनी या स्वरुपाची कामे पूर्ण केली आहेत, अशा इच्छुक कंत्राटदारांकडून ऑनलाईन आयटेम रेट परसेन्टेज बोली मागविण्यात येत आहेत. यात कंत्राटदाराचा अनुभव एकत्रित किंवा व्यक्तिशः असावा त्यात रस्त्यांची कामे अधिक पाणीपुरवठा, स्पीकर लाइन, स्ट्राम वाॅटर ड्रेनवर्कचा अनुभव असावा, अशा अटी टाकण्यात आल्या आहेत.
का काढावे लागले टेंडर
नव्या छत्रपती संभाजीनगरची उभारणी करण्यासाठी डॉ. रफिक झकेरिया यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याचे नेतृत्व पुढे आले, पण वाळूजला ते भाग्य लाभले नाही. म्हणूनच सिडकोने आखलेल्या वाळूज महानगर प्रकल्पाला अवकळा प्राप्त झाली होती. मोठा गाजावाजा करून जाहीर करण्यात आलेला हा प्रकल्प सिडकोच्या हलगर्जीपणामुळे आज उजाड, भकास बनला होता. ३२ वर्षांपूर्वी सिडकोने वाळूज सिडकोची निवासी योजना जाहीर केली होती. वाळूज महानगर १ ते ४ अशा योजना आखण्यात आल्या होत्या.यात ७५ टक्के भाग खासगी जमीनधारकांना देण्यात आल्या, तर २५ टक्के भाग ग्रोथ सेंटर म्हणून विकसित करण्याचे आश्वासन सिडकोने जाहिरातीत दिले होते. सिडकोने महानगर असे मोठे नाव दिल्याने बहुतांश उद्योजकांनी या ठिकाणी टुमदार बंगले बांधले; पण वीज, पाणी, रस्ते,जलवाहिन्या अन् ड्रेनेज या मूलभूत सुविधा काही मिळाल्या नव्हत्या. गेल्या काही वर्षांत सिडको कार्यालयातील कर्मचा-यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या. त्यामुळे वाळूज सिडकोकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ मिळाला नव्हता. अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे वाळूज महानगर प्रकल्पातून सिडकोला कोट्यावधींचा तोटा झाल्याची या भागात चर्चा आहे.
वाळुज महानगरातील नागरिकांना सिडकोने छळ छळ छळले. या छळाच्या अनेक कहाण्या नागरिक सांगतात. सिडकोने विकसित केलेल्या वाळूज महानगरातील पायाभूत सुविधा सिडकोने द्यायचे कबूल केले होते.मात्र नंतर सिडकोला विसर पडला. कालांतराने सिडकोकडुन वाळुज महानगराला चक्क ग्रामीण भागात टाकले गेल्याचे गत झाली. पथदिव्यांची पुरेशी व्यवस्था नसल्याने या ठिकाणी कायम अंधार असतो. वाळूज महानगर १ व २ या दोन्ही भागांतील रहिवाशांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त रहिवासी उद्योजक आहेत. वाळूज महानगर भाग-३ चा प्रकल्प ३२ वर्षानंतरही सिडकोने पूर्ण केला नाही. पैठण रोडवर सिडको महानगर भाग-४ ची वसाहत थोड्याफार प्रमाणात विकसित केली. पण काही जमिनी अद्यापही पडिक आहेत. या ठिकाणची अवस्था तर वाळूजपेक्षाही भयंकर आहे. या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी यांची मोठी समस्या आहे. या भागातही उद्योगपतींचे मोठे बंगले आहेत; मात्र सुविधांअभावी तेही दहा वर्षांपासून हैराण आहेत. वाळूज महानगरातील उद्याने बकाल झाल्याने तेथे रात्री चोर, लुटारू अन् दारूड्यांचा अड्डाच भरत असल्याचे नागरिक सांगतात. या भागात सिडकोने ड्रेनेज लाइनचे काम केले आहे; पण ३२ वर्षाच्या कालावधीनंतर. या लाइन एकमेकांना न जोडताच भलीमोठी पाइपलाइन रस्त्यावरील नाल्यात आणून सोडली आहे. पावसाळ्यात हेच घाण पाणी बॅकप्रेशरने पुन्हा वस्तीत जाण्याची शक्यता आहे, कारण नाल्याचा भाग सखल आहे. पावसाळ्यात नाल्यांची पातळी वाढली की हे सर्व पाणी वस्त्यांमध्ये येते. सिडकोने वाळुज महानगर विकसित करताना टाकलेल्या जलवाहिन्या कमी व्यासाच्या व जुनाट झाल्या आहेत. लोकसंख्येच्या मानाने बदलने आवश्यक होते. वाळुज महानगरातील रस्त्यांची देखील चाळणी झाल्याने या भागातील नागरिकांनी पायाभूत सुविधांसाठी मोठा लढा उभारला होता; पण सिडको दाद देत नव्हते. अखेर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी नागरिकांच्या तक्रारीनंतर सिडकोची कान उघाडणी केली अन् शंभर कोटींचे टेंडर काढण्यात आले.