औरंगाबाद (Aurangabad) : सिडकोतील (Cidco) प्रियदर्शनी उद्यानात सतरा एकर जागेवर शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्मारक व उद्यान विकसित केले जात आहे. या स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी एक कोटी ६४ लाख रुपयांचे टेंडर (Tender) प्रसिद्ध करण्यात आले आहे. टेंडर स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आठ टेंडर प्राप्त झाले आहेत.
स्मारकाच्या चबुतऱ्यासाठी सध्या बांधकाम सुरू आहे. डिएफआय एजन्सी मार्फत हे काम केले जात आहे. या स्मारकाला संरक्षण भिंत बांधली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी ६४ लाख ५९ हजार ९७१ रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. २५ ऑक्टोबरला टेंडर सादर करण्याची शेवटची मुदत होती. त्यानुसार टेंडर उघडण्यात आली असता आठ एजन्सींचे टेंडर प्राप्त झाले आहेत. अनिल वाटोरे कॉन्ट्रक्टर, अतुल निकम, डिझाईन फॅक्टरी इंडिया, इरा इन्फास्ट्रक्शन, मस्कट कंन्स्ट्रक्शन, मेसर्स समृद्धी कन्स्ट्रक्शन, रत्नागुरू कन्स्ट्रक्शन, सहारा कन्स्ट्रक्शन या एजन्सींचा समावेश आहे. टेंडरांची तांत्रिक बीड उघडण्यात आली असून, त्यामध्ये सर्वच टेंडर पात्र ठरल्या आहेत, असे उपअभियंता आर. पी. वाघमारे यांनी सांगितले.
पुतळ्यासाठी मुंबईत बैठक
मुर्तीकार शशिकांत वडके यांनी नुकतीच जागेची पाहणी केली. त्यानुसार पुतळा तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्यासाठी चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीचा स्लॅबही पडला आहे. आता पुतळ्याचे काम सुरु करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईतील प्रसिद्ध मुर्तीकार शशिकांत वडके यांना औरंगाबादेत बोलावले होते. त्यानुसार वडके यांनी जागेची पाहणी केली. पुतळा कसा असावा याविषयी त्यांनी पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली, असे महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. पुतळ्याविषयी मुख्यमंत्री ठाकरेच निर्णय घेणार आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.