औरंगाबाद (Aurangabad) : शेंद्रा एमआयडीसीला लागूनच ऑरिक सिटीच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल काॅरिडोअर (डीएमआयसी) विकसित करण्याचा ठेका जगभरात बांधकाम क्षेत्रात नावाजलेल्या शापूरजी पालोनजी कंपनीला दिला. परंतु रस्त्यांच्या शेजारी फुटपाथचे काम प्रामाणिकपणे केले नसल्याने फुटपाथवर पावसाच्या पाण्यामुळे गवत आणि रानटी झुडपे उगवली आहेत. धक्कादायक म्हणजे फुटपाथचे काम झाल्यापासून कंपनीने सफाईची तसदी देखील घेतली नसल्याचे दिसत आहे. येथील चकचकीत रस्त्यांच्या मधोमध काटेरी झुडपे आणि वाळलेले गवत पाणीच मिळत नसल्याने कंपनीच्या खोटेपणाची पुन्हा दुसरी साक्ष ठरत आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून अनेक ठिकाणी पॅव्हरब्लाॅक उखडुन ठेवलेले आहेत. अगदी दुभाजकलगत मातीचे ढिग देखील तसेच पसरलेले आहेत.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी क्षेत्रात उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा असल्याचे म्हणत आगामी काळात औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे व हे शहर औद्योगिकदृष्ट्या देशातील सर्वोत्कृष्ट विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा गवगवा केला जात आहे. मात्र येथील परिस्थिती काही वेगळीच आहे. शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या परिसरातील शुक्रवारी टेंडरनामा प्रतिनिधीने रस्ते, फुटपाथ आणि दुभाजकातील सुशोभिकरणाची सविस्तरपणे पाहणी केली. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी (शेंद्रा) येथील पायाभूत सुविधांसाठी किती खर्च केला? देखभाल दुरूस्तीची जबाबदारी कुणाची? नव्याकोऱ्या फुटपाथवर गवत उगवतेच कसे? फुटपाथ अनेक ठिकाणी का उखडले? दुभाजकातील काटेरी झुडपांची सफाई का होत नाही? असे अनेक प्रश्न येथील वरिष्ठ अभियंता शैलेश धाबेकर यांना विचारले असता आधी तूमचा प्रश्न पायाभूत सुविधांना किती खर्च आला आणि किती किमीचे रस्ते आहेत याचे उत्तर मी कार्यालयात असल्यावर देईल. पण मध्येच उखडलेले पॅथवे आणि त्यावर काटेरी झुडपे कुठुन आले. देखभाल दुरूस्तीची जबाबदारी शापूरजींकडे आहे ते बघतील त्याचे काय करायचे असे म्हणत धाबेकरांनी एक्पोमध्ये व्यस्त असल्याचे म्हणत बोलणे टाळले.
ऑरिक सिटीमध्ये उद्योगांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगांची भर पडणार आहे. त्यामुळे औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल, असे म्हणत येथील बडे अधिकारी औरंगाबादच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची वाहतूक सुरु होईल. जेणेकरुन उद्योगांच्या विकासाबरोबर येथील पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. अशा विकासात्मक बदलाच्या गप्पा मारत असताना शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला भरीव योगदान देणाऱ्या खड्डेमय रस्ते आणि अंधाराकडे अर्थात स्वतःच्या दिव्याखाली असलेला अंधार दिसत नाही का, असा संतप्त सवाल उद्योजकातून होत असल्याचे दिसून आले.
शेंद्रा उद्योग पंढरीला लागुनच तब्बल चार एकर जागेपैकी दहा हजार स्केअर मीटर जागेवर ऑरिक सिटीची इमारत ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच मुलभूत सुविधांच्या विकासाचा जागतिक दर्जाचा उत्तम नमुना म्हणून बांधली गेली. या इमारतीकरता अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्यात आला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ऑरिक सिटी उद्योगाप्रमाणेच वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन, व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वांगीण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणले जाईल. यात तीळमात्र शंका नाही. मात्र यासाठी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे उद्योजकांनी मत मांडले. ऑरिक सिटीतील रस्ते, पथदिवे आणि फुटपाथसाठी कोट्यावधी रूपये खर्च केले गेले. त्याची देखभाल-दुरूस्तीचा कालावधी अद्याप बाकी आहे. तरीही येथील रस्त्यांवरून जाताना धूळ-मातीपासून उद्योजकांना मुक्ती मिळालेली नाही. गेल्या पावसाने माती साचलेल्या रस्त्यावर राडारोडा तसाच पडून आहे. पाऊस गेल्यानंतरही सफाई केली जात नाही. आता कोरड्या रस्त्यांवर तूरळक वाहनांच्या ये-जा मुळे धूळ उडत आहे.
दैनंदिन रस्ते आणि दुभाजकांची सफाई होत असेल तर काटेरी झुडपे आणि गवत उगवते कसे? दैनंदिन पाण्याचा मारा केला जात असेल तर सुशोभिकरणाचे वाळवंट झालेच कसे? फुटपाथचे काम दोषमुक्त झाले असेल तर त्यावर मोठी झुडपे आणि गवत उगवलेच कसे? असे प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत ऑरिक सिटीचे अधिकारी गंभीर नाहीत. ‘टेंडरनामा'च्या अचानक पाहणीत हा सारा कोट्यावधी रूपयांचा भ्रष्ट कारभार दिसतो', ऑरिक सिटीचे अधिकारी इमारतीबाहेर पडून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यास का तयार नाहीत? असा प्रश्न उपस्थित होतो.