Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : सातारा - देवळाईतील महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गुजरातच्या अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीच्या माध्यमातून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र कामात दिरंगाई होत असून सर्वत्र कच्चे व पक्के रस्ते खोदून ठेवल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह दुचाकी तसेच रिक्षा चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदार कंपनीला आदेश दिले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कंपनी कंत्राटदारास रस्ते दुरूस्त केल्याशिवाय कामाचे देयक अदा करू नये, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.
सातारा - देवळाई परिसरात रिमझिम पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून रस्ते नादुरुस्त झाले आहेत. या खड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. असे असताना सातारा - देवळाईतील महानगरपालिका क्षेत्रात भूमिगत गटार करणाऱ्या मे. अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीच्या कंत्राटदाराने सातारा - देवळाईतील सर्वच भागात रस्ते खोदून ठेवले आहेत. पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचून रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाले आहेत.
खोदण्यात आलेल्या रस्त्याची माती सर्वत्र पसरून चिखल झाला आहे. रिक्षा आणि मोटार सायकलींचे घसरून रोजचे अपघात होत आहेत. या रस्त्यांवरून बाजारहाट करण्यासाठी जाणाऱ्या महिला, विद्यार्थी नागरिकांना चिखल तुडवत रस्त्यांवरून जावे लागत आहे. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारास आदेश दिले आहेत. तसेच या भागातील नागरिकांच्या देखील कंत्राटदाराच्या गलथान कारभाराविरोधात तक्रारी केल्या आहेत. तरीसुद्धा कंपनी कंत्राटदार हेतू पुरस्सर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी तात्काळ कारवाई करावी, तसेच केलेल्या कामाचे परीक्षण केल्याशिवाय देयक अदा करू नये, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
सातारा-देवळाई या दोन वॉर्डांसाठी २३१ कोटी खर्चाच्या ड्रेनेज प्रकल्पासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ई-टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यात केंद्र सरकारच्या अमृत २.० अंतर्गत योजना राबवली जात आहे. यात केंद्र सरकारचे २५ टक्के प्रमाणे ६९ कोटी ९२ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. तसेच राज्य सरकारचे ४५ टक्के म्हणजेच १२४ कोटी ०६ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. यासाठी महापालिकेला ३० टक्के प्रमाणे ८२.७० टक्के अनुदान द्यावे लागणार आहे. याप्रमाणे सातारा-देवळाईतील या प्रकल्पावर एकूण २३१ कोटी २५ लाख ५९ हजार ८११ रुपयाचे टेंडर काॅस्ट नुसार काम करण्यात येत आहे.
गुजरातच्या अंकिता इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र टेंडर मधील ठरविण्यात आलेल्या अटी - शर्तीनुसार काम होत नाही. चेंबरमध्ये सिमेंट विटांचे प्लास्टर केले जात नाही. निकृष्ट दर्जाचे पाईप टाकले जात आहेत. खोदकामात सिमेंटचे बेड काॅंक्रिट न करता तसेच पाइप टाकले जात आहेत. पाइप जाॅईंट करताना सिमेंटचा गिलावा दिला जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या आठ वर्षापूर्वी सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाला. त्यानंतर या भागात कुठलाही विकास होत नव्हता. यासंदर्भात टेंडरनामाने सातत्याने आवाज उठवला. सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तद्नंतर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून ड्रेनेजचा प्रकल्प केंद्र शासनाच्या अमृत-२ याेजनेतून मंजूर करून घेतला. या प्रकल्पाचा समावेश केंद्राच्या अमृत-२ याेजनेतून मंजुर झाला. मात्र त्यालाही अधिकाऱ्यांनी खाबुगिरीची जोड दिल्याने सातारा - देवळाईकर आगीतून फुफाट्यात पडले आहेत.
याआधी नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत सातारा - देवळाईतील रस्त्यांची वाट लावली. आता भूमिगत गटार योजनेने रस्त्यांचे पार वाटोळे केल्याने या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नसल्याने कंत्राटदारांच्या ताटाखालचे मांजर झाल्याचा संशय का बळाऊ नये, अशी सर्वत्रच चर्चा सुरू आहे.