छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील दक्षिण दिशेला वसलेल्या सातारा - देवळाई व बीड बायपास परिसरातील नागरी वसाहत वेगाने वाढत आहेत. या भागातील रस्त्यांच्या कामांना महानगरपालिकेला गत दहा वर्षांत मुहूर्त सापडलेला नाही. याऊलट ऐन पावसाळ्यात या भागात जलवाहिनी आणि मलनिःसारण वाहिनीची कामे काढून झालेले रस्ते व कच्चे रस्ते खोदून या भागातील दीड लाख लोकांच्या जिवाशी खेळ चालवला आहे.
यामुळे या भागातील मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे पालकत्व आपल्याकडे असल्याचा लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकाऱ्यांना विसर पडला आहे का? तसेच या भागातील बीड बायपाससह अरूंद रस्त्यांवरील कोंडी फोडण्याचे पालकत्व आपल्याकडेच आहे, याचा पोलिस आयुक्तांना देखील विसर पडला का? असा संतप्त सवाल 'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेतून या भागातील नागरिकांनी केला आहे.
'टेंडरनामा'ने अत्यंत चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गाबाबत वृत्त प्रसिद्ध केले असता या मार्गावरील संग्रामनगर उड्डाणपूल देवळाई चौकातील उड्डाणपूल तोडा आणि आमदार रोड व देवळाई चौकाला जोडा, बीड बायपास व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - एन - एच -५२ सोलापूर धुळे हायवेला सहा रस्ते रुंदीकरण करून जोडा, सातारा - देवळातील अंतर्गत रस्ते बांधकामाचा मुहूर्त लावा, मुख्य रस्ते विकास आराखड्यानुसार ५० फुटांचे करा व अस्तीत्वातील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढा, अशा प्रमुख समस्या उपस्थित करत नागरिकांनी सलग दुसऱ्या दिवशी 'टेंडरनामा' वृत्तमालिकेचे समर्थन केले.
नागरी वसाहत वेगाने वाढत असलेल्या सातारा - देवळाई व बीड बायपास परिसरातील तब्बल दीड लाख नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, उद्याने, खुली मैदाने,सामाजिक सभागृहे, मनोरंजनाच्या सुविधा, जसे नाट्यगृह, स्वतंत्र भाजी मार्केट, बंदिस्त मांस विक्री केंद्र व इतर सुविधा पुरविण्याच्या महानगरपालिकेला विसर पडला आहे. त्यात तत्कालीन सिडको झालर क्षेत्रात असताना साडे आठ कोटीतून बांधलेल्या व अंतर्गत रस्त्यांच्या पुनर्दुरूस्तीला महानगरपालिकेला मुहूर्त सापडत नाही.
त्यात आमदार निधीतून जी झालेली कामे आहेत, त्यांची देखील जलवाहिनी व मलनिःसारण वाहिनीसाठी खोदून ठेवण्यात आली आहेत. गत दोन वर्षांपासून फोडलेल्या रस्त्यांची दुरूस्ती केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्याचबरोबर सातारा - देवळाईतील विविध समंस्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही सातारा-देवळाई व बीड बायपास परिसरातील नागरिकांना येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यातही खड्डे आणि चिखलमय रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. महानगरपालिकेच्या प्रशासकीय दिरंगाईचा फटका या भागातील दिड लाख नागरिकांना बसला आहे.
सातारा - देवळाई व बीड बायपास परिसरात गेल्या चार दशकात नागरी वसाहती वेगाने उभारल्या. या परिसरातील अंतर्गत रस्त्यांसह बीड बायपास मार्गाशी जोडणाऱ्या सर्वच प्रमुख रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांची कामे मार्गी लावने महत्वाचे असताना महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुका येताच लोकप्रतिनिधींना या परिसराची आठवण होते. निवडणुकी पूर्वी कोट्यवधीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्ष कामे सुरू केली जात नाहीत. पुढे विविध मूलभूत सुविधांच्या कामात निवडणुकांच्या आचारसंहितेत टेंडर अडकल्याची आडकाठी दाखवत विकासाची मालिका लांबवली जाते त्याचा फटका या परिसराला बसला आहे.
सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना पैसे नसल्याचे कारण सांगून मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या मनपा प्रशासनाने त्यांच्याच साडेआठ कोटी रुपये विकास निधीतून रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड-दोन वर्षांपासून दडवून ठेवलेल्या विकास निधीला अखेर मुहूर्त मिळाल्याने तो बाहेर आला आहे. मात्र, या निधीतून पूर्वीच कामे झाली असती तर नागरिकांना दिलासा मिळाला असता. स्वत:चा एकही रुपया खर्च न करता आपलीच बोटे आपल्या डोळ्यात घालण्याचा मनपा खेळ खेळत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सातारा-देवळाई सिडको झालर क्षेत्रात येत असल्याने या भागातील रेखांकन व बांधकाम परवानगीचा जवळपास १३ कोटी ४७ लाख, ८ हजार ४२० रुपयांचा विकास निधी सिडको प्रशासनाकडे जमा होता. सातारा-देवळाईचा महानगरपालिकेत समावेश होताच सिडको प्रशासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये आपली येणे असलेली रक्कम वजा करून ८ कोटी ६७ लाख ९३ हजार ७५१ रुपये एवढा विकास निधी महानगरपालिकेकडे सुपूर्द केला होता. हा निधी खर्च करून या भागातील नागरी समस्या सोडवाव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांकडून वारंवार केली जाते; पण दीड वर्षापासून निधी पडून असतानाही महानगरपालिकेने या भागातील विकासकामांवर एक दमडीही खर्च केला नाही.
मागणी करूनही विकासकामे होत नसल्याने नागरिकांची प्रशासनाविषयी ओरड सुरू होती. वाढता रोष लक्षात घेऊन महानगरपालिकेने या भागातील रस्त्याचा मुख्य प्रश्न असल्याने ८.६७ कोटीतून केवळ रस्ते करण्याचा निर्णय घेतला. ६ रस्त्यांचे काम मंजूर करून त्यातील ५ रस्ते कामाच्या टेंडर काढले होते. सिडकोकडून पैसे मिळूनही महानगरपालिकेने दीड-दोन वर्षांपासून तसेच दाबून ठेवले. हा निधी पूर्वीच खर्च करून विकासकामे केली असती, तर या भागातील समस्या काही वर्षांपूर्वीच सुटल्या असत्या आणि नागरिकांना दिलासा मिळाला असता. उशिरा का असेना महानगरपालिकेला शहाणपण सुचले, किमान सातारा - देवळाईकरांचाच निधी त्या भागात खर्च करून विकासकामे करण्याचा निर्णय घेतला.
साडेआठ कोटींतून रेणुकामाता मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौक (२ कोटी ६४ लाख ६४ हजार ३४४ रुपये)- नाईकनगर ते विनायकनगर (१ कोटी ६१ लाख ६ हजार ४९५ रुपये)- हॉटेल शिदोरी ते प्रकाश महाजन यांचे घर (८५ लाख ३ हजार २१० रुपये)- घराना फर्निचर ते प्रवीण कुलकर्णी यांचे घर (१ कोटी ४९ लाख ८९ हजार ६५४ रुपये)- साईनगर ते अलोकनगर (५६ लाख ५६ हजार ८२३ रुपये)- कमलनयन बजाज हॉस्पिटल बीड बायपास ते सुधाकरनगर (२.१२ कोटी) या रस्त्यांची कामे करण्यात आली. मात्र एकदाचे हे कोट्यवधीचे रस्ते उरकुन कंत्राटदारांनी टेंडरच्या अटीशर्तीनुसार रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे कानाडोळा केला. महानगरपालिकेला देखील मागील सहा ते सात वर्षात पुनरदुरूस्तीला मुहूर्त सापडलेला नाही. नुकत्याच या भागात सुरू असलेल्या जलवाहिनी व मलनिःसारण वाहिनीसाठी हे मुख्य रस्ते तोडून कोट्यवधीच्या निधीचे पार वाटोळे करण्यात आले आहे.
आधीच अरूंद रस्ते, त्यात...
आधीच मातीमोल अवस्था झालेल्या सातारा - देवळातील रेणुकामाता मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौक, नाईकनगर ते विनायकनगर, हॉटेल शिदोरी ते प्रकाश महाजन यांचे घर, घराना फर्निचर ते प्रवीण कुलकर्णी यांचे घर, साईनगर ते अलोकनगर, कमलनयन बजाज हॉस्पिटल बीड बायपास ते सुधाकरनगर, बीड बायपास ते आमदार रोड - हायकोर्ट काॅलनी, या प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या इमारतींबरोबरच अनेक मोठी दुकाने, शॉपिंग मॉल्स व कार्यालये आहेत. या विभागातील सर्वच रस्ते स्थानिक रहिवासी, दुकानदार व कार्यालय मालकांच्या वाहनांनी व्यापलेले असतात. त्यामुळे या ठिकाणी खरेदी व कामानिमित्त येणाऱ्या वाहन चालकांना गाडी पार्क करायला जागाच मिळत नाही. इथे पार्किंग झोन नसल्याने वाहनचालक जिथे मोकळी जागा दिसेल तिथे कशाही गाडी पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होतेच. शिवाय, त्याचा त्रास पादचाऱ्यांना व इतर वाहनधारकांनाही सहन करावा लागतो. इथले रस्ते अनधिकृत गॅरेज, पान टपऱ्यांनी व्यापले आहेत. त्यातच रस्त्यातच वाहने पार्क करण्यात येत असल्याने, आधीच अरूंद असलेले इथले रस्ते एकेरी होतात. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्क करायला जागा शिल्लक राहत नाही.
राजकीय मंडळींची अनास्थाही इथल्या वाहतुक कोंडीच्या समस्येला कारणीभूत आहे. सिडको झालर क्षेत्राच्या विकास आराखड्यात हे रस्ते ५० फुटाचे दर्शविण्यात आले आहेत. महानगरपालिकेने नविन विकास आराखड्यात सिडको झालर क्षेत्राच्या आराखड्यानुसार रस्ते कायम केले आहेत. त्यासाठी महापालिकेने नगरविकास विभागाकडे या रस्त्यांच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव पाठविने गरजेचे आहे. सातारा - देवळाई अंतर्गत या मुख्य रस्त्यांवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम नियंत्रक नियमावलीत नवीन बदल करणे आवश्यक आहे. मात्र, या मार्गांवर ही नियमावली अद्याप मंजूर नसल्याने व अद्याप विकास आराखडा अंतिम झाला नसल्याने व सिडको झालर क्षेत्रातून हा भाग वगळण्यात आल्याने लोक विकास आराखड्यातील ५० फूट रस्त्यांवर बिनधास्त इमले चढवत आहेत.या मार्गावर नव्या इमारतींमध्ये पुरेशी पार्किंगची व्यवस्था करणाऱ्या व ५० फुटाच्या आतच बांधकाम करणाऱ्या विकासकांनाच बांधकामाची परवानगी देण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेणे आवश्यक आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पार्किंगची व्यवस्था केल्यास ही समस्या सुटेल, अशा विश्वास या भागातील नागरिकांनी व्यक्त केला.
काय म्हणतात सातारा - देवळाईकर?
बीड बायपास रस्त्यासोबतच या मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या बाबतीतही विचार करणे आवश्यक आहे. अहिल्याबाई होळकर चौक ते रेणुका माता कमान रोड या रस्त्याच्या बाबतीत दिसून येणाऱ्या मुख्य अडचणी बाबत मी सर्वसाधारणपणे काही निरीक्षण केले. त्यामध्ये असे आढळून येत आहे की, रस्त्यावर झालेले अतिक्रमण हे इलेक्ट्रिक पोलचा आधार घेऊन केलेले दिसून येते. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोल आहे, त्याच ठिकाणी जाणीवपूर्वक तेथील दुकानदार, आस्थापना यांनी पुढे अतिक्रमण केलेले आहे. या रस्त्यावर मुख्यत्वे एक गॅरेजचे दुकान, एक भाजीपाल्याचे दुकान, दूध डेअरी व संध्याकाळच्या वेळेस पाणीपुरी दाबेली विकणारे गाडे, यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण दिसून येत आहे. दुष्काळात तेरावा महिना याप्रमाणे, हा रस्ता पाण्याच्या लाईनसाठी खोदल्यामुळे, इतका चांगला झालेला रस्ता अनेक ठिकाणी तुटून गेला आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती नाही झाली तर या चालू पावसाळ्यात दिवाळीपर्यंत हा रस्ता पूर्णपणे खराब होण्याची शक्यता आहे. रेणुका माता कमान परिसरात दुकानाच्या समोर उभे राहिलेल्या फोर व्हीलर, टू व्हीलर,पाईप लाईन मुळे फुटलेला रस्ता, सतत वाहत असणारे वेगवेगळ्या ठिकाणचे ड्रेनेज, या सर्व गोष्टीमुळे शालेय विद्यार्थी, पादचारी व वाहनधारक यांना अत्यंत कसरत करीत येणे जाणे करावे लागत आहे. किमान महापालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी अनाउन्समेंट जरी करत गेली, तरी या भागातील वाहनधारक अतिक्रमण धारक यांच्यावर काही प्रमाणात तरी वचक बसून वाहतूक सुरळीत होऊ शकते. पण महापालिकेला हा भाग आपल्या महापालिकेच्या कार्यकक्षेत आहे याचा विसर पडला आहे की काय अशीच स्थिती आहे. कधीतरी गाड्या उचलणारे पथक पण या भागात आले तर लोकांच्या मनात भीती राहून लोक रस्त्यावर गाड्या लावणार नाहीत. तरी याबाबत महापालिका, पोलीस विभाग, वाहतूक विभाग यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे वाटते.
- हनुमंत सोनवणे, उद्योजक, सातारा.
बीड बायपासच्या दुतर्फा ६० मीटर महानगरपालिका हद्दीतील सर्व्हिस रस्ता महानगरपालिकेने तातडीने ताब्यात घेऊन रस्ता मोठा करावा. बायपासवर लावलेले पथदिवे सेंटर दुभाजकात लावावेत. लोखंडी बॅरिकेड्स काडून घ्यावे.जेनेकरून तीन लेन झालेला रस्ता हा मोठा होईल. आणि दुभाजकावर दहा दहा फुटावर दीड फुटाचे ओपनिंग हवी. रोड लेव्हल पासून एक फूट उंची ठेऊन. म्हणजेच शॉपिंग करणारे लोकांना ये जा करता येईल. एक फूट उंच असलेले ओपनिंग मुळे बाईक वाले जाऊ शकणार नाहीत.
- सचिन राऊत पाटील, सातारा
बीड बायपास रस्ता धोकादायक झाला आहे. पुलाखाली चारहीबाजूनची वाहने एकत्र समोरसमोर येत आहेत. तिथे शिस्त लावणे गरजेचे आहे. तसेच उड्डाणपुलावरून वाहने अतिशय सुसाट जातात. तिथे खड्डे व खालीवर टेमकाडे झाली आहेत. तिथे दुचाकी घसरून एका परिचयातील लेडीजचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला आहे, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. रस्त्याची नीट सफाई न केल्यामुळे येथे अपघात घडत आहेत. कारण माल घेऊन जाणारे वाहन रस्त्यात खडी सिमेंट पसरवत जातात. पाण्याचे फुटके टँकर पाणी ओतत चालते. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून पडत आहेत. ह्या क्षुल्लक गोष्टी आहेत जिकडे सफाई कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे.
- सीमा अग्नीहोत्री
सर्वप्रथम आम्ही टेंडरनामाचे आभार मानतो. या भागातील जवळपास दीड लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारी व अत्यंत अभ्यासात्मक व तांत्रिक मुद्द्यांवर बातमी प्रकाशित केली व प्रत्येकाच्या मनातली भावना बातमीतून व्यक्त केली. बीड बायपास या रस्त्याची बांधणी करताना असंख्य चुका झालेल्या आहेत. रस्त्याची रुंदी अतिशय कमी वाटते. दोन वाहने पास होताना एकमेकांना घासतात की काय असे वाटते. सर्व्हिस रोड अतिशय अरुंद आहे, त्याची रुंदी वाढवायला हवी होती ती खूप अरुंद आहे.आता बनवलेला रोड सोडून महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील सर्व्हिस रोड असायला हवा होता. उड्डाण पुलांची उंची अतिशय कमी आहे, जीचा त्रास भविष्यात जाणवणार आहे, गाडी वळवीतांना दुभाजकामुळे समोरील गाडी दिसत नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. दर्गा येथील उड्डाणपुलाच्या खाली, वाहतुकीचे कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाहीत.अशा अनेक समस्या जाणवत आहे.
- राजीव थिटे पाटील, समाजसेवक, सातारा.
कल्याणी बालक मंदीर ते उर्जानगर व चंद्रशेखर नगरातून बाहेर पडले की, सगळेच रस्ते चिखलमय झाले आहेत.
- मेघना थोरात, सातारा.