Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने २०१८ मध्ये शहरातील कचरा संकलन व चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी व हर्सुल या चार कचरा प्रक्रिया केंद्रात वाहतूक करण्यासंदर्भात टेंडर (Tneder) काढले होते. बंगळूर येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामाबद्दल व्यावसायिक, नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होतात.
कंपनीला कचऱ्याच्या वजनावर महापालिका पेमेंट करते. प्रतिटन प्रतिदिवस २५०० रुपये कंपनीला दिले जातात. दरमहा ३ कोटी रुपये कचरा संकलन व वाहतुकीपोटी कंपनीला दिले जातात. कंपनीसोबत करार करताना कचरा संकलन पॉइंटवर तसेच वॉर्डांमधील अंतर्गत रस्त्यांवर पडलेला कचरा सकाळी अकरा वाजेपर्यंत उचलावा. वॉर्डांमध्ये दारोदार दररोज कचरा संकलन करावे.
कचरा वेचणाऱ्या व घंटागाडीवर काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज व अन्य सुरक्षा साहित्याचा पुरवठा करावा. उघड्यावर जिथे कचरा टाकत असतील त्या पाॅईंटवर सूचना फलक लावावेत. मात्र या सर्व अटी व शर्ती कंपनीकडून वारंवार धाब्यावर बसवल्या जात आहेत. घनकचरा कामात कमालीचा हलगर्जीपणा करणाऱ्या या कंपनीवर वचक बसावा यासाठी महापालिकेने "खास माझा स्वच्छता साधी" हे ॲप तयार केल्याने कंत्राटदार चांगलाच ताळ्यावर आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून घनकचरा विभागाद्वारे बनवण्यात आलेल्या "माझा स्वच्छता साथी" एप्लीकेशनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच या एप्लीकेशनने २० हजाराहून अधिक टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत महापालिकेतर्फे बनवण्यात आलेल्या कुठल्याही एप्लीकेशन पेक्षा या एप्लीकेशनला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. शहर स्वच्छतेसाठी अशा पध्दतीचे एप्लिकेशन तयार करणारी राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचेही अधिकारी म्हणाले.
कचरा गाडी घरापर्यंत न आल्यामुळे नागरिक घरातील कचरा रस्त्यावर किंवा आजूबाजूला टाकतात, यामुळे शहर अस्वच्छ होत आहे. मुळात घंटागाडी कधी येणार हे नागरिकांना माहीत नसल्यामुळे ते कचरा रस्त्यावर टाकतात याला उपाय म्हणून महानगरपालिकेने "माझा स्वच्छता साथी " हे ॲप्लिकेशन तयार केले आहे.
यामध्ये नागरिकांच्या घरासमोर येणारी घंटागाडी लाईव्ह ट्रॅक करता येते. यामध्ये घंटागाडीच्या वाहनाचा क्रमांक, ड्रायव्हरचा संपर्क क्रमांक महापालिकेच्या जवानाचा क्रमांक नागरिकांना कळेल तसेच या एप्लीकेशन द्वारे कचरा, घंटागाडी, घंटागाडीचे ड्रायव्हर, त्यांची वर्तणूक, घंटागाडी न येणे, घंटागाडी वेळेवर न येणे, बांधकाम साहित्य रस्त्यावर पडणे, कर्मचाऱ्यांनी कचरा न उचलणे, रस्त्यावर कचरा पडणे इत्यादी संबंधी तक्रार नागरिक महानगरपालिकेत दाखल करू शकतात.
या एप्लिकेशन मुळे २४ तासांच्या आत संपूर्ण तक्रारींचा निपटारा होतो. तसेच येणाऱ्या काळामध्ये कुणाच्या घरी समारंभ असेल व जास्तीचा कचरा निर्माण झाल्यास नाममात्र शुल्क भरून नागरिक घंटागाडी घरी बोलावू शकतात व कचरा देऊ शकतात. एप्लीकेशनमध्ये घंटागाडी संबंधित वेळापत्रक नागरिकांना कळत आहे. तसेच त्यात महापालिकेने कचरा घेण्यासाठी केलेले संकलन केंद्र वॉर्ड निहाय दिसते. यासाठी स्मार्ट सिटीमध्ये बनवण्यात आलेल्या वॉर रूममधून शहरातील सर्व घंटागाड्यांवर नजर ठेवण्यात येत आहे.
घंटागाडी वेळेवर गेली नाही, घंटागाडीने तिचा मार्ग पूर्ण केला नाही, घंटागाडीने तिचा मार्ग बदलून दुसऱ्याच मार्गाने गेली इत्यादी प्रकारची माहिती महापालिकेच्या वॉर रूममध्ये अलर्टद्वारे कळत आहे. लोकांच्या तक्रारीचा निपटारा २४ तासाच्या आत करण्यात येत आहे. घनकचरा विभागातील स्वच्छता निरीक्षक, जवान यासाठी आपापल्या परिसरामध्ये जनजागृती करत आहेत.
या पध्दतीच्या ॲप्लिकेशनसाठी महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने टेंडर काढले होते. त्यात शहरातील संगणक अभियंता नागेश डोंगरे यांना हे काम मिळाले. त्यांनी व त्यांच्या टीमने या एप्लिकेशनची निर्मिती केलेली असून घनकचरा विभागाचे प्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सनियंत्रण अधिकारी धीरज चव्हाण, रवींद्र घडामोडे, विशाल खरात यांच्यासह सर्व वॉर्ड अधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक व जवान परिश्रम घेत आहेत.
या एप्लिकेशनची निर्मिती केल्याने शहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कामात सुधारणा होत आहे. यापूर्वी कंपनीला अनेक कारणे दाखवा नोटीस बजावत लाखोंचा दंडही वसुल केला आहे. दरम्यान या एप्लिकेशनमुळे नागरिकांचा तक्रारींचा पाढा वाढल्यामुळे कंत्राटदार कमालीचा धास्तावला आहे. दुसरीकडे शहरातील कचराकोंडी देखील दूर होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होत आहे.