Sambhajinagar : ठेकेदाराकडून सुरू असलेल्या छळातून सातारा - देवळाईकरांची सुटका कधी होणार?

sambhajinagar
sambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पावसामुळे सातारा - देवळाईतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.‌ दुसरीकडे भर पावसाळ्यात या भागात एकाच वेळी भुयारी गटार आणि नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाईप लाईनसाठी रस्ते खोदून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे याभागातील एकूण सर्वच ७२ किमीच्या रस्त्यांची अवस्था तर भयंकर झाली असून दुरुस्तीसाठी आता डांबरीकरणाऐवजी व सिमेंटीकरणाऐवजी ठेकेदाराकडून चक्क खोदलेल्या रस्त्यांवर खडी आणून टाकली जात आहे.‌ त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. आता पावसामुळे नागरिकांची ही समस्या अधिकच वाढली आहे. मात्र या छळातून सातारा - देवळाईकरांची काही सुटका होत नाही.

sambhajinagar
Ajit Pawar : लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा निर्णय; जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे...

सातत्याने होणारे खोदकाम आणि काम झाल्यानंतर देखील रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. या होणाऱ्या त्रासाबद्दल रेणुकापुरम परिवार, सातारा - देवळाई नागरी कृती समिती, जनसेवा नागरी कृती समिती, जनसेवा, महिला नागरी कृती समिती, संघर्ष समिती, राजेशनगर नागरी कृती समिती, सोमेश्वर प्रतिष्ठाण, छत्रपती नगर मित्र मंडळ व अन्य संघटनातील असद पटेल, सोमीनाथराव शिराणे, हरिभाऊ हिवाळे, पद्मसिंह राजपूत, बद्रीनाथ थोरात, शिवराज पाटील कडू, स्मिता पटारे, सुचिता कुलकर्णी, मेघा थोरात, ॲड. वैशाली कडू पाटील, स्मिता भुजंग, हेमलता पाटील, सोनाली बोरसे, हनुमंतराव सोनवणे, अनंत सोन्ने, आबासाहेब देशमुख , सुरेश कसबे यांनी अनेकदा अनोखे अंदोलन करत ढिम्म प्रशासनाचे लक्ष वेधले होते. काही ठिकाणी तर चक्क रस्त्यांवरील चिखलात भर पावसात भाताचे रोप लागवड करत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. 

सातारा - देवळाई भागात खड्ड्यांची समस्या नवीन नाही. मात्र दरवर्षी ही समस्या जीवघेणी ठरत आहे. सगळीकडे रस्त्यांवर खड्डेच खड्डे, चिखल, माती आणि पाण्याचे आणि ड्रेनेजच्या पाण्याचे डोह साचले आहेत. या परिस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत. मात्र नागरिकांचा आवाज मनपा प्रशासनापर्यंत पोहोचतोय, ना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांपर्यंत, ना ठेकेदारांपर्यंत त्यामुळे समस्या कायम आहेत.

मलनिःसारण वाहिनी आणि जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते फोडून काढले. त्यातील चांगला मुरूम विकल्याचा या भागातील नागरिकांनी आरोप केलाय. उरली सुरली माती टाकून पाइप बुजवले. त्यावर रोड रोलरने दबाई केली नाही. सातारा - देवळाईकरांनी आवाज उठवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हाप्रमुख रमेश बहुले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदाराची चांगलीच कान उघाडणी केली. 

sambhajinagar
Mumbai Pune Highway : काळ्या यादीतील कंत्राटदाराचा निकृष्ट 'कारभार'; मुंबई पुणे महामार्गाचे तीन-तेरा

त्यानंतर खोदकामावर ठेकेदाराने खडी पसरवली. मुळात टेंडरच्या अटीशर्तीनुसार त्याने जिथे सिमेंट किंवा डांबरी रस्ता असेल तिथे त्याच पध्दतीने रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी रस्ता दुरूस्तीसाठी लागणाऱ्या निधीची टेंडरमध्येच तरतूद केलेली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे उप जिल्हाप्रमुख रमेश बहुले यांच्याकडून कान उघाडणी झाल्यानंतर देखील ठेकेदाराकडून खडी पसरवल्याने आता सातारा - देवळाईकरांना खडीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.

त्यावरून गाड्या घसरत आहेत. लहान मुले, महिला व वृध्दांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. सर्वच भागात रस्ते दुरुस्तीचे काम प्रलंबित ठेवले आहे. केवळ रेणुकामाता मंदीर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक या मार्गावर अर्धवट खडी टाकून ऐन पावसाळ्यात कंत्राटदाराने नागरिकांच्या त्रासात भर पाडली आहे. नागरिक हैराण असताना अनेक आंदोलने केली असताना व शिंदे गटाच्या शिवसेना उप जिल्हा प्रमुखांनी कान उघाडणी केल्यावर देखील कंत्राटदाराला घाम फुटला नाही. यावरून या मुजोर कंत्राटदाराला कोणाचे अभय आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

sambhajinagar
Sambhajinagar : संरक्षित गौताळा औट्रम घाट अभयारण्यात बेकायदा जलमिशन योजनेचा घाट

काय म्हणतात अधिकारी? 

पाईप लाईनसाठी केलेल्या खोदकामावर रस्ता जैसे करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. यासंदर्भात त्यांना सातत्याने सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते दुरुस्तीबद्दल त्यांच्या खूप तक्रारी आहेत. मुरुम चोरीच्या घटनाही घडत असल्याचे नागरिक तक्रारी करत आहेत. याप्रकरणी आम्ही देखील शहानिशा करत आहोत. ठेकेदाराच्या कामात हलगर्जीपणा असल्याचे मान्य आहे. त्यांना पुन्हा नोटीस काढून रस्त्याची कामे करायला सांगतो 

- दुष्यंत कोळी, कार्यकारी अभियंता

sambhajinagar
Solapur : कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे पुणे - सोलापूर महामार्ग धोकादायक बनलाय का?

रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा कॉलनी या रस्त्याचे खोदकाम केले. पाईपलाईन टाकली. पण, ठेकेदाराकडून रस्ते दुरुस्ती होत नाही. चार दिवसापूर्वी एका जेष्ठ नागरिकांचा पाय घसरून पडल्याने त्यात ते फ्रॅक्चर झाले. त्याच दिवशी एका शाळकरी मुलीचा देखील अपघात घडला. परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर मी स्वतः पाहणी केली होती. ठेकेदाराला तंबी देखील दिली होती. त्यानंतर त्याने खडी टाकली. मात्र पाईपलाईनचे काम अर्धवट आहे. काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण करणार असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. जर ठेकेदाराने काम केले नाही, तर त्याची देयके थांबवा, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

- रमेश बहुले, शिवसेना उप जिल्हाप्रमुख (शिंदे गट)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com