Sambhajinagar : 'या' रस्त्याचे काम कासवगतीने; अधिकारी नाॅट रिचेबल

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तीन महिन्यांपासून सुरू असलेले मुख्य शहानुरवाडी एकता चौक ते प्रतापगडनगर रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, खोदून ठेवलेला अर्धवट रस्ता रस्त्यावर पडलेले खडी आणि मुरूमाचे ढीग, त्यातून उडणारी धूळ यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे आणि बाजूला राहणारे नागरिक हैराण झाले आहेत.
रस्त्याच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी स्मार्ट सिटीतील जबाबदार अधिकारी स्नेहा नायर, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान आणि एजी कन्स्ट्रक्शनचा कंत्राटदार अस्लम राजस्थानी प्रयत्न करताना दिसत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Sambhajinagar
'टेंडरनामा'ची अजितदादांकडून दखल; DGIPRच्या अधिकाऱ्यांना.. (VIDEO)

सध्या शहानुरवाडी एकताचौक-शम्सनगर-प्रतापगडनगर यादरम्यान मुख्य रस्त्याचे रूंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यास किमान अजून सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी स्थिती आहे. आधी हा रस्ता केवळ खोदून ठेवण्यात आला होता. टेंडरनामाने स्पाॅट पंचनामा केला, वृत्तप्रसिद्ध केल्यानंतर गुरूवारी ठेकेदाराने मुरूम आणि खडीचे ढिग खड्ड्यात भरती केले. रस्त्याची निम्मी बाजू कामासाठी कोरला आहे. या अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी केवळ सिमेंटचे पोते मातीने अर्धवट भरून कडेला ठेवलेले आहेत. त्यावर रेडियम पट्ट्या देखील नाहीत. पुढे ठराविक अंतरावर ठेवलेले फायबर कठडे  खड्ड्यात आडवे पडलेले आहेत. दरम्यानच्या रस्त्यावर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

Sambhajinagar
EXCLUSIVE : DGIPRमध्ये 500 कोटींचा जाहिरात घोटाळा!

एकता चौकापासून पुढील प्रतापगडनगर गल्ली क्रमांक तीनपर्यंत अर्ध्या बाजूचा रस्ता उकरून तीन महिने झाले; परंतु तरी उर्वरित बाजू तशीच अर्धवट ठेवलेली आहे. विशेष म्हणजे अद्याप रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब आणि डीपी हटवण्याच्या कामाला देखील मुहुर्त लागलेला नाही. ठेकेदाराकडून महावितरणकडे बोट दाखवले जात आहे. महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांनी स्वतः या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. यासंदर्भात प्रतिनिधीने प्रकल्प अभियंता स्नेहा नायर, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, उप मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी तसेच अतिरिक्त मुख्याधिकारी अरूण शिंदे यांच्याशी याप्रकरणी संपर्क केला मात्र ते नाॅट रिचेबल होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com