छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : नव्याकोऱ्या कोट्यावधींच्या रस्त्यांवर खड्डे, धुळीचे साम्राज्य, ठिकठिकाणी एक्सपान्शन गॅपमध्ये गट्टू न टाकल्याने आरपार नाल्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास, रस्त्यांच्या चौकात काँक्रिट की पॅव्हरब्लाॅक, ड्रेनेजलाइनचे काम कुणी करावे याचा गुंता अद्याप सुटलेला नाही. दरम्यान रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अनेक भागात जुन्या ड्रेनेजलाईनच्या पाईपांवरच स्ट्राॅम वाॅटरचे पाइप टाकल्याने चेंबरलाइन फुटल्या. फुटलेल्या चेंबरचे पाणी चौकाचौकातील सखल भागातील खड्ड्यातच साचत असल्याने दुर्गंधी आणि घाण पाणी अंगावर उडत असल्याचा तिहेरी त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.
शहरात विविध भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत व्हाइट टाॅपिंग रस्त्यांची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात औरंगपुरा, भाग्यनगर, प्रतापगडनगर, हर्सुल, मकईगेट, शहानुरमियाँदर्गा, टिळकनगर व अन्य भागात रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र, सदर रस्त्यांचे काम अर्धवट असून यातील सर्वच रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून नव्याकोऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. त्यात रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा होत आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत होत असलेल्या या रस्ते दुरूस्ती कामांवर आयआयटीसारख्या नामांकीत संस्थेची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय दैनंदिन देखभालीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील समीर जोशी यांच्या यश इनोव्हेशन कन्स्लटंन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर १११ रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी ३१७ कोटी रूपयाचे टेंडर १५ टक्के कमी दराने भरणाऱ्या अस्लम राजस्थानी यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. रस्ते कामाची मुदत ९ महिन्याची असताना अद्याप पहिल्या टप्प्यातील २२ रस्त्याचे काम मुदत उलटून सहा महिने झाले असताना पूर्ण करण्यात आले नाही.
ज्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहे. ती देखील निकृष्ट पद्धतीने होत आहेत. रस्त्याची कामे करताना परिसरातील काही विद्युत पोल आणि अतिक्रमण हटविण्यात आली नाहीत. तसेच प्रत्येक रस्त्याचे कामदेखील रखडले आहे. काही ठिकाणी रस्त्याशेजारी खडी पसरली आहे. चौकाच्या मधोमध खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत. येथे खटक्या पडल्याने वाहनधारकांना झटके बसत आहेत. पण रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. या निकृष्ट रस्त्यांच्या कामाकडे महापालिका प्रशासक तथा आयुक्त डाॅ. अभिजित चौधरी यांच्यासह स्मार्ट सिटीचे उप मुख्याधिकारी सौरभ जोशी, अतिरिक्त मुख्याधिकारी अरूण शिंदे तसेच प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा बक्षी यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी वाहनधारकांना अणि स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते केले जात आहेत. पण ठेकेदाराच्या खराब कामामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्ता खराब झाला असल्याने धुळीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे डोळे धुळीने माखत आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहनांचे लहान मोठे अपघात होत आहेत. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने रस्ते कामाचे टेंडर, अंदाजपत्रक तसेच सुरूवातीपासून आजपर्यंत केलेल्या रस्त्यांची मोजमाप पुस्तिका आणि ठेकेदाराला अदा केलेली देयके, आयआयटी या तांत्रिक सल्लागाराने वेळोवेळी केलेल्या रस्त्यांच्या तांत्रिक तपासनीचे अहवाल तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत केलेल्या सर्व तांत्रिक तपासणीचे अहवाल व अन्य महत्त्वपूर्ण माहिती मागितली असता देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
यासंदर्भात प्रतिनिधीने महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी यांना थेट सवाल केले असता काही रस्ते ठिक असल्याचे ते म्हणाले. मात्र टेंडरनामा प्रतिनिधीने त्यांचा हा मुद्दा खोडत एकही रस्ता चांगला नसल्याचे सांगत सोबत पाहाणी करण्याचा आग्रह धरला, शिवाय निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर काँक्रिट कारवाई का होत नाही, असा प्रश्न केल्यावर मी बघतो, असे ते म्हणाले. यानंतर प्रतिनिधीने अतिरिक्त मुख्याधिकारी अरूण शिंदे यांना थेट सवाल केला. त्यावर संबंधित प्रकल्प सल्लागाराने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत केलेल्या तपासणीचे सर्व अहवाल चांगले आल्याचे म्हणत ठेकेदाराच्या बाजुने कौल दिला. पण हे सर्व अहवाल जर चांगले आहेत, मग रस्त्यांवर मेजर आणि मायनर क्रॅक का गेले, सरफेस उखडून खडी-वाळु-क्रॅश सॅन्ड बाहेर पडून उखळासारखे खड्डे का पडत आहेत, असा प्रतिप्रश्न करताच आयआयटीचे पथक येत्या काही दिवसात येणार आहे, सर्वच रस्त्यांची तांत्रिक तपासणी आयआयटीच्या लॅबमध्येच करण्याचा निर्णय घेणार आहोत, अन्य त्रयस्थ समितीमार्फत तपासणी करण्याचा निर्णय देखील घेणार आहोत, ज्या-ज्या रस्त्यांचा खराब भाग आहे त्याचे आम्ही मोजमाप करत नाहीत, त्या कामाचा रूपयाही ठेकेदाराला देणार नाहीत, खराब भाग काढून नव्याने करायचे सांगितल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात प्रकल्प सल्लागार इम्रान खान व स्नेहा बक्षी तसेच उप मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना थेट सवाल केले असता टेंडरनामाने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत त्यांनी देखील रस्ते खराब केल्याचे मान्य केले. ठेकेदाराला खराब रस्त्यांबाबत नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले, अद्याप आम्ही त्याच्याकडून एकही रस्ता हस्तांतर करून घेतला नाही, जोपर्यंत रस्ते चांगले होत नाही, आणि तांत्रिक दृष्ट्या आम्हाला योग्य वाटत नाहीत, तोपर्यंत रस्ते स्विकारले जाणार नाही, असे म्हणत सोमवारी आपणास या रस्त्यांबाबत सर्व माहिती देण्याची कबुली त्यांनी दिली.
या आहेत नागरिकांच्या मागण्या
● रस्त्यांचे काम निकृष्ट यावर टेंडरनामाने शहरातील काही तज्ज्ञांच्या पाहणीने शिक्कामोर्तब केले आहे.
● टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर आयआयटीने पाहणी केली. दरम्यान संबंधित तज्ज्ञांनीही काम आयआरसीच्या नियमाला बगल देत खड्डे आणि क्रॅक गेल्याचा अहवाल दिला आहे.
● यानुसार जनतेच्या कररूपी पैशातून कोट्यावधींच्या रस्त्यांचे बोगस काम करणार्या ठेकेदार आणि अधिकार्यांवर तसेच या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अथवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी.