छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील स्मार्टसिटीकडून जवळपास सर्व रस्ते निकृष्ट केले गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. आता हर्सुल ते पिसादेवी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात प्रकल्प संचालक इम्राण खान यांना थेट सवाल करताच त्यांनी देखील थेट उप मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या समक्षच कबुली दिली आहे. मात्र या रस्त्यावरील खराब झालेल्या रस्त्याचे आम्ही मोजमाप केले नाही. तो संपुर्ण भाग नव्याने तयार करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय रस्त्याच्या शेजारी फुटपाथवर घालण्यात आलेले पेव्हर्स देखील अनेक ठिकाणी ढिले झाले आहेत. एक्सपांशन गॅपमध्ये घातलेले पॅव्हर फुटल्याने वाहतूकदारांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या कामाबाबत सवाल केला असता पॅव्हर ८० एमएमचे आहेत, त्याची तांत्रिक तपासणी केली आहे. दर्जा उत्तम असल्याचे म्हणत इम्रान खान यांनी ठेकेदाराची वकिली केली. त्यामुळे येथील स्मार्ट रस्त्यात अंथरलेले काँक्रिट आणि पॅव्हरब्लाॅकचा दर्जा आयआयटी तसेच शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वगळता इतर तज्ज्ञांमार्फत तपासण्यात यावा अशी मागणी पुढे आली आहे.
स्मार्टससिटीच्या रस्तेकामात 317 कोटी रुपये खर्च केले जात असून नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय होत आहे; परंतु येथील कारभारी ठेकेदाराला रस्ता दुरूस्तीच्या नोटीसा बजावत पाठीशी घालत आहेत. मात्र, कोट्यवधी खर्चून केलेले काम अवघ्या काही महिन्यांत खराब होणे ही गंभीर बाब आहे. यात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता स्मार्ट सिटी प्रकल्पातील इतर कामांबाबतही शंका निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मनात अगोदरच यावरून नाराजी होती.
पेव्हर्स आकाराने लहान
पेव्हर्सचे काम खराब होण्यामागे काही कारणे आहेत. येथे लावण्यात आलेले पेव्हर्स हे आकाराने लहान आहेत. त्यामुळे वाहने गेल्यावर त्यांचा भार पेलण्याची पेव्हर्सची क्षमता नसल्याने ही स्थिती झाली आहे. कामात योग्य तंत्रज्ञान वापरले नसल्याने व पेव्हर्समध्ये अंतर असल्याने ते ढिले पडले आहेत. तसेच रस्त्यात अंथरलेले मिक्स काँक्रिट देखील निकृष्ट दर्जाची असल्याने एक वर्षसुद्धा रस्ते टिकणार नाहीत. अशी प्रतिक्रीया शहरातील स्थापत्य विषयाचे तज्ज्ञ मंडळी देत आहे.