छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पंतप्रधान आवास योजना (PMAY) अर्थात खाजगी भागीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिल्या. योजनेतील घरांच्या बांधकामांसाठी टेंडर पे टेंडर (Tender) काढण्यात आले, कंत्राटदार (Contractor) देखील नियुक्त केले. त्यांनी नियमानुसार शुल्क देखील भरले . मात्र काॅन्ट्रॅक ॲग्रीमेंट करण्याआधीच आचारसंहिता लागल्याने योजना थंडबस्त्यात अडकल्याचे महानगरपालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
खाजगी भागीदारीद्वारे स्वतःची जागा नसलेल्या अर्जदारांना योजनेचा लाभ उपलब्ध करून देणेसाठी महानगरपालिकेने मागील चार वर्षांपासून जिल्हाधिकारी व राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर तत्कालिन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सरकारी जागा उपलब्ध करून दिल्या. प्रत्यक्ष जागेवरील वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रथम टप्प्यात गृहनिर्माण विभागाच्या ११ जानेवारी २०१८ च्या प्रतिकृती क्रं.५ नुसार मौजे तीसगाव येथील गट क्रमांक २२५/१, २२७ /१ व मौजे पडेगाव येथील गट क्रमांक ६९ आणि मौजे सुंदरवाडी येथील गट क्रमांक ९ व १० मधील एकूण २४.४९ हेक्टर आर क्षेत्रावर पंतप्रधान आवास योजनेच्या (शहरी) अंतर्गत गृहप्रकल्प उभारण्यासाठी १३ मार्च २०२३ रोजी नव्याने टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते.
मौजे तिसगाव, सुंदरवाडी, पडेगाव या करिता प्रत्येकी एक टेंडर प्राप्त झाले होते. व मौजे तिसगाव गट क्रमांक २२७/१ करिता एकही टेंडर प्राप्त न झाल्यामुळे १८ एप्रिल २०२३ रोजी फेर टेंडर काढण्यात आले होते. टेंडर स्विकृतीची अंतिम तारीख ३ मे २०२३ होती. परंतु दुसऱ्या वेळेस देखील मौजे तिसगाव गट क्रमांक २२५ /१ सुंदरवाडी व पडेगाव या करिता प्रत्येकी एकच टेंडर प्राप्त झाले व मौजे तिसगाव गट क्र.२२७ / १ करिता एकही टेंडर प्राप्त झाले नाही.
दोन वेळेला टेंडर प्रसिद्ध करूनही एकच कंत्राटदाराने सहभाग नोंदवल्याने टेंडर समितीने तांत्रिक व आर्थिक क्षमतेत बदल न करता घरकुलासाठी नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पी +४ची अट शिथिल करून शहर विकास नियंत्रण नियमावलीनुसार बांधकाम योग्य क्षेत्रावर अनुज्ञेय बांधकाम करण्याचा बदल करून ५ जून २०२३ रोजी टेंडर सूचनाद्वारे तिसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले.
मौजे सुंदरवाडी गट क्रमांक ९ व १० व मौजे तिसगाव गट क्रमांक २२५/१ याठिकाणी प्रत्येकी दोन टेंडर प्राप्त झाले. मौजे पडेगाव गट क्रमांक ६९ व मौजे तिसगाव गट क्रमांक २२७/१ याठिकाणी एकल टेंडर प्राप्त झाले. तिसऱ्यांदा काढलेल्या टेंडर कार्यवाहीत प्राप्त टेंडर प्रस्तावांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यानंतर टेंडर धारकांचे प्रकल्प संकल्पना सादरीकरण २८ ऑगस्ट २०२३ रोजी झाले.
मौजे हर्सुल गट क्रमांक २१६ या गृमप्रकल्पाची ३० जून २०२३ रोजीच्या टेंडर सूचनेद्वारे प्रथम वेळ कार्यवाही करण्यात आली. या ठिकाणी दोन टेंडर प्राप्त झाल होते. त्यांचेही तांत्रिक मूल्यमापन करण्यात आले. टेंडरधारकांची बोली २३ ऑगस्ट २०२३ रोजी उघडण्यात आली. वाटाघाटीनुसार टेंडर मंजूर करण्यात आले. एल -१ टेंडरधारकांना एल ओ आय (Letter of Intent) निर्गमित करण्यात आले आहे.
मौजे सुंदरवाडी गट क्रमांक ९ व १० येथील एल -१ कंत्राटदार औरोथ्रोन जे.व्ही. यांनी ३ कोटी ४ लाख ७९ हजार ७६०, मौजे तिसगाव गट क्रमांक २२५/१ येथील कंत्राटदार संघ सहकार जे. व्ही. यांनी १ कोटी ८३ लाख १८ हजार, मौजे तिसगाव गट क्रमांक २२७/१ येथील कंत्राटदार संघ युनिटी डेव्हलपर्स यांनी ४ कोटी ४२ लाख २६ हजार, मौजे हर्सूल गट क्रमांक २१६ येथील कंत्राटदार सारा इन्फ्रास्ट्रक्चर यांनी ६० लाख ५० हजार एवढी सुरक्षा अनामत रक्कम भरली आहे.
कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र कंत्राट करारनामे तयार करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असताना लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने योजना काही महिन्यांसाठी थांबली. प्रत्यक्षात गृहप्रकल्पांची कामे सुरू झाल्यानंतरच पात्र अर्जदारांना योजनेचा लाभ देण्याचे नियोजन असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले.
या घटकातील पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यासाठी नव्याने १९ डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत जुन्या तसेच नवीन अर्जदारांकडून अद्ययावत कागदपत्रांसह ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण ४२३९६ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची छाननी केली असता ४२ हजार ३९६ पैकी ४००५८ अर्ज पात्र असून ५१० अर्ज अपात्र ठरले आहेत.