छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा गांधेली रस्ता पार खड्ड्यात गेला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री मतदार संघाचे आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्या मतदारसंघात येणाऱ्या या गावातील रस्त्यालगतच बागडे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेला देवगिरी दूध उत्पादन प्रकल्प आहे. गावात ग्रुप पंचायतीचे मोठे कार्यालय असल्याने या ठिकाणी शासकीय कामानिमित्त रोज इतर गावातील नागरिकांची रेलचेल असते. चारही बाजूंनी हिरव्यागार शालूने नटलेल्या दक्षिण पठाराच्या कुशीत असलेला ऐतिहासिक बाग तलाव याच गावात असल्याने पर्यटकांची देखील या मार्गावर ये-जा सुरूच असते. मात्र रस्ताच खड्ड्यात हरवल्याने गावकऱ्यांसह पर्यटकांचे कंबरडे मोडत आहे.
३ जानेवारी २००७ दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्यासाठी ५३ लाख ७३ हजार १६६ रुपये खर्च करून योग इंडस्ट्रीज या कंत्राटदारामार्फत रस्त्याच्या दर्जोन्नतीचे काम करण्यात आले होते. हा निधी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराकडे रस्ता दुरूस्तीचा कालावधी बारा महिन्यांचा असल्याने ३ जानेवारी २००८ रोजी कालावधी संपला. दरम्यान १५ वर्षांपासून या रस्त्याकडे बांधकाम विभागाने ढुंकुनही पाहिले नाही. याच मार्गावर शाळा, रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय आहे.
विशेषत: हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ बीड बायपास तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -एन एच -५२ सोलापूर - धुळे महामार्गाला जोडणारा आहे. एकाच वेळी दोन्ही महामार्गाचे काम काढल्याने या महामार्गांच्या कामासाठी गौणखनिजाच्या वाहतुकीसाठी याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. यापुर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत अर्धा कोटी इतक्या तुटपुंज्या निधीतून केला गेलेला रस्ता केवळ आठ टन वाहतुकीची क्षमता ठेवून कंत्राटदाराने तयार केला होता. मात्र क्षमतेपेक्षा चार ते पाच पट अधीभाराची वाहने त्यावरून वाहिल्याने रस्ता होत्याचा नव्हता झाला आहे.
यासंदर्भात गांधेली ग्रामपंचायत कार्यालयाने जागतिक बॅंक प्रकल्प शाखा आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला वारंवार लेखी निवेदन देण्यात आली.मात्र संबंधितांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. या मार्गावर सर्व सामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच रुग्णांची मोठी वर्दळ असते व त्याच प्रमाणे या मार्गावर वारकरी संप्रदायाचे केंद्र असल्याने राज्यभरातून भाविक भक्त येत असतात; परंतु स्मार्ट छत्रपती संभाजीनगर शहराच्या कुशीत असलेल्या गांधेली रस्त्याची ही अवस्था पाहून नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांमुळे शेतकरी व पायी ये-जा करणारे नागरिक व लगतच्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या अंधारात खड्डे लक्षात येत नसल्याने अनेकदा मोटारसायकलस्वारांचे छोटे-मोठे अपघात याठिकाणी होत आहेत. सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात ग्रामपंचायतीच्या वतीने तात्पुरते मुरुम टाकून डागडूजी करण्यात आली आहे. पण गौण खनिजाच्या जड वाहनांनी मुरूमाने देखील तग धरला नाहीऐ. रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.