छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-३ भागात झाडाझुडपांचा पालापाचोळ्या मोठा ढिगारा न उचलल्यामुळे हायकोर्ट ते सिडको टी पाॅईंट सर्व्हिस रस्ता आणि त्याला समांतर असलेल्या शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जालनारोडवरील वाहनधारक आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यात हवेने कचरा उडून जात होता. महापालिकेतील घनकचरा विभागाच्या दुर्लक्षित कारभाऱ्यांमुळे ढिगारा एक महिन्यापासून तसाच पडून होता. कारभाऱ्यांच्या मनमानीविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. 'टेंडरनामा'ने महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना फोटो पाठविताच घनकचरा विभागाने येथील साचलेला पालापाचोळ्याचा ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आहे. मात्र इतर ठिकाणी शहरभर ही समस्या कायम आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
महावितरण कंपनीने विजतारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्यानंतर संबंधित ठेकेदारामार्फतच त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. शिवाय नागरिकांनी देखील घरासमोरील अथवा बागेतील लहाणमोठ्या झाडांची छाटणी केल्यानंतर या सुक्या ग्रीनवेस्टची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. महापालिकेमार्फत ओला व इतर सुका कचरा जमा करणे व त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. परंतु मोठमोठ्या झाडांच्या फांद्या व त्यातील पालापाचोळावर प्रक्रिया करणारा ग्रीन वेस्ट प्रकल्प महापालिकेने उभा केलेला नाही. ओल्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराच्या टेंडरमध्ये असा सुका कचरा उचलण्याची अट नसल्याने ठेकेदार देखील ग्रीन वेस्ट कचऱ्याचे ढिगारे उचलण्याकडे दुर्लक्ष करतात. टेंडर प्रक्रियेच असे ढिगारे उचलण्याची बोली नसल्यामुळे प्रशासन देखील त्यावर कारवाई करत नाही. दुसरीकडे महापालिकेकडे पर्याय नसल्यामुळे शहरातील ९ झोन मधील ११५ वार्डात ठिकठिकाणी असे ग्रीनवेस्टचे ढीग तयार झाले आहेत.
नागरिक व माजी नगरसेवकांनी फोन केल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून हा सुका कचरा उचलला जात नाही. सुक्या कचऱ्याच्या या ढिगांमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. ‘टेंडरनामा’ने सिडको एन-३ येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांचे 'टेंडरनामा'ने लक्ष वेधल्यानंतर महापालिका घनकचरा विभागाने तेथील ग्रीन वेस्टचा ढिग तत्काळ उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुळात वीजतारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे हे महावितरणची जबाबदारी आहे. त्याचा मोबदला देखील ठेकेदारांना दिला जातो. त्यासोबतच दारापुढील अथवा बागेतील झाडांच्या फांद्या व पालापाचोळ्याची विल्हेवाट लावने ही त्या-त्या नागरिकांची जबाबदारी आहे. मात्र, सगळेच महापालिकेतील घनकचरा विभागावर अवलंबुन असतात.
यासाठी महापालिकेने शहरातील ९ झोन मधील खुल्या पटांगणांचे तसेच उद्यानांचे सर्वेक्षण करून त्यात आकारमानाप्रमाणे खड्डे करून पालापाचोळ्यापासून शेंद्रीय खताची निर्मिती करून सार्वजनिक उद्यानातील फुलझाडे जगवता येतील. शिवाय झाडांच्या मोठमोठ्या फांद्या पालापाचोळ्यापासून वेगळ्या करून औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांच्या बाॅयलरसाठी पुरविल्यास महापालिकेला प्रत्येक झोनमधून कोट्यावधीचे उत्पन्न मिळवता येईल. यासाठी महापालिकेने स्वतंत्र ग्रीनवेस्ट विल्हेवाट कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. यात उद्यान विभागातील वृक्ष लागवड अधिकारी तथा उद्यान अधिक्षकांचा समावेश केल्यास घनकचरा विभागाला मदत होईल. कारण शहरातील विविध भागात वृक्षतोडीचा परवाना याच विभागातून घेतला जातो. त्यामुळे कोणत्या भागात कोणी वृक्षतोडीचा परवाना घेतला आहे व तोडताडीनंतर तो त्यातील फांद्या व पालापाचोळ्याची व्यवस्था कुठे करणार आहे, याची माहिती मिळवताना मोठी मदत होईल. महापालिकेतील माजी नगरसेवक, राजकीय पक्ष व सेवाभावी सामाजिक संस्थांना एकत्र करून कार्यकर्त्यांमार्फत माध्यमातून झाडांच्या पालापाचोळ्यातून कंपोस्ट खत कसे करावे, यासाठी वार्डावार्डात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती महापालिका प्रशासकांनी करणे गरजेचे आहे. तत्कालीन प्रभारी महापालिका आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी अशाच प्रयोगाच्या जोरावर सहा महिन्यात शहर स्वच्छ व सुंदर केले होते. मात्र त्यानंतर आलेल्या आयुक्तांनी फारशी ही गोष्ट मनावर घेतली नाही. परिणामी शहर स्वच्छतेच्या यादीत स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत महापालिकेला अग्रक्रमावर पोहोचता आले नाही.