छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : कोट्यावधी रुपये खर्च करुन छत्रपती संभाजीनगरकरांची महापालिकेने फसवणुक केली आहे. जनतेच्या घामातून जमा केलेल्या कररूपी पैशातून शहरातील छोट्याखानी खुल्या मैदानांवर साकारलेले नाना-नानी पार्कच्या कुलुपबंद प्रवेशद्वार आणि जाॅगिंग ट्रॅकवर कचऱ्याचे ढिग, आतील फुलझाडे, बाकडे गायब झाली आहेत.
शहरातील वार्डावार्डातील नागरी समस्यांवर टेंडरनामाने पकड मजबुत केली आहे. वार्डावार्डातील छोट्या-मोठ्या समस्यावर कायम प्रहार करत असल्याने महापालिका प्रशासनावर देखील दबाब निर्माण केला आहे. नेमक्या याच कारणाने शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी शहरातील नाना-नानी पार्क संदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीकडे कैफियत मांडली. त्यानुसार प्रतिनिधीने हडकोतील सलीम अली सरोवरानजीक स्वामी विवेकानंद नगरातील तसेच सिडकोतील एन-५ प्रियदर्शनीनगर-श्री-नगर दरम्यान व गारखेड्यातील जवाहर काॅलनी परिसरातील श्रीरामनगर येथील नाना-नानी पार्कची पाहणी केली. त्यात अत्यंत दुरावस्था झालेली दिसून आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करता यावे, एकमेकातील सुखदुःख वाटता यावे, मनमोकळ्या गप्पा करता याव्यात, ज्येष्ठातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेले जॉगिंग ट्रॅकवरील गट्टू उखडले असून गवतामध्ये ट्रॅक गायब झाले आहेत. पार्कमधील फुलझाडेही नष्ट झाली आहेत. विद्युत दिव्यांची तुटफूट झाली असून आजी-आजोबांना विश्रांती करण्यासाठी टाकण्यात आलेल्या बाकड्यांवरील लोखंडी साहित्य गायब झाले आहे. येथील कोणत्याही पार्कसाठी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नसून, संबंधित वार्ड अभियंता आणि प्रभाग अधिकाऱ्यांचे देखभाल-दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. येथील विविध काॅलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीनुसार महापालिकेने जाॅगिंग ट्रॅक, सुशोभिकरण, संरक्षक भिंती, पाण्याची व्यवस्था, पथदिवे, काँक्रिट भिंतीवर सुरक्षा जाळी, विविध प्रजातीची फुलझाडे आणि भारतीय वंशाची वृक्षलागवड करत कोट्यावधी रूपये खर्च करून हे पार्क उभारले आहेत.
नाना-नानींच्या नावाखाली खाबुगिरी
परंतु नाना-नानी पार्क तयार करायच्या नावाखाली संबंधित वार्डातील नगरसेवक महापालिका उद्यान अधीक्षकांना पत्र देतात. काम होत नसेल तर सभेत आवाज उठवतात. त्यानंतर विभाग कामाला लागतो. शाखा अभियंत्यामार्फत अंदाजपत्रक फुगवले जातात. त्यानंतर प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊन सर्वसाधारण व स्थायी समितीची मंजुरी घेऊन टेंडर काढले जातात. नगरसेवकांच्या मर्जीतल्याच ठेकेदारांना कामे दिली जातात.थाटामाटात भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यांसाठी व कामाच्या जाहिरातीसाठी पैसा खर्च केला जातो. सुरूवातीचे चार - सहा महिने ठेकेदार सुरक्षा अनामत रक्कम काढण्यासाठी दोष निवारण कालावधीपर्यंत अधूनमधून विकासकामाकडे चक्कर मारत थातूरमातूर लक्ष घालतो. एकदा की पैसा खिशात पडला की नंतर हा पैसा वाया जातो. नंतर संबंधित अधिकाऱ्यांना पार्कच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देणे तर सोडाच येथे कोट्यावधी रूपये खर्च करून नाना-नानी पार्क तयार केले होते, याचाच विसर पडतो.