छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जुन्या शहरातील रस्ता रूंदीकरणासाठी काही वर्षांपूर्वी महापालिकेने मालमत्तांवर टीडीआरला परवानगी दिली होती. काहींना रोख मावेजा दिला. मात्र पीआरकार्डवर महानगरपालिकेने नाव नोंदवले नाही. परिणामी मालसमत्ताधारकांनी टीडीआरचा लाभ घेतला. त्यावर बहुमजली इमारती थाटल्या. अनेकांनी विकास हक्क प्रमाणपत्र (टीडीआर) नियमावलीचा लाभ शहरातील इतर मालमत्तेसाठी वापरला. त्याआधारे त्या मालमत्तेवर जास्तीचे बांधकाम केले.काहींनी टीडीआरची खरेदी-विक्री करुन व्यवहार केले. पण जुन्या शहरात रस्ते विस्तारित करण्याची मोहीम बारगळली. रस्ता रुंदीकरणासाठी आणि इतर विकासकामांसाठी भुसंपादन केलेल्या जागा मुळ मालकांच्याच नावे असल्याने अनेक गैरव्यवहार झाले. यावर टेंडरनामाने खरपूस समाचार घेत झणझणीत वृत्तमालिका प्रसिद्ध केली. उशिरा का होईना पालिकेला जाग आली. आता जुन्या शहरातील शहर विकास आराखड्यानुसार "त्या" २२ रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी महापालिकेने जोरदार मोहीम सुरु केली आहे.
त्याच प्रमाणे शहरातील नाल्यांवरील दहा हजार अतिक्रमणे काढून नाल्यांच्या दगडी भिंतींची दुरूस्ती करणे, बुडापासून काँक्रिट करून पावसाळी पाण्याने नाले वाहते करून शेवटच्या टोकांवर बंधारे केल्यास शहरातील भुजळ पातळीत वाढ होण्यास मदत होईल यासाठी टेंडरनामाचा खास रिपोर्ट. महापालिकेने असे केल्यास छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा मिळेल, असे जलतज्ज्ञांकडून देखील मानले जात आहे. १० मे २०१४ २५ मे २०१४ दरम्यान पालिका आणि महसूल विभागाने केलेल्या पाहणीत नाल्यांवर दहा हजार अतिक्रमणे असल्याची माहिती समोर आली होती. अतिक्रमणांमुळे नाल्यातून पाणी वाहून न जाता ते वसाहतींमध्ये शिरते. त्यामुळे हजारो घरांना त्या अतिक्रमणांमुळे फटका बसतो. त्यामुळे नाल्यांची पाहणी करून त्यांची हद्द व पात्रांचा नकाशा तयार करण्यात आला होता. त्यावर मनपाने २० लाख रुपये खर्च केला. मात्र दहा वर्षांपासून एकाही नाल्यातील अतिक्रमण पालिकेने काढलेले नाही. नाल्याचे बॅकवॉटर घरात शिरल्यानंतर अनेक ठिकाणी संसार वाहून जातात. कुटुंब उघड्यावर येते. त्यानंतर मनपा सत्ताधारी, लोकप्रतिनिधींमध्ये आणि प्रशासनात नाल्यांची पाहणी करण्यात चढाओढ लागते. आश्वासनांची खैरात करून सर्व निघून जातात. नालेसफाई पूर्णपणे का होत नाही. अतिक्रमणे का काढली जात नाहीत. याचा कुणीही विचार करीत नाही.
नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यात पालिकेला अपयश का येते, याकडे कुणीही लक्ष देत नाही. औरंगपुर्यातील शिवाई ट्रस्ट, श्रीमान श्रीमती, औषधी भवन, सारस्वत व जनता सहकारी बँक, सुराणा कॉम्प्लेक्स, जाफरगेट येथील इमारती मुख्य नाल्यावर आहेत. हे नाले इमारतधारकांनी स्वच्छ करण्याच्या अटीवर बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. तांत्रिक पद्धतीने सफाई होणे गरजेचे आहे. दिवाण देवडी, चुनाभट्टी, गांधीनगर, गुलमंडी, औरंगपुरा या भागांत दरवर्षी नाल्याच्या बॅकवॉटरमुळे भयावह परिस्थिती निर्माण होते.
या नाल्यांवर आहेत अतिक्रमणे
अल हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, खाम नदी़, शहानूरवाडी ते दर्ग्यापर्यंतचा नाला, टाऊन हॉल ते वज्द मेमोरियल हॉलपर्यंत, नारेगाव, ब्रिजवाडी ते चमचमनगरपर्यंतचा नाला, किराडपुरा, इलियास मशीद ते कटकटगेटपर्यंतचा नाला, अल्तमश कॉलनी, एऩ के़पान सेंटर ते पुढे, एमजीएम ते जाफरगेट, बन्सीलालनगर - राजनगर ते जहागीरदार कॉलनी नाला, भानुदासनगर ते झांबड इस्टेट, उस्मानपुरा पोलीस स्टेशन - द्वारकापुरी ते श्रेयनगर नाला, तिरुपती विहार ते चाणक्यपुरीपर्यंतचा नाला, सिल्कमिल कॉलनी ते हमालवाड्यापर्यंत, सादातनगर नाला, पोलीस मेस ते फाजलपुरा, इंदिरानगर दक्षिण भागाकडील नाला, क्रांतीनगर ते सुयोग कॉलनी नाला, अमरप्रीत ते गौतमनगर, गांधीनगर नाला, जयभवानीनगर, शिवाजीनगर नाला, अजम कॉलनी ते शहाबाजार पूल नाला, रमानगर, श्रेयनगर, राठी टॉवर नाला, संजयनगर या नाल्यांवर अतिक्रमणे आहेत. औषधी भवनचा वादग्रस्त नाला दिवाण देवडीतील त्या नाल्यावर औषधी भवन ही इमारत बांधण्यात आली. इमारतधारकाला नालेसफाई करून घेणे बंधनकारक आहे. शहरातील मोठा नाला आहे.मात्र कधीही सफाई होत नाही.