छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरातील आताच्या उच्च न्यायालय ते मुर्तिजापुर म्हाडा काॅलनीपर्यंत जालना रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबलचक सर्व्हिसरोड होता. जालना रस्त्याच्या दोन्ही बाजुला गजबजलेल्या सिडकोतील वसाहतधारकांना पर्यायी रस्ता मिळावा या हेतूने सेव्हनहील ते चिकलठाणा विमानतळापर्यंत सिडकोचे शिल्पकार आणि भूसंपादन संस्था सिडकोकडूनच विकास आराखड्यात सर्व्हिस रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. सदर रस्ता डांबरी स्वरूपाचा असल्याने रुंदही मोठ्या प्रमाणात होता. याच रूंद दोन्ही रस्त्याच्या मधोमध जालना रस्ता आहे. त्यामुळे एकंदरीत जालनारोड व सर्व्हिस रोड मिळून रस्त्याची रुंदी मोठी असताना विद्यमान स्थितीत सर्व्हिसरोड अनेकांनी गिळंकृत केला आहे.
त्यारोडवर काहींनी बांधकाम करून जागा बळकावली आहे. म्हणजेच अतिक्रमण केले आहे. दुसरीकडे याच रोडवर मुकुंदवाडी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरच एनएचएआयने पादचारी पुल थाटून अतिक्रमणधारकांना बळकटी दिली आहे. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी महापालिकेने न्यायालयाचा आदेश असल्याचे म्हणत मुकुंदवाडी चौकातील अतिक्रमण काढले आणि अनेक वर्षांपासून गिळंकृत केलेला सर्व्हिस रस्त्ताचा श्वास मोकळा केला. मात्र, अद्याप येथील रस्ता व फुटपाथ बांधकामाचे टेंडर काढण्यासाठी आता महापालिकेला कुणाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
सिडकोतील सेव्हनहिल ते धुत हाॅस्पिटल दोन्ही बाजुने बड्या पंचतारांकीत हाॅटेल्स, सरकारी आणि खाजगी कार्यालयांचे व रूग्णालयांचे सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण न काढता केवळ मुकुंदवाडी चौकात सर्व्हिस रस्त्यावरील अर्धवट अतिक्रमण काढण्यात आले. त्यातही महिना उलटून गेल्यानंतर देखील रस्ता व फुटपाथ बांधकामाचे टेंडर काढण्यात आले नाही. परिणामी हा रोड आधीच अतिक्रमणाने व्यापलेला असताना पुन्हा अतिक्रमणधारकांचे चांगभल करण्याचा हा प्रकार आहे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. केंब्रिज नाका ते नगरनाका पर्यंतचा जालना रस्ता तसा वर्दळीचा समजला जातो. रस्त्याच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत शेकडो बळी या रस्त्याने घेतले आहेत. गल्लीबोळातील खाचखळगे आणि अरूंद सिमेंट रस्त्यांवरून न जाता शॉटकट मार्ग म्हणूनही अनेक जण या रस्त्याला पसंती देतात. जी-२० च्या काळात तर या मार्गाचे डांबरीकरण झाल्याने रहदारी अधिकच वाढली आहे. मात्र, या रोडलगत सिडको हद्दीत दोन्ही बाजुला असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर बड्या उद्योगपतींनी खाजगी कार्यालये, पंचतारांकीत हाॅटेल्स, सरकारी कार्यालये व रूग्णालयाच्या वाढीव बांधकामात रस्ताच गिळंकृत केला आहे.
काहींनी बांधकाम व कंपाऊंड रस्त्यातच करून रस्त्याचे नामोनिशान मिटवले आहे. अनेकांच्या बांधकामात सर्व्हिसरोडच गायब झाल्याने हा मार्ग अरुंद झाला आहे. यामुळे जालनारोडवर कायम वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताची मालिका अखंडीतपणे सुरूच आहे. गेल्यिच महिन्यात शेकडो अतिक्रमणांना अभय देत महिण्याभरापूर्वी याच मार्गावरील मुकुंदवाडी चौकातील काही दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले. मात्र अद्याप सर्व्हिस रस्ता व फुटपाथसाठी टेंडर काढण्यात आले नाही. उल्लेखनीय म्हणजे या मार्गावरील अतिक्रमण काढून तातडीने रस्ता रुंद करावा व व लगेचच डांबरीकरणाचे व फुटपाथचे बांधकाम करावे, अशा मागणीचे लेखी निवेदन महापालिकेला दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.