छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : येथील विश्रांती नगर ते सिडको एन-४ गोकुळ स्वीट मार्ट ते एमआयटी हाॅस्पीटल ते संकटमोचक हनुमान मंदिरपर्यंत दोन किलोमीटर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम वर्षभरापूर्वीच आमदार तथा मंत्री अतुल सावे यांच्या निधीतून करण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नियुक्त कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने जलवाहिनी टाकण्यासाठी हा नवाकोरा रस्ता खोदून काढला. मात्र जलवाहिनी टाकुन सहा महिने झाले. खोदलेल्या रस्त्याची दुरूस्ती करण्याची तरतूद असताना कंत्राटदारांकडुन दुरूस्ती केली जात नाहीऐ. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, जवळपास दिड लाख नागरिक प्रभावीत झाले आहे. रस्ता दुरूस्तीच्या कामाला गती देण्याची मागणी नागरीकांनी केल्यानंतरही कंत्राटदार दुर्लक्ष करत आहे.त्याच्या निषेधार्थ नागरिकांनी भर पावसात रस्त्यात उभे राहुण आंदोलन केल्यानंतर कंत्राटदार टाळ्यावर आला. त्याने खोदकामावर मुरुमाचे ढिगारे उभे केले, पण अद्याप महिनाभरापासून ढिगारे तसेच असल्याने नागरिकांच्या त्रासात भर टाकली आहे.
नव्यानेच आमदार निधीतून कोट्यावधी रूपये खर्च करून झालेला हा रस्ता जलवाहिनी टाकण्यासाठी आठ ते दहा फुट खोदण्यात आला. जवळपास सहा महिन्यांपासून जलवाहिनीचे काम झाल्यानंतर त्यात उकरलेली माती टाकून जीव्हीपीआर कंपनीने यंत्रणा पसार केली. रस्ता दुरूस्तीची तरतूद असताना त्याने पुढील दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केलेली नाही. यावर सिडको एन - ४ - सी सेक्टर, विश्रांतीनंतर, गणेशनगर, तापडीया पार्क आदी भागातील नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता राहुल रामकृष्ण इंगळे,निशांत रामगिरवार, राहुल मार्गे, वरद जोगस,आर.पी.गायकवाड, विवेक कांगले व अन्य परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कंत्राटदार जीव्हीपीआर आणि महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा थेट भर पावसात खड्डेमय रस्त्यावर उभे राहुण निषेध व्यक्त केला. त्याचे फलकही त्यांनी खड्ड्यात लावले. विशेषतः महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम पाहणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी कंत्राटदाराकडून रस्ते दुरुस्ती केली नाही, तर महानगरपालिका दुरुस्तीसाठी पुढाकार घेईल व कंत्राटदाराकडून निधी वसुल केला जाईल, पण नागरिकांना कुठलाही त्रास होऊ देणार नाही. मात्र अशीच परिस्थिती शहरात सगळीकडे असताना नागरिकांचा जीव गेल्यावर प्रशासक जी. श्रीकांत यांना जाग येईल का?असा संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा कंत्राटदारावर वचक नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांनी भर पावसात आंदोलन आणि तीव्र शंब्दात निषेध व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या कंत्राटदाराने खोदकाम केलेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे. ठिकठिकाणी रहिवासी वसाहत, बाजारपेठ, रुग्णालयासमोर मोठमोठे ढिग पडले आहेत.मात्र आता ते खड्ड्यात फैलावनार कोण असा प्रश्न पडला आहे. आधी खड्ड्यांचा त्रास आता डोंगर उभे केल्याने अडचणीत भर पाडली आहे. विश्रांतीनंतर पासून हा रस्ता सिडको एन-४ या गजबजलेल्या वसाहतीतून कामगार चौक, हायकोर्ट-जालनारोडला जुळतो. मार्गावर शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, मोठी रुग्णालय, हाॅटेल्स, खाजगी क्लासेस, सरकारी निमसरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील नवीन शहरातील हा अधीक रहदारीचा रस्ता असल्यामुळे विद्यार्थी, महिला, वृद्धांना त्रास सहन करावा लागतो. वेळोवेळी विद्यार्थी, वृद्ध खोदकामात पडून दुखापत होते. रस्त्यालगत दाट वसाहती असल्याने नेहमीच वर्दळ असते. खोदलेल्या रस्त्यामुळे भर पावसाने चिखल झाला आहे. नागरिकांना वाहने आत-बाहेर काढता येत नाहीऐत. वाहने फसून नागरिक पडत आहेत, अपघात होत आहेत. रस्ता लवकर व दर्जेदार करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून वेळकाढूपणाचे उत्तर मिळत आहे. परिसरातील नागरिकांनी आधी आमदार निधीतून जसा रस्ता झाला होता. त्याच कामाचा दर्जानूसार रस्ता दुरूस्त करण्यात यावा यावर अधिक भर दिला आहे. काम चांगल्या दर्जाचे व लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.