छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको मुकुंदवाडी परीसरातील संघर्षनगरातील धोकादायक गणेश विसर्जन विहीरीचा पडलेल्या कठड्यामुळे वाहनधारकांसह वसाहतीतील नागरिक आणि चिमुकल्यासाठी निर्माण होणारी जीवघेणी समस्या ‘टेंडरनामा’मधून प्रसिद्ध होताच झोन क्रमांक सहाचे शाखा अभियंता मधुकर चौधरी, गायकवाड आणि कार्यकारी अभियंता राजीव संधा यांनी महापालिका प्रशासकांकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी २३ लाखाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळवली. याशिवाय लेखा विभागाची वित्तीय मान्यता देखील घेतली.
१४ एप्रिलनंतर डोईफोडे कन्स्ट्रक्शन कंपनी या ठेकेदाराकडून विहीरीची मलमपट्टी सुरू होणार असून, ही दुरुस्ती तब्बल २३ लाख रूपये खर्च करून होणार आहे. विहीरीचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खालच्या जमीनस्तरापासून वरच्या लेव्हलपर्यंत काँक्रिट भिंत बांधल्या जाणार आहेत. याशिवाय विहीरीचे कठडे बांधुन त्यावर लोखंडी सुरक्षा जाळी बसविण्यात येणार आहे. विहीरीची कायम स्वरूपाची दुरूस्ती करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी माजी सभापती तथा नगरसेवक मनोज बन्सीलाल गांगवे यांचे आभार मानले आहे.
सिडको एन-दोन मुकुंदवाडी परिसरातील वार्ड क्रमांक ८५ संघर्षनगरात श्री विसर्जनाच्या विहिरीत वर्षभर कचरा, निर्माल्य व घाण टाकली जाते. या विहिरीवर जाळीही नाही. धक्कादायक बाब म्हणजे भर दाट वसाहतीत मुख्य चौकातील रस्त्यांना खेटूनच असलेल्या या विहीरीचे कठडे तुटल्याने त्यातील गाळात पडून लहान मुले, वाहनधारकांना केव्हाही धोका होऊ शकतो. यासंदर्भात महापालिका प्रभाग तथा शहर सुधार समितीचे सभापती मनोज बन्सीलाल गांगवे यांनी या जीवघेण्या विहिरीच्या दुरूस्तीबाबत महापालिका प्रशासनातील वार्ड अभियंता कार्यालयापासून तर आयुक्तांपर्यंत सहाव्यांदा पत्र व्यवहार केला होता. याशिवाय सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. मात्र अधिकारी बधत नव्हते. यानंतर गांगवे यांनी 'टेंडरनामा'कडे कैफियत मांडली होती.
या विहिरीत श्री विसर्जनानंतर देखील कधीही साफसफाईच केली जात नसल्याचे ' टेडरनामा ' पाहणीत उघड झाले होते. संघर्षनगरात गणेश विसर्जनाची ही जुनी विहीर आहे. या विहिरीची साफसफाई गणेश विसर्जनाच्या आठ दिवस आधी होते व विहिरीत महानगरपालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी पाणी भरण्यात येते. मात्र विसर्जनानंतर या विहिरीतील निर्माल्याची साफसफाई वर्षभर होतच नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास वर्षभर सहन करावा लागतो, तसेच साथीचे आजार पसरतात.
गणेश विसर्जनासाठी राखीव ठेवलेल्या या विहिरीमध्ये विसर्जनाव्यतिरिक्त पितृ पंधरवड्यात पिंडांचे विसर्जनही केले जाते. त्यातील खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य या विहिरीत टाकले जाते. त्यामुळे ते अन्न विहिरीत कुजून दुर्गंधीचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. दैनंदिन पूजेचे निर्माल्यसुद्धा याच विहिरीत टाकण्यात येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव संपूर्ण वसाहतीत वाढलेला आहे. यासंदर्भात सभापती मनोज गांगवे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, एक दिवस गणपती विसर्जनाचा सोहळा पाहायला आम्हाला फार आनंद वाटतो. मात्र वर्षभर दुर्गंधीचा त्रास सोसावा लागतो. येथील रहिवाशांनी या समस्येची तक्रार केल्यानंतर गांगवे यांनी दोन वर्षांपासून महापालिका प्रशासनाकडे विहीरीची सफाई आणि दुरूस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्यांना आश्वासनाशिवाय काही मिळाले नव्हते. अखेर टेंडरनामा वृत्तानंतर त्यांनी प्रशासनातील कारभार्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान दोन वर्षापासून रखडलेल्या त्या विहिर दुरूस्तीच्या प्रस्तावाला पाय फुटले आणि आता दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागला.