छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेच्या गरवारे क्रीडा संकुलाचा खेळखंडोबा टेंडरनामाने उघडकीस आणला. त्याची दखल घेत आयुक्त तथा प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी चालू आर्थिक वर्षात सव्वासात कोटीची तरतुद केली. यात क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे. खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे साऊथ पॅव्हेलियन बांधणे, फ्लड लाईट लावणे व नागरिकांसाठी विशेष जाॅगिंग ट्रॅक तयार करणे इत्यादी कामाचा समावेश करण्यात आला आहे. आनंदाची बाब म्हणजे टेंडरनामाने शहरातील इतर नागरी क्रीडा केंद्रातील बॅडमिंटन कोर्टच्या व इतर खेळाच्या सुविधा पुरविण्याकरीता दीड कोटींची विशेष तरतुद करण्यात आली असून, शहरातील लहान मोठे क्रीडांगणे सुध्दा विकसित करण्याचा मानस प्रशासकांनी व्यक्त केला आहे. पण, गरवारेतील जलतरण तलावाच्या नशिबी अद्याप गटांगळ्याच असल्याचे दिसत आहे.
2007-08 मध्ये क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधण्याच्या प्रस्तावावर टेंडर काढण्यात आली होती. तब्बल अडीच कोटी रुपयांचे बजेट या तलावासाठी ठरविण्यात आले होते. 78 लाख रुपये बांधकाम करण्यात घालवण्यात आले; परंतु त्यानंतर मध्येच मनपा आयुक्तांनी परिपत्रक काढून व मनपाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे कारण सांगून पुढील काम थांबविले. तेव्हापासून हा जलतरण तलाव अर्धवट राहिला. जलतरण तलावाला विकसित करण्यासाठी तब्बल १३ वर्षापासून बजेटची तरतुद केली नाही.
चालु आर्थिक वर्षात देखील कुठलीही तरतुद केली नाही. महापालिकेच्या या बदलत्या भूमिकेमुळे तलावाच्या गटांगळ्या अजुन किती वर्ष सुरू राहतील हे न समजणारे कोडे आहे. जर येथे जलतरण तलाव बांधायचाच नव्हता, मग मनपाने 78 लाख खर्च करून मोठे हौद का बांधले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालु आर्थिक वर्षात प्रशासकीय इमारत व पॅव्हेलियनची स्थिती बदलणार असली तरी जलतरण तलावाचा देखील विकासकामात समावेश करणे गरजेचे होते.
१३ वर्षापासून वाजले तीन तेरा
जलतरण तलावाचे बांधकाम बीओटी तत्त्वावर करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2010 मध्ये तत्कालीन महापौर विजया राहाटकर यांनी घेतला होता. परंतु तिजोरीतील खडखडाटामुळे याचा ताळमेळ बसला नाही. सुरुवातीपासूनच या तलावाच्या बांधकामाला नाट लागली आहे. आधी बीओटी तत्त्वावर बांधकाम करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. नंतर स्वत:च हा तलाव बांधावा, असा निर्णय मनपाने घेतला; पण दिवाळखोरीमुळे पुन्हा बीओटी तत्त्वावरच बांधकाम करण्याचा प्रस्ताव पुन्हा विचाराधीन होता. वारंवार बदलणाऱ्या या प्रस्तावाच्या खेळात तलावाचे काम अर्धवटच राहिले आहे. गेल्या १३ वर्षांपासून जलतरण तलावचे काम रखडले असून झालेल्या अर्धवट कामाचे देखील तीनतेरा वाजले आहेत. प्रशासकांनी संकुलातील वसतिगृहाची दैना देखील सुधारण्यासाठी पुरेसा निधी द्यायला हवा होता.
टेंडरनामाचा प्रहार; अखेर सव्वासात कोटीची तरतूद
1 लाख 11 हजार 980 चौरस मीटर जागेवर उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाचे 6 ऑगस्ट 1997 रोजी छत्रपती संभाजीनगरचे तत्कालीन पालकमंत्री तथा परिवहनमंत्री व माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले होते. या संकुलामुळे औरंगाबादच्या क्रीडाविश्वात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते; परंतु नंतर संकुलाच्या नशिबी वनवास आला आहे. एवढ्या मोठ्या विस्तीर्ण मैदानात गाजरगवत व रानटी झुडपांची शेतीच जणू बहरली आहे. त्यातच पावसाळ्यात पाणी व दलदल वाढल्याने साप, विंचू-काटे, सरडे व बेडकांचा सुकाळ झालेला दिसतो. संकुल परिसरात शहरभर जप्त केलेली भंगार वाहने आणि विद्युत विभागाचे भंडार केल्याने क्रीडा संकुलाची शोभा गमावली आहे.