छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जालना राष्ट्रीय महामार्गावर कॅम्ब्रीज चौक ते चिकलठाणा विमानतळ पोलिस पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातामध्ये अनेकांच्या मृत्युस आणि कायमस्वरूपी अंथरूणावर जायबंदी करण्यास कमी उंचीचा दुभाजक हे प्रमुख कारण ठरले आहे. कॅम्ब्रीज चौक ते चिकलठाणा विमानतळ पोलिस पेट्रोल पंपासमोर सुमारे या सुमारे २.५ किलोमीटरच्या टप्प्यात केवळ दोन इंच उंचीचा दुभाजक आहे. स्थानिक नागरिकांनी दुभाजकाची उंची वाढविण्यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही, प्रशासनाने त्याकडे आजवर दुर्लक्षच केले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोड हा शहराची मुख्य लाईफलाईन आहे. या मार्गावर फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कॉर्पिओ, जीप आदी मोठ्या गाड्यांसह एसटी, बस, ट्रक आदी मोठी वाहने अपघातानंतर सहजरीत्या कमी उंचीच्या दुभाजका-वरून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन, समोरून येणाऱ्या वाहनांवर आदळत असल्याची सद्यःस्थिती आहे. सहा वर्षापूर्वी भल्या पहाटे हाॅटेल काळे बंधुसमोर झालेल्या अपघातामध्ये तीन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेकांना गंभीर जखमी व्हावे लागले होते. कमी उंचीचा दुभाजक तोडून मोठी व छोटी वाहने विरुद्ध बाजूस जाऊन अपघात होत असतानाही प्रशासन त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे वास्तव आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन दुभाजकाची उंची वाढवावी, यासाठी स्थानिक नगरसेवक अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, त्यात अद्याप यश आले नाही. 'बांधा आणि वापरा’ यानुसार ‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बॅंक प्रकल्प शाखेने २००६ -०७ मध्ये महानुभाव आश्रम पैठणरोड ते झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक ते लाडगाव टोलनाका ते नागोण्याची वाडी टोलनाका, कॅम्ब्रीज चौक ते चिकलठाणा विमानतळापर्यंत रस्ता बांधणीचे काम केले. १३० कोटींचे हे टेंडर मुंबईच्या सद्भाव जाॅईंट व्हेंचर कंपनीला दिले होते. त्या वेळी कंपनीने महामार्गाच्या मध्यभागी कमी उंचीचा दुभाजक केला. मागील १६ ते १७ वर्षांत रस्त्याची देखभाल- दुरुस्ती केल्यानंतर या दुभाजकाची उंची आणखीनच कमी झाली.
सध्या डांबरी रस्त्याच्या एक इंच इतक्या उंचीचा दुभाजक शिल्लक आहे. २०१८-१९ मध्ये कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका या महामार्गाचे रूंदीकरण आणि स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. परिणामी सद्भाव जाॅईंट व्हेंचर कंपनी आणि जागतिक बॅंक प्रकल्प शाखेने रस्ता देखभाल दुरुस्तीची या महामार्गाची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दिली. त्या नंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कॅम्ब्रीज चौक ते चिकलठाणा विमानतळ रस्त्याचे डांबरीकरण केले. आणि दुभाजकाची उंची अजुन कमी केली. त्यानंतर कमी उंचीच्या दुभाजकाचा प्रश्न दूर ठेवण्यात आला. त्यांनी हैद्राबादच्या सृष्टी इन्फास्ट्रक्चर कंपनीला हे काम दिले होते. कंत्राटदाराने ७४ कोटी रुपये उकळले पण चुकीच्या पद्धतीने काम केल्याने जालना रस्त्याची कोंडी तर फुटलीच नाही, याउलट रस्त्यांवर तळे साचतात. त्यात दुभाजकाच्या उंचीकडेही दुर्लक्ष केले. संबंधित कंत्राटदाराने अडचणी वाढविल्यानंतर आता कॅम्ब्रीज चौक ते चिकलठाणा विमानतळापर्यंत रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. मात्र या विभागाने जी -२० व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा-निमित रस्त्याचे काम करून पुन्हा दुभाजकाची उंची रस्त्याच्या लेव्हल पर्यंत आणून ठेवली आहे. पण दुभाजकाची उंची वाढवण्यासाठी खटाटोप केला गेला नाही.
लाखोंचा जीव धोक्यात !
चिकलठाणा विमानतळ ते कॅम्ब्रीज चौक शाळा, हॉस्पिटल, बाजार, रेल्वे स्टेशन, बस-एसटी थांबे, पोलिस ठाणे आदी वेगवेगळ्या कारणांसाठी दररोज नागरिकांना रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, अतिवेगामध्ये येणाऱ्या छोट्या वाहनांसह मोठ्या वाहनांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. वाहनांच्या गतीवर मर्यादा नसल्याने अनेकदा अपघात होऊन, त्यामध्ये वाहनचालकांसह स्थानिकांचा जीव गेला आहे. दुभाजकाची उंची वाढवून सेवा रस्ता करावा, यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. लोकप्रतिनिधींचेही या प्रश्नाकडे लक्ष नाही. चिकलठाणा विमानतळ ते कॅम्ब्रीज चौकदरम्यान जालना रोडवर असलेल्या चिकलठाणा गावात शेतकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणात असून, औद्योगिक क्षेत्रामुळे कामगारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने व्यवसाय तसेच शेतीतील उत्पादने विक्रीसाठी आसपासच्या पंचक्रोशीतील गावातील शेतकऱ्यांची मोठी आवक असते. यागावात खेळाचे मैदान व उद्यान नाही. वृद्धांना तर शतपावली करणे वाहतुकीमुळे शक्य होत नाही.जालना रोड हायवे असल्याने वाहतुकीची वर्दळ खूप असते. शिफ्टप्रमाणे कामगारांची ने- आण केली जाते. त्यात स्कूलबसचीही भर पडते. प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने रस्त्यावर अडथळा करून उभी राहतात.- त्यात आधीच दुभाजकाची उंची कमी असल्याने अपघाताची संख्या वाढली आहे.बाजार तळासमोर तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते चौधरी काॅलनीच्या दिशेने फुट ओव्हर ब्रीज उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांनी केली आहे. पण टाळाटाळ केली जात आहे.