छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुरूवारी हडको एन-११ येथील नवजीवन काॅलनीतील भाजीमंडईची पाहणी करत अरूंद रस्त्यांच्या कडेला होणारी भाजीविक्री व त्यामुळे वाहतूककोंडी आणि अस्वच्छतेच्या निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी येथील तत्कालीन सिडको प्रशासनाने क्रीडांणासाठी आरक्षित ठेवलेल्या खुल्या जागेत एक कोटी ६६ लाख ७७ हजार रूपये खर्च करून टोलेजंग भाजीमंडई देण्याचे आश्वासन भाजी विक्रेत्यांना दिले. मात्र कोट्यावधी रूपये खर्च करून गारखेडा भागातील झोन क्रमांक-७ जवाहर काॅलनीतील सावित्रीबाई फुले मार्केटमध्ये गत २४ वर्षांपासून स्वच्छतेचा धडा शिकवणार्या महापालिकेनेच कचराकोंडी करून ठेवली आहे. तसेच दारूड्यांचा अड्डा झालेल्या येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रशासक जी. श्रीकांत लक्ष देतील काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
या भागातील त्रिमुर्तीचौक ते चेतक घोडा व त्रिमुर्तीचौक ते गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर चौकापर्यंत रस्त्यावर उभे राहुन फळ भाजीपाला व पुजा साहित्य विकणार्यांची मागणी केल्याने ती महापालिकेने कोट्यावधी रूपये खर्च करून पूर्ण केली त्यामुळे विक्रेत्यांचे काही अंशी महापालिकेने हीत जपल्याचे समाधानही महापालिकेला मिळाले होते. मात्र गत २४ वर्षांपासून येथे भाजी मार्केट भरलेच नाही. यासाठी या भागातील नगरसेवकांनी पुढाकार घेतला ना व्यापा-यांनी. परिणामी भाजी विक्रेत्यांनी भर रस्त्यावरच पथारी पसरली. आधीच रुग्णालये, दुकाने, कॉम्प्लेक्सची गर्दी. त्यात लहान रस्त्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. दुसरीकडे भाजी मंडईच्या जागेत नको त्या धंद्यांना ऊत आला आहे. घाण, कचरा आणि बकालीने मंडईचा परिसर व्यापला आहे.
जवाहर कॉलनी परिसरातील भानुदासनगर वॉर्डातून एकदा राधाबाई तळेकर या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी त्रिमूर्ती चौकातील महापालिकेच्या खुल्या जागेवर सावित्रीबाई फुले भाजी मंडई उभारण्याचा प्रस्ताव १९९९ मध्ये सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. वर्षभर काम चालले. सुमारे दिड कोटी रुपये ही भाजी मंडई उभारण्यासाठी खर्च करण्यात आले. गरीब भाजी विक्रेत्यांना योग्य भावात जागा आणि नागरिकांना एकाच ठिकाणी जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात, हा उद्देश यामागे होता. टेंडर निघाले शितल पहाडे नामक कंत्राटदाराच्या बालाजी कंन्सट्रक्शन कंपनीमार्फत भाजी मंडईचे बांधकाम झाले, परंतु सुरू होण्याआधीच माशी शिंकली. गेल्या २४ वर्षांपासून ही मंडई सुरू न होता तशीच पडून आहे. त्यामुळे तिचे खंडहर झाले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे.
वाहतुकीला अडथळा
भाजी मंडईत एकूण ३२ दुकाने तयार करण्यात आली होती. पे ॲन्ड युज स्वच्छतागृहासमोर अधिक जागा रिकामी असल्याने इतरही गाड्या येथे लागू शकतात. भाजीपाला विक्रेत्यांसह फळांच्या दुकानांचाही येथे समावेश होऊ शकत होता. मात्र, मंडई सुरूच न झाल्याने असंख्य भाजी विक्रेते आणि हातगाडीवाल्यांनी त्रिमूर्ती चौक आणि परिसरात अतिक्रमण केले. रस्त्यावरच व्यवसाय सुरू झाल्याने अतिक्रमण वाढले आणि वाहतुकीला अडथळा येऊ लागला.
२४ वर्षांत परिस्थिती बदलली
गेल्या २४ वर्षांत जवाहर कॉलनी परिसर हा मिनी मार्केट म्हणून उदयास आला. गजानन मंदिर ते घोडा चौकापर्यंत हेडगेवार रुग्णालय, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, वाइन शॉप, बिअर बार, मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत.वसाहतींचा आवाका वाढला. यामुळे सर्व बाजूंनी गजानन मंदिर ते घोडा चौकापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. या रस्त्यावर हातगाड्या उभ्या राहत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा नित्याची बाब झाली आहे.
हॉर्नचा कायम त्रास
त्रिमूर्ती चौक, गजानन मंदिर, बौद्धनगर, शिवशंकर कॉलनी चौक येथे सातत्याने ट्रॅफिक जाम होते. अशा वेळी वाहनचालक मोठ्याने हॉर्न वाजवतात. परिणामी रुग्णालयातील रुग्णांना आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी असंख्य तक्रारी केल्या, पण याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनानेही दुर्लक्षच केले आहे.
गजानन मंदिर परिसरावरही परिणाम
सावित्रीबाई फुले भाजी मंडई सुरू होत असल्याने गजानन मंदिर परिसरातील भाजी विक्रेत्यांना दिलासा मिळाला होता. या भाजी मंडईमुळे परिसरात ३२ कॉलन्यांना याचा फायदा होणार होता. मात्र, मंडईच सुरू न झाल्याने त्रिमूर्ती चौकासह गजानन मंदिर चौकावरही त्याचा परिणाम झाला आहे.
पार्किंगची समस्या
या भागातील नागरिकांनी रस्त्यावरच दुकाने आणि घरे बांधली. कुणीही येथे पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही. परिणामी भाजीपाल्याच्या गाड्या आणि रस्त्यावर उभे राहणा-या वाहनांनी संर्पूर्ण रस्ते व्यापले आहेत. तसेच किरकोळ अपघातांची संख्याही वाढली आहे.
प्रस्तावाला केराची टोपली
२००५ मध्ये तत्कालीन नगरसेविका आशा बिनवडे यांनी दुकानांचा लिलाव करून पुन्हा मंडई खुली करावी, असा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यांच्या या प्रस्तावाकडे कुणीच लक्ष दिले नाही. त्यानंतर २०१२ मध्ये काही माजी नगरसेवकांनी या भाजी मंडईकडे लक्ष दिले नाही. तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी भाजी मंडईच्या नुतनीकरणासाठी तीस लाख रूपये मंजुर केले होते. १४ टक्के कमी दराने भाजी मंडईचे नुतनीकरणासाठी शीतल पहाडे यांच्या बालाजी कंन्सट्रक्शन कंपनीलाच काम देण्यात आले होते. भाजीमंडई नुतनीकरण करून येथे भाजी मार्केट भरलेच नाही. त्यामुळे तीस लाखांचा रुपये खर्च करून बांधलेली मंडई भकास झाली.यातून महानगरपालिकेने भाजी मंडई उभारण्यासाठी जनतेच्या कोट्यावधी रूपयांचा खर्च केला. नंतर नुतनीकरणासाठी लाखोंचा खर्च केला. मात्र परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे केवळ जनतेच्या सोयीच्या नावाखाली टेंडर काढून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे हात ओले करण्यासाठीच हे काम केले की, काय असा संशय बळावत आहे.