छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको एन-१ टाऊन सेंटर परिसरातील हाॅटेल लोकसेवा ते सिडको बसस्थानक या रस्त्याचे रवी मसालेजवळ गेल्या महिनाभरापासून अर्धवट खोदलेल्या रस्त्याच्या कामास अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यातच अवघ्या एका महिन्यातच सिमेंटचा अर्धवट रस्ता ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी पुन्हा खोदला जात असल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या या उरफाट्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्ता तयार करण्याआधी भूमिगत मलनिःसारण वाहिनीचे काम करण्यात यावे, जेणेकरून पुन्हा रस्त्याचे खोदकाम होणार नाही व जनतेच्या खिशाला भुर्दंड बसणार नाही, अशी रास्त मागणी महापालिकेचे माजी शहर सुधार समितीचे सभापती तथा माजी नगरसेवक मनोज बन्सीलाल गांगवे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीला महापालिका अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. परिणामी महिन्याभरातच या रस्त्याची वाट लागल्याने गांगवे यांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. सिडको एन-१ टाऊन सेंटर परिसरातील हाॅटेल लोकसेवा ते सिडको बसस्थानक तसेच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील स्माॅल स्केल इंडस्ट्रीजला जोडणारा दोन किलोमीटरचा जो रस्ता आहे तो गेल्या ३० वर्षांपासून खराब असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत होता. याच रस्त्यावर फाइव्ह स्टार हाॅटेल असून, या रस्त्यावर अनेक छोटी मोठी दुकाने व कार्यालये आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते.
सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांची याच रस्त्यावरून रहदारी सुरू असते. तसेच या रस्त्यालगत मोठी निवासी वसाहत आहे. मात्र उखडलेल्या रस्त्यावरून नागरिकांना गेल्या ३० ते ४० वर्षांपासून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यापूर्वी येथील रस्ता हा डांबरी होता. सदर रस्ता हा अत्यंत खराब झाल्याने येथील उद्योजक व नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्ता दुरूस्तीची मागणी केली जात होती. मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करत महानगर पालिका प्रशासन वेळ मारून नेत होती. दरम्यान, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून ३१७ कोटीतून काही कोटी रूपये खर्च करत सिमेंट रस्ता करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. अद्याप रस्त्याचे कामही अर्धवट स्थितीत असताना आता या ठिकाणी भूमिगत मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. त्या पाठोपाठ जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून जलवाहिनी टाकण्यासाठी पुन्हा रस्ता खोदला जाणार आहे.
इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेला नवाकोरा रस्ता खोदला जात असल्याने येथील उद्योजक, नागरिक व प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आधी मलनिःसारण वाहिनी टाकल्यानंतरच रस्त्याचे काम करावे, असा दावा माजी नगरसेवक तथा शहर सुधार समितीचे सभापती मनोज बंन्सीलाल गांगवे यांनी केला होता. मात्र, तेव्हा अधिकार्यांनी मलनिःसारण वाहिनीसाठी निधीची तरतूद नसल्याचे म्हणत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून रस्त्याचे काम करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, नागरिक व माजी नगरसेवकांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. आधी रस्त्याचे बांधकाम केले व आता महिन्याभरातच मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले आहे. अद्यापही रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहे. ते काम पूर्ण तर होत नाही. मात्र नियोजनशुन्य कारभाऱ्यांनी नव्या रस्त्याची वाट लावली आहे.
स्थानिक नागरिक व उद्योजकांसह गांगवे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीकडे दुरध्वनीवर तक्रार करत रस्त्याच्या दुरवस्थेवर जोरदार टीका केली. लगेचच प्रतिनिधीने धाव घेत रस्त्याची पाहणी केली. कंत्राटदाराकडून रस्ता खोदून मलनिःसारण वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीच्या कंत्राटदाराने या ठिकाणच्या रस्त्यावर 'पीसीसी'करत सिमेंटचा थर टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मलनिःसारण वाहिनी टाकण्याचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी नुकताच केलेला रस्ता फोडून मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी टेंडर काढले. आता हा खोदलेला रस्ता तात्पुरता बुजवून स्थानिकांची रस्त्याची गैरसोय तर होणार नाहीना अशी धास्ती या भागातील नागरिकांनी घेतली आहे.