Sambhajinagar : दीड लाख बीडबायपासकरांची मृत्युच्या दाढेतून कोण करणार सुटका?; काय आहे कारण...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama
Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मनपाला "कोट्यावधी" रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बीड बायपास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११ या महामार्गाच्या दुतर्फा विकास आराखड्यानुसार ६० मीटर रूंदीच्या सर्व्हिस रस्त्याचा विसर पडला आहे. परिणामी रस्ता ओलांडतांना या भागातील तब्बल दीड लाख नागरिकांची दमछाक होत आहे. या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करण्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने १८१ मालमत्ता भुईसपाट करून सर्व्हिस रस्त्यासाठी बायपासकरांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर देखील मनपाने सर्व्हिस रस्त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी डांबरी बायपासचे सिमेंटकरणात रूपांतर आणि तीन उड्डाणपूलांचे काम झाल्यानंतर देखील अपघाताचा धोका कायम आहे. टेंडरनामाने सलग दोन दिवस या रस्त्याचा अभ्यास केला. अपघात प्रवन स्थळांची पाहणी केली. त्याची कारणे शोधली. त्याचा हा खास रिपोर्ट...

Sambhajinagar
Mumbai : MMRमध्ये नव्या 'ॲक्सेस कंट्रोल' मार्गाची चाचपणी; मुंबईसह कोठूनही 15 मिनिटात बाहेर पडणे शक्य

मनपाने बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गांवर सर्व्हिस रोडची कामे केली नसल्याने शहरातुन जाणारा हा महामार्ग ओलांडतांना नागरिकांची दमछाक होत आहे. परिणामी नागरिकांच्या मनात हा राष्ट्रीय महामार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’ असल्याचा  ठपका कायम आहे. पैठण रोडवरील महानुभाव आश्रम ते झाल्टा फाटा या बीड बायपास राेडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बॅंक प्रकल्पाच्या अखत्यारीत असलेल्या ३० मीटर रूंद रस्त्यातच सहा पदरी सिमेंट रस्त्याचे रूंदीकरण उरकण्यात आले.१३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यात तीनच ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले. मात्र रस्ता ओलांडताना जिथे ५०० मीटर अंतर जायचे असेल , तिथे ५ किलोमीटरचा यूटर्न घेऊन नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे.यामुळे  अधिकाधिक वाहनधारकांना ‘राँगसाइड’चा मार्ग पत्करावा लागत आहे. यामुळे अंदाजे चारशे कोटी रूपये  खर्चून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे, तो उद्देशही सफल होताना दिसत नाहीए. यावर उपाय म्हणून मनपाने न्यायालयाच्या आदेशानुसार बीड बायपासचे काम सुरू होण्यापूर्वी १८१ मालमत्तांवर हातोडा मारला होता. मात्र बीड बायपास सिमेंट रस्त्याचे काम झाल्यानंतर देखील मनपाने बीड बायपास रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोडचे काम हाती घेतले नाही. मनपाला सर्व्हिस रस्त्याचा का विसर पडला, असा प्रश्न सातारा - देवळाईकरांना पडला आहे.

मागील १५ वर्षांत बीड बायपासवर हजारावर नागरिकांचे अपघातात बळी गेले. अरुंद रस्ता, रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या निवासी वसाहती आणि रस्त्यावरील अवजड वाहतूक, राँग साइडचा प्रवास यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले. या अपघातांना आळा घालण्यासाठी बीड बायपास सिमेंट रस्त्याचे, धोकादायक पुलांचे व ३ उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले, पण खरी गरज बीड बायपासला दुतर्फा सर्व्हिस रोडची गरज होती. मात्र, मनपाने भूसंपादन करून मावेजा न देताच अतिक्रमणांवर हातोडा मारला. यात मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यात न्यायालयाने मनपाला सरळ खरेदीने मालमत्ता ताब्यात घेऊन रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र मनपाकडे निधी नसल्याने भूसंपादन रखडले. त्यामुळे बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाने या अस्तीत्वातील ३० रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचे काम पूर्ण केले. यात ३० मीटर रस्त्यातच सहापदरी रस्ता केल्याने छोट्या लेअरमधून अवजड वाहने जात असताना वाहतुक कोंडी होत आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरण; जिल्हाधिकाऱ्यांकडून महत्त्वाची बैठक

बीड बायपासचे सहा पदरीकरणामुळे फायदा होईल, असे वाटले होते. मात्र पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याचे तलाव साचताच मोठ्या प्रमाणात कोंडी होते.‌ याशिवाय बायपासवर एमआयटीचौक वगळता देवळाई चौक, आणि संग्रामनगर चौकातील आधी चुकीच्या उड्डाणपुलांच्या बांधकामानंतर भुयारी मार्गाची उंची वाढविण्यासाठी केलेल्या खोदकामामुळे देवळाई व आमदार रस्त्याचे कंबरडे मोडले रस्ता खाली आणि सर्व्हिस रस्ता दहा ते बारा फुट वर गेल्याने प्रवासी आणि व्यापार पेठेचे पार वाटोळे झाले. शिवाय येथील रस्ते ओलांडण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घालून  चुकीच्या मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. जुन्या बीड बायपासला पर्याय म्हणून आडगाव निपाणी फाटा ते करोडी या नवीन बीड बायपासची निर्मिती करण्यात आली.अवजड वाहतूक नवीन बायपासवरून वळविण्यात आली असली तरी, रेल्वे मालधक्यावरूंन शहरातील विविध गोदामात सिमेंट, अन्नधान्य व इतर बांधकाम साहित्याचा पुरवठा करणार्या जड वाहनांची वाहतुक जुन्या बीड बायपासवर जैसे आहे. परिणामी जुन्या बीड बायपासवरवरील वाहतूक कमी झालेली दिसत नाहीऐ. रस्त्याच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढणार्या वसाहतींचा आवाका पाहता वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने आयआरसी नियमांना बगल देत बांधलेला दुभाजक देखील अपघाताला आमंत्रण देत आहे. त्यात रस्ता ओलांडण्यासाठी बड्या अंतराचा घेण्याचा मनस्ताप बायपासवासीयांना सतावत आहे.

एमआयटी चौक, संग्रामनगर आणि देवळाई चौक या तीन ठिकाणी चुकीची उड्डाणपूल बनवल्यानंतर कमी उंचीच्या अंडरपासमधून जड वाहने जात नव्हती. दरम्यान टेंडरनामाने बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा भांडाफोड करताच अधिकार्यांनी चांगल्या सिमेंट रस्त्यांचे बांधकाम तोडून अंडरपासची उंची वाढवली. दरम्यान झालेल्या चुकांमुळे आणि सातारा - देवळाईतील देवळाई ते कचनेर व संग्रामनगर चौकातील आमदार रोड या महत्वाच्या वर्दळींच्या रस्त्यांचा संपर्क तोडल्याने प्रवाशांना लांबचा फेरा मारत कोंडीत अडकलेला रस्ता शोधावा लागत आहे. उड्डाणपुलांखालुन वळसा घेतांना नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागत आहे. विशेषतः कुठल्याही उड्डाणपुलांखाली बांधकाम विभागाने सुशोभीकरण केले नाही.‌ दरम्यान टेंडरनामाने भांडाफोड करताच धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी ऊड्डाणपुलांखाली वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून सिंग्नल बसवले जातील असे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमक्ष सांगितले होते, मात्र अद्याप एकाही पुलाखाली सिंग्नल बसवले नाहीत. अंदाजपत्रकात पुलावरील पाण्याचे फेरभरण करण्याचा उल्लेख असताना पाईप मोकळे सोडल्याने प्रवाशांच्या अंगावर पाणी पडत असल्याने अपघाताचे संकट उभे केले आहे. 

Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : विमानतळ विस्तारीकरणाच्या बैठकीतही 'त्याच' मुद्द्यांची चर्चा

अंदाजपत्रकात नमुद केल्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा १.२ मीटर रुंदीची बांधीव, बंदिस्त गटरलाइन आणि त्यावरच  फुटपाथ तयार करण्यात आला आहे. बंदिस्त गटार लाइन तयार केली असताना या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी का साचते हा संशोधनाचा मुद्दा आहे.या रस्त्यावर चार प्रमुख लेन आहेत व दोन लेन सर्व्हिस रस्त्यासाठी आहेत.पैठण रोडवरून निघालेल्या वाहने‌ झाल्टा फाट्यापर्यंत सुसाट धावतात रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी कुठेही गतिरोधक नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.एकूण ६ पदरी १३ किमी सिमेंट काँक्रिटीकरण आणि तीन उड्डाणपूल बांधणीचे कंत्राट २९२.६ कोटी रुपयांना ‘जीएआय इन्फ्रा’ला देण्यात आले आहे. मात्र इतक्या कसोटीतून बांधलेला रस्ता अधिकाऱ्यांच्या सदोष अंदाजपत्रकामुळे चुकल्याने मृत्युचे भय कायम आहे. आणि झालेही तसेच रस्ता बांधकामादरम्यान १३ प्रवाशांचा बळी यावर गेला आहे.उड्डाणपुलां शेजारी स्लिप रोडसाठी भूसंपादन केले नाही मोठ्या नाल्यांवरील पुलांसाठी भूसंपादन केले नसल्याने जोड रस्त्यांवर झालेल्या चिखलातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. सध्या प्रमुख रस्ते आणि सर्व्हिस रस्त्याच्या मधोमध चर खोदून तेथे उर्जा बचत दिवे आणि लोखंडी सुरक्षा जाळी बसवली. मात्र जड वाहनांच्या धडकांनी पथदिव्यांचे खांब आणि सुरक्षा जाळी आडवी पडल्याचे सातारा-देवळाईचे शिवसेना ठाकरे गटाचे हरिभाऊ हिवाळे यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेषतः देवळाईचौक उड्डाणपुला खालुन देवळाईकडे जाताना पुलाखालचा भाग आणि देवळाई रस्ता यात पाच फुटाचा रॅम्प तयार झाल्याने प्रवाशांना वाहनांची चढ-उतार करताना मरण यातना सोसाव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या रॅंम्पवरून चढ-उतार करताना दुचाकीस्वार महिला घसरून पडत असल्याचे देखील ते म्हणाले.

रस्त्याच्या हद्दीत असलेले विद्युत खांब आणि जलवाहिन्या हटवणे (युटिलिटी शिफ्टिंग) या कामांसाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६० कोटी रूपये खर्च केले, पण बांधकाम विभागाने रस्त्याच्या मधोमध पथदिव्याचे खांब लावण्याचा पराक्रम केला. त्यात रस्त्याचे बांधकाम केल्यानंतर जीव्हीपीआरला जलवाहिनी टाकण्याचा साक्षात्कार झाला. अद्याप खोदलेला रस्ता दुरूस्त केला नसल्याचा आरोप हिवाळे यांनी केला आहे.या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा रहिवासी भागात राहणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. लांबलचक यूटर्न घेऊन वसाहती गाठाव्या लागत आहेत.‌ यामुळे लोकांना जीव धोक्यात घालून राँग साइड जाण्याला प्राधान्य द्यावे लागत आहे. कोट्यावधी रूपये खर्च करून देखील परिणामी पुन्हा अपघातांचा धोका कायम आहे. रस्ता ओलांडण्याची सोय नसल्याने तो प्रचंड गैरसोयीचा देखील ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने  विकास आराखड्याप्रमाणे ६० मीटरच्या सर्व्हिस रोडची बांधणी केली तरच हा रस्ता बीड बायपास भागातील रहिवाशांसाठी सोयीस्कर ठरेल.

Sambhajinagar
Mumbai : 'या' नव्या मार्गामुळे एमएमआर क्षेत्रातील सर्व शहरे महामार्गाशी जोडली जाणार

बायपासवर अतिक्रमण जैसे थे!

पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा या राष्ट्रीय महामार्गावर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी व किरकोळ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याचे सलग दोन दिवस टेंडरनामाच्या पाहणीत समोर आले आहे.  अतिक्रमण हटवा व महामार्ग अतिक्रमणमुक्त करा, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केलेली आहे.  महामार्गाच्या दोन्ही बाजूंना फळविक्रेते, ढाबावाले व फेरीवाल्यांनी तसेच बांधकाम साहित्य विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होत असून अपघातही होत आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण हटविणे गरजेचे असल्याची विनंती प्रवाशांनी मनपा व बांधकाम विभागाकडे केली आहे.मात्र अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही.यापुर्वी मनपाने सर्व्हिस रस्त्यासाठी मोकळ्या केलेल्या जागेतच विक्रेत्यांनी बस्तान बांधल्याने वाहने वळवताना व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. मुळात बांधकाम विभागाच्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमणमुक्त असायला हवा. त्यावर जर अतिक्रमण होत असेल तर ते रोखण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे‌  हा महामार्ग अनेक वसाहतींना जोडतो. झाल्टा फाटा ते पैठण जंक्शन १३ किमी अंतर कमी वेळात जोडणार्या या महामार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने लोक वैतागले आहेत.मात्र  सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मनपा आणि वाहतुक शाखेचा तसेच जिल्हाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने हे अतिक्रमण झाले, असे टेंडरनामाच्या निरिक्षणातून स्पष्ट झाले आहे. बीड बायपास या राष्ट्रीय महामार्गाची अतिक्रमणामुळे दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर अपघात, वाहतूककोंडी व अस्वच्छता पाहायला मिळते त्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित सक्षम प्राधिकरणाने  या राष्ट्रीय महामार्गावर जिथे अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथील अतिक्रमण मुळासकट काढुन विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com