Sambhajinagar
SambhajinagarTendernama

Sambhajinagar : रस्त्याच्या दुभाजकात नवीन खांब लावले पण जुने खांब हटणार कधी?

Published on

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराचा चेहरामोहरा 'स्मार्ट' करण्याच्या दृष्टीने शहरात सिमेंट रस्त्यांची कामे धडाक्यात सुरू आहेत. सरकारी अनुदान योजनेअंतर्गत, स्मार्ट सिटी अंतर्गत व महापालिका फंडातून अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यात एकीकडे रस्त्यांचे काम, उत्तम पायाभूत सुविधांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असताना दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध असलेले हे विजेचे खांब या सौंदर्याला विद्रूप करत आहेत. शिवाय, वाहनचालकांसाठीही यमदूत ठरत आहेत. या खांबांमुळे अपघात होऊन गेल्या काही वर्षांत नागरिकांना प्राणही गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे हे खांब नियोजित वेळेत हटवण्यात यावेत, असे आदेश हायकोर्टाने महापालिकेला दिलेले असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

Sambhajinagar
Sambhajinagar : धोकादायक शाळेचा नूर पालटला; खाली शाळा आणि वर पोलिस उपायुक्त कार्यालय

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत आजही रस्त्यांमध्ये वा इतर भागांत मोठ्या संख्येने अनेक वीजखांब भर रस्त्यावर उभे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अनेक भागांत वाहतुकीची कोंडीही होताना दिसते. महापालिकेकडून तातडीने हे खांब हटवून, भूमिगत वाहिनी टाकण्याची अपेक्षा छत्रपती संभाजीनगरकरांकडून‌ व्यक्त केली जात आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. यातील अनेक खांब जुने झालेले असून अद्यापही रस्त्यांच्या मधोमध वा रस्त्याला खेटून उभे आहेत. काही खांबांच्या दुरवस्थेकडे तर महापालिका व वीजकंपन्यांचे लक्षही नाही. असे हे खांब कधीही कोलमडून एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. वादळी वाऱ्यांमुळे खांब वाकण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. या खांबांना धडकून कित्येक जीव गेले आहेत. तरीही, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ते जैसे थे आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : 'त्या' रस्त्याची दुरुस्ती कधी करणार?; कंत्राटदाराकडे एमएसआरडीसीचे अक्षम्य दुर्लक्ष

रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबांच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. यात न्यायालयाने संबंधित संस्थांना 'नेमके किती खांब आहेत व ते कसे हलविता येतील', यासंबंधीची माहिती मागवली होती. दरम्यान, शहरातील पथदिव्यांची व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. तर वीजवितरण व्यवस्थेची जबाबदारी महावितरणची आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेले हे खांब हटवण्यासाठी लागणारा आर्थिक भार या दोन्ही संस्थांनी प्रत्येकी ५० टक्के उचलावा, असे निश्चित करण्यात आले. तसेच ही सर्व कामे महापालिकेने पूर्ण करावे, असे निश्चित होते. पण, काही हालचाली झाल्या नाहीत. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून शहरातील रस्त्यावर मधोमध असलेल्या खांबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यानुसार खांब हटवण्याचेही निश्चित करण्यात आले, ज्यावर रस्त्याच्या अगदी मधोमध खांब आहेत. विशेष म्हणजे सरकारी अनुदानातून तसेच स्मार्ट सिटी रस्ते विकास योजनेंतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम झाल्यामुळे अनेक ठिकाणी हे खांब अगदी भररस्त्यात आले आहेत. जी - २० दरम्यान सरकारने दिलेल्या अनुदानातून तसेच १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या १५ कोटींच्या निधीतून महापालिकेने काही मुख्य ठिकाणचे खांब व त्यावरील वाहिन्या योग्य ठिकाणी हलवल्या असल्याची माहिती आहे. मात्र अनेक भागात खांब हटविण्याचे काम महापालिकेकडून निधीअभावी रखडले आहे. या कामासाठी किमान १०० कोटींच्या निधीची आवश्यकता असून, यासाठी राज्य सरकारने महापालिकेला अनुदान देणे गरजेचे असून, यासाठी प्रस्ताव पाठवल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

- महापालिकेने लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशान भुमि सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या मधोमध वीजेचे खांब हटविण्यासाठी वीज कंपनीकडे पैसे देखील भरले. वीज कंपनीने दुभाजकात नवीन खांब गाडले. मात्र नव्या खांबाशेजारी जुने खांब तसेच आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे.

- विश्रांतीनंतर ते मोरया मंगल कार्यालय दरम्यान सिमेंट रस्त्यांच्या मधोमध वीजेचे खांब महापालिकेने हटवले मात्र खड्डे तसेच असल्याने खांबाचा धोका कमी झाला असला तरी आता खड्ड्यांचा दुसरा धोका कायम आहे. 

- महापालिका आधी सिमेंट रस्ते तयार करते त्यानंतर काही भागात खांब उखडण्याचे काम करते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात. महावितरण कंपनीकडुन खड्डे दुरूस्त केले जात नाहीत. महानगरपालिका देखील दुर्लक्ष करते. त्यामुळे रस्ते तयार करण्याआधी खांब हटवावेत जेणेकरून रस्त्यांचे नुकसान होणार नाही.

Tendernama
www.tendernama.com