छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मुकुंदवाडी इंदिरा मार्केट आणि जालनारोड यांना जोडणारा सर्व्हिस रस्त्यावर अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने, खाजगी कंपन्यांच्या बसेस आणि रिक्क्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीकरिता हा रस्ता डोकेदुखीचा ठरत असून, महापालिका प्रशासनाने त्यात गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मुकुंदवाडी चौकातील नागरिकांना ये-जा करण्यास अत्यंत सोयीचे व्हावे व अवघ्या काही मिनिटांत नागरिकांना जालनारोड ओलांडता यावा, चौकातील जालना रोडवरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी या रस्त्याची निर्मिती नुकतीच करण्यात आली.दोन महिन्यांपूर्वी येथील वाहतुकीचा जटील प्रश्न सोडविता यावा, महापालिकेने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगरविकास विभागाने शहरातील पायाभूत सुविधांसाठी दिलेल्या निधीतून ५० लाख रुपये खर्च करून डांबरी सर्व्हिस रस्त्याचे बांधकाम केले. कंत्राटदारामार्फत रस्ता चकाचक झाल्यानंतर इंदिरा मार्केटच्या दिशेने सिमेंटच्या ब्लाॅक देखील बसविण्यात आले. प्रत्यक्षात नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या या रस्त्याने प्रश्नांचे स्वरूप बदलले असून, हा रस्ता अनधिकृत वाहनतळच बनला असल्याचे दिसून येते.
त्यातच या रस्त्यावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या फ्लाय ओव्हरचा ताबा तळीरामांनी घेतल्याने पादचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दुसरीकडे हायकोर्ट ते सिडको एन - ३ एन - ४ एन - २ मुकुंदवाडी - संजयनगर - विठ्ठल नगर- रामनगर - मुर्तिजापूर असा अखंड सर्व्हिस रस्ता सिडकोच्या विकास आराखड्यात असताना इतर रस्त्यांवरील काही भागातील अतिक्रमणांकडे महानगरपालिकेने कानाडोळा केला. त्यात मुकुंदवाडी चौकातील इंदिरा मार्केटच्या काही अतिक्रमणांवर हातोडा मारत सर्व्हिस रस्त्याचे रूदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले. मात्र या नव्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर खासगी कंपन्यांची वाहने , दुचाकी व चारचाकी तळ ठोकून उभी असतात. या संपूर्ण रस्त्यावर रात्रीच्या वेळी रोडरोमिओ, मद्यपींचा वावर दिसून येत आहे. अनेकदा या रस्त्यावरून जाताना अंदाज न आल्याने छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महापालिका प्रशासनाने सजग होऊन या ठिकाणी कारवाई केल्यास विद्यार्थी, नागरिक व वाहनचालकांची गैरसोय टळेल, असे येथील नागरिकांचे मत आहे.
या ३० लाखाच्या रस्त्यावरही विक्रेत्यांचा कब्जा
मुकुंदवाडी परिसरात दुसरा पर्यायी इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या मुख्य सर्व्हिस रस्त्याचे तीस लाख रुपये खर्च करून महानगरपालिकेने सिमेंटीकरण केले होते. मात्र या भर रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे जालना रस्ता गाठतांना वाहतुकीचा खोळंबा होत आहे. भाजी विक्रेते उरलेला भाजीपालाही रस्त्यावरच फेकून देतात. हा भाजीपाला कुजून परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यास येथील रहिवासी, व्यापारी वैतागले आहेत.
तत्कालीन सिडको प्रशासनाने इंदिरा मार्केटची निर्मिती करून येथे भाजीपाला विक्रेत्यांना प्रत्येकी आठ बाय आठची जागा दिली आहे, परंतु तिकडेही हे विक्रेते व्यवसाय करतात. आणि रस्त्यांवर देखील ठाण मांडून बसतात. त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडल्यामुळे या परिसरातील रहिवासी नागरिक व व्यापार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजी विक्रेत्यांना येथून हटविण्याबाबत अनेकदा तक्रार करूनही महानगरपालिका यावर काहीही कार्यवाही करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुकुंदवाडीकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. याच रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करावी लागते. मात्र भाजी विक्रेत्यांमुळे त्यांना अडथळा येतो. भाजी विक्रेत्यांच्या गर्दीमुळे वाहनचालकांना मार्ग काढता काढता नाकीनऊ येतात. एखाद्याच्या वाहनाला दुसर्यांचा धक्का बसल्यास वाद होऊन हाणामार्याही झालेल्या आहेत. दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ अशी म्हण आहे. पण येथे तिसर्यांमुळे दोघांचे भांडण होत आहे. या परिसरातील व्यापार्यांनाही याचा त्रास होत आहे. मंडईच्या अडचणीमुळे त्यांच्या दुकानाकडे ग्राहक फिरकेनासे झाले आहेत.भाजी मंडई रस्त्यावरून हलविण्यासंदर्भात महापालिका प्रशासक आदेश देतात.परंतु अतिक्रमण विभाग कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले.